वर्ल्डकपच्या उंबरठ्यावर स्पेन प्रशिक्षकांची हकालपट्टी

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

दुसरीकडे व्यावसायिक करार करायचा असेल तर त्याची माहिती देणे हे व्यावहारिक आहे. तुम्ही स्पेनसारख्या बलाढ्य संघाचे प्रशिक्षक आहात आणि विश्‍वकरंडक ही सर्वांत मोठी जबाबदारी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते. 
- लुईस रुबेल्स, स्पेन फुटबॉल फेडरेशनचे प्रमुख 

 

माद्रिद - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा काही तासांवर आलेली असताना संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या स्पेन संघाला मोठा धक्का बसला आहे. मुख्य प्रशिक्षक जुलेन लोपेटेगुई यांनी आपल्या देशाच्या संघटनेला अंधारात ठेवून रेयाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदाचा करार केल्यामुळे त्यांची स्पेन संघटनेने हकालपट्टी केली आणि फर्नांडो हिएरो यांची तातडीने नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. 

झिनेदिन झिदान यांनी रेयाल माद्रिदचे प्रशिक्षकपद काही दिवसांपूर्वीच सोडले. रिकाम्या झालेल्या या पदावर रेयालने शोध सुरू केला आणि स्पेनमधीलच राष्ट्रीय प्रशिक्षक लोपेटेगुई यांची निवड केली. रेयालबरोबर हा करार करताना आपल्याला त्याची कल्पना दिली नाही, असे स्पेनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघटनेचे म्हणणे आहे. 

लोपेटेगुई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेनने 20 सामन्यांत अपराजित राहण्याची मालिका गुंफलेली आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत त्यांचा सलामीचा सामना शुक्रवारी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालविरुद्ध होणार आहे. रोनाल्डो क्‍लब फुटबॉल स्पेनमध्येच खेळत असल्याने रेयाल माद्रिदच्याच सहकाऱ्यांविरुद्ध त्याला सलामीला लढावे लागणार आहे. 

लोपेटेगुई रेयालचे प्रशिक्षक होणार याची कुणकुण आम्हाला लागली होती आणि या क्‍लबने अधिकृत घोषणा करण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदच आम्हाला पक्की माहिती मिळाली होती, असे स्पेन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष लुईस रुबेल्स यांनी सांगितले. राष्ट्रीय संघाशी करारबद्ध असलेली व्यक्ती संघटनेला कोणतीही कल्पना न देता गुपचुपपणे असा व्यावसायिक करार करू शकत नाही. बॉसला न सांगता दुसरी नोकरी मिळवणे लोपेटेगुई यांना महागात पडले, असेही वक्तव्य रुबेल्स यांनी केले. 

2010 मध्ये विजेतेपद मिळवणारे स्पेन यंदाचेही संभाव्य विजेते म्हणून समजले जात आहे. पोर्तुगालबरोबर सलामी झाल्यानंतर त्यांचा मोरोक्को आणि इराणशी गटात सामना होणार आहे. लोपेटेगुई प्रशिक्षक होण्याअगोदर स्पेन संघाची जबाबदारी विसेंट जे बॉस्क्‍यू यांच्याकडे होती. 

दुसरीकडे व्यावसायिक करार करायचा असेल तर त्याची माहिती देणे हे व्यावहारिक आहे. तुम्ही स्पेनसारख्या बलाढ्य संघाचे प्रशिक्षक आहात आणि विश्‍वकरंडक ही सर्वांत मोठी जबाबदारी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते. 
- लुईस रुबेल्स, स्पेन फुटबॉल फेडरेशनचे प्रमुख 

 

Web Title: World Cup 2018: Spain considering replacing Julen Lopetegui over ‘betrayal’ of Real Madrid manager appointment