इमा कोबर्न स्टीपलचेस विजेती अमेरिकेची 23 पदकांसह आघाडी 

world athletics
world athletics

लंडन : अमेरिकेच्या इमा कोबर्नने जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकताना या शर्यतीत असलेली केनियन धावपटूंची मक्तेदारी मोडून काढली. आठ सुवर्णपदकांसह एकूण 23 पदके मिळवत पदकतालिकेत पुन्हा अव्वल स्थान मिळविण्याच्या दिशेने अमेरिकेने आगेकूच केली आहे. 

स्टीपलचेस शर्यतीत सर्वांच्या नजरा जन्माने केनियन आणि गेल्या चार वर्षांपासून बहरीनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विश्‍वविक्रमवीर व रिओ ऑलिंपिक विजेत्या रुथ जेबेटवर होत्या. शेवटची फेरी सुरू झाली त्या वेळी रुथ मागे पडली. गतविजेती केनियाची हायवीन कियेंग चेपकोमई, कोबर्न आणि अमेरिकेचीच कोर्टनी फ्रेचीस यांच्यात चुरस होती. कोबर्नने संयम कायम ठेवत शेवटच्या टप्प्यात वेग वाढविला आणि प्रथमच जागतिक पातळीवर सुवर्णपदक (9 मि.02.58 सें) जिंकले. हा नवीन स्पर्धा विक्रमही ठरला. गतवर्षी रिओत तिला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले होते. फ्रेचीसला (9ः03.77) रौप्य, तर हायवीनला ब्रॉंझपदकावर (9ः04.03) समाधान मानावे लागले. जागतिक स्पर्धेत 2005 मध्ये स्टीपलचेसचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून फक्त दोनदाच (2013, 15) केनियाला सुवर्णपदक जिंकता आले. 

महिलांची लांब उडीची स्पर्धाही रंगतदार झाली. प्रत्येक फेरीअखेर चुरस कायम होती. त्यात अमेरिकेच्या 30 वर्षीय ब्रीटनी रिसने बाजी (7.02 मीटर) मारली. तिने 2009, 11 व 13 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. काही दिवसांपूर्वीच माझ्या आजोबाचे निधन झाले होते. त्यामुळे मी फार तणावाखाली होते. हे सुवर्णपदक आजोबांना समर्पित करते, अशी प्रतिक्रिया ब्रीटनीने दिली. रशियावर बंदी असल्याने तटस्थ ऍथलिट्‌ म्हणून सहभागी झालेल्या दार्या क्‍लिशिनाला रौप्य (7.00 मीटर) आणि 2005च्या विश्‍व व गतवर्षीच्या ऑलिंपिक विजेत्या टिआना बार्टोलेटटाला ब्रॉंझ (6.97 मीटर) पदक मिळाले. 

शिफर्सने सुवर्णपदक राखले 
दोन वर्षांपूर्वी बीजिंग येथे दोनशे मीटरचे सुवर्णपदक मिळविल्यानंतर नेदरलॅंडच्या डाफने शिफर्सचे नाव एका रस्त्याला देण्यात आले होते. नेदरलॅंडची महान ऍथलिट्‌स फेनी ब्लेंकर्स कोएन हिची वारसदार म्हणून डाफनेकडे पाहिले जाते. मूळ हेप्टॅथलॉनची खेळाडू असलेल्या डाफनने 22.05 सेकंदात सुवर्णपदक जिंकताना शंभर मीटरमध्ये आयव्हरी कोस्टच्या मेरी जोस टा लू हिच्याकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली. मेरीला रौप्य (22.08 सें), तर बहामाच्या शॉने मिलर-युबोला ब्रॉंझ (22.15 सें) पदक मिळाले. पोलंडच्या पावेल फायदेकने 79.81 मीटर अंतरावर हतोडा फेकून सलग तिसरे विश्‍वविजेतेपद मिळविले, अशी कामगिरी करणारा तो हतोडाफेकीतील पहिलाच ऍथलिट ठरला. 

भारतीय महिला रिलेत अपात्र 
महिलांच्या 4-400 मीटर रिले शर्यतीत "लेन' बदलल्याने भारतीय संघाला अपात्र ठरविण्यात आले. यात जिस्ना मॅथ्यू, पुवम्मा, अनिल्दा थॉमस आणि निर्मलाचा समावेश होता. पहिल्याच लेगमध्ये जिस्नाने 250 मीटरनंतर लेन बदलली. त्यामुळे ही नामुष्की ओढविली. पुरुष रिले संघाने 3 मिनिट 02.80 सेकंद ही यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम वेळ दिली; मात्र त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. कुन्हू महंमद, अमोल जेकब, महम्मद अनस, आरोक्‍य राजीवचा समावेश असलेल्या भारतीय संघाला प्राथमिक फेरीत पाचवे स्थान मिळाले.

दृष्टिक्षेपात 
- महिलांच्या लांब उडीत ब्रीटनी रिसचे चौथे विश्‍वविजेतेपद. पुरुषांत अशी कामगिरी अमेरिकेचा ड्‌विट फिलीप व क्‍युबाच्या इव्हान पेड्रोसो यांनाच करता आली आहे. 
- हतोडाफेकीत पोलंडच्या पावेल फायदेकचे सलग तिसरे विश्‍वविजेतेपद 
- महिलांच्या स्टीपलचेस शर्यतीत अमेरिकेला प्रथमच दोन पदके 
- महिलांच्या दोनशे मीटर शर्यतीत प्रथमच अमेरिका व जमैकाच्या धावपटूंना पदक नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com