
WPL 2023 Meg Lanning : डी. वाय. पाटीलवर पुन्हा 200 चा तडाखा! लेनिंगच्या वादळात यूपीचा झाला पाला पाचोळा
WPL 2023 DCW vs UPW : दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 211 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीकडून सलामीवीर मेग लेनिंगने 70 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर जेस जोनासेनने 20 षटकात नाबाद 42 तर जेमिमाहने 22 चेंडूत नाबाद 34 धावा करत तिला चांगली साथ दिली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी रचत संघाला 211 धावांपर्यंत पोहचवले.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या यूपी वॉरियर्सचा हा निर्णय दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर मेग लेनिंग आणि शफाली वर्मा यांनी उलटा पाडला. या दोघींनी पॉवर प्लेमध्ये जवळपास 10 च्या सरासरीने धावा करण्यास सुरूवात केली.
मेग लेनिंगने आक्रमक फटकेबाजी करत हिरव्या गार खेळपट्टीवरही यूपीच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघींनी 6.3 षटकात 67 धावांची सलामी दिली. अखेर ताहिला मॅग्राथने शफालीला 17 धावांवर बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला.
मात्र दुसऱ्या बाजूने लेनिंगने आपला दांडपट्टा सुरू ठेवत दिल्लीला 9 षटकात 87 धावांपर्यंत पोहचवले. लेनिंगने 34 चेंडूत नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र मार खाणाऱ्या यूपी च्या गोलंदाजांवर वरूण राजांना दया आली. अचानक पाऊस पडू लागल्याने खेळ थांबवण्यात आला.
यूपी वॉरियर्सने पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्यावर पुन्हा पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. एकलस्टोनने मारिझाने कापला 16 धावांवर बाद केले. दरम्यान, सलामीवीर मेग लेनिंगने 12 व्या षटकात दिल्लीला 112 धावांवर पोहचवले होते. मात्र गायकवाडने लेनिंगला 70 धावांवर बाद करत दिल्लीला तिसरा धक्का दिला. ईस्माईलने दिल्लीच्या 10 चेंडूत 21 धाा करणाऱ्या एलिस कॅप्सीला बाद केले.
जेमिमाह रॉड्रिग्ज आणि जेस जोनासेन यांनी पाचव्या विकेटसाठी 34 चेंडूत 67 धावांची नाबाद भागीदारी रचत दिल्लीला 20 षटकात 211 धावांपर्यंत पोहचवले. जोनासेनने आक्रमक फलंदाजी करत 20 चेंडूत 42 धावा चोपल्या. तर जेमिमाहने तिला 22 चेंडूत नाबाद 34 धावा करत चांगली साथ दिली.
हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर