
World Shooting Competition : जागतिक स्पर्धेत मनू भाकरला ब्राँझपदक
भोपाळ : भारताची अनुभवी महिला नेमबाज मनू भाकर हिने येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावले. हरियानाच्या २१ वर्षीय मनूने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल या प्रकारात हे पदक जिंकले. भारताचे या स्पर्धेतील हे सहावे पदक ठरले हे विशेष.
२५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या दोन खेळाडू शूटिंग रेंजवर उतरल्या होत्या. मनू भाकर आणि ईशा सिंग ही त्यांची नावे. या प्रकाराच्या पात्रता फेरीत ५८४ गुणांची कमाई करीत मनूने तिसरे स्थान पटकावले. तसेच ईशाने ५८१ गुणांसह सातवे स्थान पटकावले. अंतिम फेरीमध्ये जर्मनीच्या डोरीन वेन्नेकॅम्प हिने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
ऐश्वर्य प्रताप सिंग याचे ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात पदक हुकले. चीनच्या डू लिंशू याने या प्रकाराच्या अंतिम फेरीत हंगेरीच्या इस्तवान पेनी याच्यावर १६-१० असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.