पी. व्ही. सिंधूचा अंतिम सामन्यात पराभव

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले. या सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने 21-19, 21-10 सिंधूचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.

नानजिंग (चीन) - चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले. या सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिने 21-19, 21-10 सिंधूचा सरळ दोन गेममध्ये सिंधूचा पराभव केला. 

मरिनने उपांत्य फेरीत भारताच्याच सायना नेहवाल हिचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या गेममध्ये विजयासाठी मरिनला सिंधूने चांगलेच झुंजवले. पहिल्या गेममध्ये सिंधूने 14-9 अशी दमदार आघाडी घेतली होती. पण, त्यानंतर मरिनने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. मरिनने सहा गुणांची कमाई करत सिंधूशी 15-15 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींनीही जोरदार प्रयत्न केले आणि 18-18 अशी बरोबरी साधली. पण त्यानंतर पुन्हा एकदा मरिनने सर्वोत्तम खेळाची प्रचिती आणून देत 21-19 असा पहिला गेम जिंकला.

पहिला गेम पिछाडीवरुन जिंकल्यावर मरिनचे मनोबल कमालीचे उंचावले. दुसऱ्या गेममध्ये मरिनने सिंधूला निष्प्रभ केले. दुसऱ्या गेममध्ये मरिनच्या खेळापुढे सिंधू हतबल झाली आणि त्यामुळे तिला अखेर रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.

दरम्यान, सिंधूने गेल्यावर्षी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. गेल्यावर्षी, झालेल्या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला जेतेपद पटकावता आले नव्हते. त्यापूर्वी 2013 आणि 2014 या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या सामन्यापूर्वी सिंधू आणि मरिन यांच्यामध्ये 12 सामने झाले होते. या दोघींनीही 12 पैकी प्रत्येकी सहा सामने जिंकले होते.

Web Title: World Badminton Championships 2018 Womens Singles Pv Sindhu lose final