अमेरिका, मेक्‍सिको, कॅनडात 2026चा विश्‍वकरंडक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

फुटबॉलच्या 2026च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका, मेक्‍सिको आणि कॅनडा यांना संयुक्तपणे देण्याचा निर्णय बुधवारी "फिफा'च्या वार्षिक बौठकीत घेण्यात आला. "फिफा'च्या सदस्यांनी या तिन्ही देशांच्या संयुक्त यजमानपदाला सर्वाधिक पसंती दिल्यामुळे पाचव्यांदा मोरोक्कोला यजमानपदापासून वंचित राहावे लागले. तीन देशांनी मिळून विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे संयोजन करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. 
 

मॉस्को - फुटबॉलच्या 2026च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका, मेक्‍सिको आणि कॅनडा यांना संयुक्तपणे देण्याचा निर्णय बुधवारी "फिफा'च्या वार्षिक बौठकीत घेण्यात आला. "फिफा'च्या सदस्यांनी या तिन्ही देशांच्या संयुक्त यजमानपदाला सर्वाधिक पसंती दिल्यामुळे पाचव्यांदा मोरोक्कोला यजमानपदापासून वंचित राहावे लागले. तीन देशांनी मिळून विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे संयोजन करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. 

"फिफा'च्या बैठकीत उत्तर अमेरिकाच्या संयुक्त प्रस्तावाला 134 मते मिळाली, तर मोरोक्कोच्या पारड्यात केवळ 65 मते पडली. एक सदस्य मतदानापासून अलिप्त राहिला. त्याचबरोबर या स्पर्धेपासून विश्‍वकरंडक स्पर्धा 48 देशांची घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कतार येथे 2022 मध्ये होणारी स्पर्धा 32 संघांचीच असेल. 

उत्तर अमेरिकन आणि मोरोक्को यांना आपल्या सादरीकरणासाठी 15 मिनिटे देण्यात आली होती. यामध्ये उत्तर अमेरिका देशांनी स्पर्धेतून 11 अब्ज डॉलरचा नफा होईल असे सांगितले. मोरोक्कोकडून 5 अब्ज डॉलरचाच फायदा होईल, असे सांगण्यात आले. सहाजिकच हा एक मुद्दा उत्तर अमेरिकेच्या बाजूने मते पडण्यास निर्णायक ठरला. 

अमेरिका फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कार्लोस कोड्रिएरो यांनी यजमानपदाची संधी दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले, ""आज आम्ही नाही, तर फक्त फुटबॉल जिंकले आहे. आमच्यावर विश्‍वकरंडक स्पर्धेच्या आयोजनासाठी विश्‍वास दाखवला यासाठी सर्वांचे आभार. आम्ही तुमच्या विश्‍वासास खरे उतरू.''

थोडक्‍यात निर्णय 
- विश्‍वकरंडक स्पर्धेचे तीन देशांना यजमानपद देण्याचा प्रथमच निर्णय 
-यापूर्वी कोरिया, जपान (2002) या दोन देशांना संयुक्त यजमानपद मिळाले होते 
- अमेरिका, मेक्‍सिको, कॅनडा यांना मिळाले 2026चे यजमानपद 
- अमेरिकेला 1994, तर मेक्‍सिकोला 1970 आणि 1986च्या स्पर्धेच्या यजमानपदाचा अनुभव 
- कॅनडाला पुरुषांच्या विश्‍वकरंडक आयोजनाची पहिलीच संधी, मात्र 2015 मध्ये महिलांच्या स्पर्धेचे आयोजन 
- 2026पासून होणार 48 संघांत स्पर्धा 
- एकूण 80 सामने होणार 
- यातील सर्वाधिक 60 सामने अमेरिकेत, तर कॅनडा, मेक्‍सिकोत प्रत्येकी 10 सामने 

Web Title: World Cup of 2026 in America, Mexico, Canada