
World Boxing Championships : नीतू, निखत, लवलिना जगज्जेतेपदापासून एक पाऊल दूर
नवी दिल्ली : निखत झरीन, नीतू घंघास, लवलिना बोर्गोहेन व स्वीटी बूरा या भारताच्या चार महिला बॉक्सर्स विश्वविजेतेपदापासून आता फक्त एक पाऊल दूर आहेत. या चौघींनीही जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत आपापल्या गटात अंतिम फेरीत धडक मारली असून आता चारही खेळाडूंकडून किमान रौप्यपदक पक्के झाले आहे. अंतिम लढतीत विजय झाल्यास चौघींना सुवर्णपदकाला गवसणी घालता येणार आहे.
नीतू हिने ४८ किलो वजनी गटातील आपली दमदार कामगिरी गुरुवारीही कायम ठेवली. याआधी झालेल्या तिन्ही लढतींमध्ये रेफ्रींना लढत थांबवावी लागली होती. नीतूच्या आक्रमक खेळापुढे प्रतिस्पर्धी खेळाडूंचा निभाव लागला नाही. नीतूसमोर उपांत्य फेरीच्या लढतीत आशियाई विजेती अलुआ बालकीबेकोवा या कझाकस्तानच्या खेळाडूचे आव्हान होते.
नीतूने मात्र या लढतीत दबाव झुगारून खेळ केला. तिने ही लढत ५-२ अशी जिंकली. मागील जागतिक स्पर्धेमध्ये नीतू हिला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागले होते. यंदा मात्र नीतूने जबरदस्त कामगिरी करताना अंतिम फेरीत वाटचाल केली. आता नीतूला मंगोलियाच्या लुतसाईखान अल्तांतसेतसेग हिला सामोरे जावे लागणार आहे. मंगोलियाची खेळाडू ही आशियाई स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती आहे.
सलग दुसऱ्या सुवर्णपदकाकडे कूच
निखत झरीन या भारताच्या स्टार खेळाडूने सलग दुसऱ्या सुवर्णपदकाकडे वाटचाल केली आहे. निखत हिने ५० किलो वजनी गटात अगदी सहज विजय मिळवत अंतिम फेरीत पाऊल ठेवले. तिने कोलंबियाच्या इन्ग्रीत वॅलेंसिया हिचा ५-० असा धुव्वा उडवला.
२६ वर्षीय निखत हिने या लढतीत वर्चस्व कायम राखले. निखतच्या जलद हालचाली व प्रतिस्पर्धीवर अंकुश ठेवण्याचे कौशल्य यामुळे ही लढत गाजली हे विशेष. निखत आणि सुवर्णपदक यामध्ये आता व्हिएतनामच्या नगुयेन थी ताम हिचा अडथळा असणार आहे. व्हिएतनामची खेळाडू ही दोन वेळा आशियाई विजेती ठरली आहे.
पदकाचा रंग बदलला
लवलिना बोर्गोहेनने ली कियानवर ४-१ असा विजय साकारला. तिला जागतिक स्पर्धेत रौप्य किंवा सुवर्ण जिंकता आलेले नाही. यंदा मात्र तिचा पदकाचा रंग बदलला आहे. मात्र तिला कोणते पदक मिळेल याचे उत्तर फायनलनंतरच समजेल. स्वीटीने एस. ग्रीनट्री हिला ४-३ असे हरवले.