World Cup 2019 : इंग्लंडचा सफाईदार विजय; बेजबाबदार फलंदाजी विंडीजच्या मुळावर

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जून 2019

संयमाच्या अभावामुळे बेजबाबदार फटके मारून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवणाऱ्या वेस्ट इंडीजने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला आणखी एक सामना गमावला.

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्टन : संयमाच्या अभावामुळे बेजबाबदार फटके मारून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवणाऱ्या वेस्ट इंडीजने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला आणखी एक सामना गमावला. या संधीचा पुरेपुर फायदा इंग्लंडने सामना एकतर्फी करत आठ विकेटने विजय मिळवला आणि गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे. अनपेक्षितपणे मिळालेले दोन विकेट आणि शानदार शतक करणारा ज्यो रूट सामनाचा मानकरी ठरला.

वेस्ट इंडीजचा बेभरवसापणा पुन्हा समोर आला. 1 बाद 54 वरून 3 बाद 55 त्यानंतर 3 बाद 144 वरून 5 बाद 156 आणि सर्वबाद 212 अशी वाताहत झालेल्या वेस्ट इंडीजचे हे सोपे आव्हान इंग्लंडने 33.1 षटकांत पार केले. ज्यो रूटने यंदाच्या स्पर्धेतले दुसरे शतक करून विंडीज गोलंदाजांना प्रतिकारीचीही संधी दिली नाही. जेसन रॉय जखमी झाल्यामुळे रूट सलामीला आला होता. पाकिस्तानविरूद्धही त्याने शतक केले होते, परंतु तो सामना इंग्लंडने गमावला होता. रूट आणि बेअरस्टॉ यांनी 95 धावांची सलामी दिल्यानंतर इंग्लंडने ख्रिस वोक्‍सला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले त्यानेही 40 धावांची खेळी केली.

सकाळी ढगाळ वातावरणात प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळालेल्या वेस्ट इंडीजसाठी एविन लुईसचे अपयश धक्का देणारे ठरले. परिस्थिती सोपी नव्हती; त्यामुळे ख्रिस गेलही अतिशय सावध होता, पण जम बसताच त्याने पाच चौकार, एक षटकार मारला. विंडीजचा डाव स्थिरावणार असे वाटत असताना गेलला उंच फटक्‍याचा मोह आवरता आला नाही; तर पुढच्या षटकात होपच्या होप्स मार्क वूडने संपवल्या आणि अचानक 1 बाद 54 वरून 3 बाद 55 अशी अवस्था झाली.

पूरम आणि हेटमेर यांनी 90 धावांची भागीदारी केली, तेव्हा पुन्हा विंडीजची गाडी रूळावर येण्याची लक्षणे दिसू लागली, इंग्लंडचा बदली गोलंदाज ज्यो रूटने हेटमेर आणि कर्णधार जेसन होल्डरला कमी वेगाच्या चेंडूवर चकवले त्यानंतर दुसऱ्यांदा घसरगुंडी झाली. 

रसेल अजूनही 'आयपीएल मोड'मध्ये
आंद्रे रसेल अजूनही "आयपीएल मोड'मध्ये असल्यासारखाच पवित्रा घेत आहे. जवळपास 15 षटकांचा खेळ शिल्लक असतानाही तो प्रत्येक चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावण्यासाठीच बॅट चालवण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. 16 चेंडूतील त्याची 21 धावांची खेळी अल्पजिवी ठरली. 

संक्षिप्त धावफलक : 

वेस्ट इंडीज : 44.4 षटकांत सर्वबाद 212 (ख्रिस गेल 36-41 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, निकोलस पूरम 63-78 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, हेटमेर 39-48 चेंडू, 4 चौकार, आंद्रे रसेल 21-16 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, जोफ्रा आर्चर 9-1-30-3, मार्क वूड 6.4-0-18-3, ज्यो रूट 5-0-27-2) पराभूत वि. इंग्लंड : 33.1 षटकांत 2 बाद 213 (जॉनी बेअरस्टॉ 45 -46 चेंडू, 7 चौकार, ज्यो रूट नाबाद 100 -94 चेंडू, 11 चौकार, गॅब्रियल 7-0-49-2)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 England demolish West Indies