यजमान रशियाचा विजयाचा दुष्काळ कायम 

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमान असलेल्या रशियाला स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या सामन्यात तुर्कीविरुद्ध 1-1 बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे सलग सातव्या सामन्यांत रशियाला विजयापासून वंचित राहावे लागले. 

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमान असलेल्या रशियाला स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या सामन्यात तुर्कीविरुद्ध 1-1 बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे सलग सातव्या सामन्यांत रशियाला विजयापासून वंचित राहावे लागले. 

घरच्या मैदानात खेळणाऱ्या रशिया संघाला प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित असलेल्या 35 हजारांहून जास्त चाहत्यांना या वर्षातील पहिली हार टाळल्याचे समाधान लाभले. यंदा रशिया यापूर्वी ब्राझील, फ्रान्स तसेच ऑस्ट्रियाविरुद्ध पराजित झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांत रशियाने एकही लढत जिंकलेली नाही. 

विश्‍वकरंडकातील यजमानांची लढत एका आठवड्यावर आहे. ऍलेक्‍झांडर सामेदोव याने 36 व्या मिनिटास रशियाचे खाते उघडले, पण त्यांना 60 व्या मिनिटास बरोबरीचा गोल स्वीकारावा लागला. युनुस माली याने 25 मीटर अंतरावरून मारलेल्या किकवर रशियाचा गोलरक्षक चकला. यजमानांच्या आक्रमक तसेच मध्यरक्षकात पुरेसे समन्वय नसल्याचा परिणाम कामगिरीवर झाला. 

वर्ल्डकप पात्रता हुकलेल्या तुर्कीनेच सामन्यावर हुकूमत राखली. या लढतीनंतर पुन्हा एकदा फुटबॉल अभ्यासकांनी रशिया मार्गदर्शक स्टॅनिस्लाव चेर्चेसॉव यांच्या क्षमतेबाबत शंका घेतली आहे. त्यांची 2016 च्या ऑगस्टमध्ये नियुक्ती झाली. तेव्हापासून रशिया 21 सामन्यांत पाच वेळा जिंकताना त्यांनी 10 लढती गमावल्या आहेत. 

Web Title: World Cup hosts Russia extend winless streak after Turkey draw