WPL 2023 DCW vs UPW : दिल्लीने यूपीला दिली 42 धावांनी मात, साजरा केला सलग दुसरा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Premier League 2023 DCW vs UPW

WPL 2023 DCW vs UPW : दिल्लीने यूपीला दिली 42 धावांनी मात, साजरा केला सलग दुसरा विजय

Women's Premier League 2023 DCW vs UPW : दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा 42 धावांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय साजरा केला. दिल्लीकडून मेग लेनिंगने धडाकेबाज 70 धावांची खेळी केली. यानंतर जेस जोनासेनने 20 चेंडूत नाबाद 41 धावा करत दिल्लीला 211 धावांपर्यंत पोहचवले. मात्र यूपी वॉरियर्सला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 169 धावांपर्यंतच मजल मारता आली. यूपीकडून ताहलिया मॅग्राथने 90 धावांची झुंजार खेळी केली. मात्र इतर फलंदाजांकडून तिला साथ मिळाली नाही.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 211 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीकडून सलामीवीर मेग लेनिंगने 70 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर जेस जोनासेनने 20 षटकात नाबाद 42 तर जेमिमाहने 22 चेंडूत नाबाद 34 धावा करत तिला चांगली साथ दिली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी रचत संघाला 211 धावांपर्यंत पोहचवले.

यूपी पराभवाच्या छायेत

 31-3 : यूपीचा आक्रमक प्रयत्न मात्र..

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेस जोनासेनने एकाच षटकात 24 धावा करणारी एलिसा हेली आणि किरण नवगिरेला (2) बाद करत दोन धक्के दिले. यानंतर श्वेता शेरावतला मारिझाने काप्पने 1 धावेवर बाद करत यूपीची अवस्था 3 बाद 31 धावा अशी केली.

 दिल्लीच्या 20 षटकात 4 बाद 211 धावा 

जेमिमाह रॉड्रिग्ज आणि जेस जोनासेन यांनी पाचव्या विकेटसाठी 34 चेंडूत 67 धावांची नाबाद भागीदारी रचत दिल्लीला 20 षटकात 211 धावांपर्यंत पोहचवले. जोनासेनने आक्रमक फलंदाजी करत 20 चेंडूत 42 धावा चोपल्या. तर जेमिमाहने तिला 22 चेंडूत नाबाद 34 धावा करत चांगली साथ दिली.

144-4 : शबनिम इस्माईलने दिला दिल्लीला चौथा धक्का

ईस्माईलने दिल्लीच्या 10 चेंडूत 21 धाा करणाऱ्या एलिस कॅप्सीला बाद केले.

112-3  : पावसानंतर दिल्लीला हादरे

यूपी वॉरियर्सने पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्यावर पुन्हा पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. एकलस्टोनने मारिझाने कापला 16 धावांवर बाद केले. दरम्यान, सलामीवीर मेग लेनिंगने 12 व्या षटकात दिल्लीला 112 धावांवर पोहचवले होते. मात्र गायकवाडने लेनिंगला 70 धावांवर बाद करत दिल्लीला तिसरा धक्का दिला.

सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबला. 

दिल्लीची सलामीवीर मेग लेनिंग यूपीच्या गोलंदाजांची धुलाई करत असतानाच वरूण राजाची यूपीच्या गोलंदाजांवर कृपा झाली. सामन्यात पावसाची सुरूवात झाल्याने सामना थांबवण्यात आला. सामना थांबला त्यावेळी दिल्लीने 9 षटकात 1 बाद 87 धावांपर्यंत मजल मारली होती. मेग लेनिंगने 34 चेंडूत नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

67-1 : शफाली वर्मा बाद, यूपीला दिलासा

दिल्ली कॅपिटल्सला सातव्या षटकात 67 धावांपर्यंत पोहचवणारी सलामी जोडी अखेर ताहलिया मॅग्राने फोडली. तिने शफाली वर्माला 17 धावांवर बाद केले.

दिल्ली कॅपिटल्सची दमदार सुरूवात

यूपी वॉरियर्सने हिरवी गार खेळपट्टी पाहून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीचे सलामीवीर मेग लेनिंग आणि शफाली वर्मा यांनी 5 षटकात 45 धावा चोपून त्यांचा हा निर्णय फोल ठरवला.

यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकली. 

डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध यूपी वॉरियर्स सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीला हिरव्या गार खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे.