जगज्जेत्या कार्लसनच्या व्यूहरचनेस कर्जाकिनचा धक्का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कार्लसन - कर्जाकिन यांच्यातील तिसरा डाव बॉक्‍सिंग लढतीसारखा दिसत होता. जणू काही कार्लसन सातत्याने ठोसे देण्याचा प्रयत्न करीत होता; तर कर्जाकिन ते चुकवत कार्लसनला निराश करीत होता.

- सुसान पोल्गर, माजी जगज्जेती 

न्यूयॉर्क - जगज्जेतेपद बुद्धिबळ लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर घट्ट पकड घेण्यात मॅग्नस कार्लसन वाकबगार आहे; पण नेमका त्याच्या या कौशल्यास आव्हानवीर सर्गी कर्जाकिन धक्का देत आहे. एकूण १२ डावांच्या या लढतीतील तिसरा डावही बरोबरीत सुटला; पण तब्बल सात तास चाललेला हा डाव कर्जाकिनची क्षमता दाखवणाराच होता.

कर्जाकिनच्या रुय लोपेझ बर्लिन बचावात्मक पद्धतीस सामोरे जाताना कार्लसनने डावाच्या अंतिम टप्प्यात अश्‍व जास्त सक्रिय केला. त्याने कर्जाकिनला ३५ व्या चालीत प्यादे गमावण्यास भाग पाडत हुकुमतही राखली; पण त्यानंतर कर्जाकिनने कडवा प्रतिकार केला. त्यामुळे कार्लसनला बाजू चांगलीच भक्कम करता येईल, अशा संधी साधण्यात अपयश आले. अखेर त्याने बरोबरी मान्य केली.

बर्लिन डिफेन्स पद्धतीने झालेल्या या डावात कार्लसनने हत्तीच्या दोन सलग आगळ्या चाली करीत अनेकांना धक्का दिला. या वेळी त्याने त्याचाच उंट रोखला. कार्लसनने पत्रकार परिषदेत या वेळी हत्ती हातातून निसटल्याचे सांगितले; पण कर्जाकिनने त्यात काही नवेपणा नव्हता, असे सांगत कार्लसनला धक्का दिला.

पहिल्या दोन डावांप्रमाणेच विसाव्या चालीपर्यंत बहुतेक मोहरांची अदलाबदल झाली होती; पण याच सुमारास खरी लढत सुरू झाली. कार्लसनच्या हत्ती, अश्‍व व प्याद्यांना कर्जाकिनचे हत्ती, उंट व प्यादी आव्हान देत होते. या वेळी कार्लसनचे अश्‍व मोक्‍याच्या ठिकाणी होते. त्याने ते अपेक्षेनुसार जास्त सक्रियही केले. काही वेळातच तो कर्जाकिनचे प्यादे जिंकत आक्रमण करणार, असेच दिसू लागले. चिवट कार्याकिन हार मानण्यास तयार नव्हता. त्याने कार्लसनला पूर्ण वर्चस्व मिळू दिले नाही; पण त्याला खेळाची वेळेशी सांगड घालता येत नव्हती.

कार्लसन उंट जिंकत विजय मिळवणार, असे दिसू लागले. या वेळी कर्जाकिनने तो उंट वाचवण्याचा प्रयत्न न करता सुरक्षित मोहरी अधिक भक्कम केली. त्याच्या या चालीने कार्लसनला धक्का बसला. जगज्जेत्याने प्रयत्न सोडले नाहीत; पण कर्जाकिनचे पुढे सरसावलेले प्यादेही कार्लसनला स्वस्थता देत नव्हते. अखेर त्याने बरोबरी मान्य केली.

Web Title: World's configuration karjakin shock carlsen