
WPL 2023 : स्मृती मानधनाच्या RCBचा अजूनही संपला नाही खेळ; जाणून घ्या समीकरण
WPL 2023 RCB : वुमन्स प्रीमियर लीग 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फक्त हार, हार आणि हारच मिळत आहे. स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील RCBचा संघ विजयासाठी आसुसलेला दिसत आहे. या संघात अॅलिस पॅरी, हीदर नाइट, सोफी डिव्हाईन सारखे खेळाडू आहेत पण असे असूनही एकही विजय मिळवता आलेला नाही.
कालही आरसीबीला दिल्लीविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 150 धावा केल्या, प्रत्युत्तरात दिल्लीने 2 चेंडू आधी लक्ष्य गाठले. पाच सामन्यांमध्ये पराभव होऊनही हा संघ एलिमिनेटरपर्यंत पोहोचू शकतो.
दिल्लीकडून झालेल्या पराभवानंतर संघाची महत्त्वाची खेळाडू मेगन शुटने मोठे वक्तव्य केले. शुटने सांगितले की, त्याच्या संघाने मागील सामन्यातील चुका सुधारल्या पण जिंकण्यासाठी ते पुरेसे नव्हते. खेळपट्टी सपाट नसल्याने नाणेफेक गमावणे चांगले नव्हते. सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टी अवघड होती आणि जास्त डॉट बॉल्समुळे आमची अडचण वाढली.
मेगन शुटने या सामन्यानंतर आपली निराशा व्यक्त केली परंतु आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ एलिमिनेटरमध्ये कसा पोहोचू शकतो हे जाणून घ्या. आरसीबीचे अजून तीन सामने बाकी आहेत. जर या संघांनी हे तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि जर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्सविरुद्धचे सामने जिंकले. तसेच गुजरात संघाने यूपी वॉरियर्सचा पराभव केल्यास आरसीबीला संधी मिळू शकते.
गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघ चारही सामने जिंकून अव्वल स्थानावर आहे.
दिल्ली संघाने 5 पैकी 4 सामने जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे.
यूपी वॉरियर्स संघ 4 सामन्यात 2 विजय आणि 2 पराभवांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
गुजरात जायंट्सने 4 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत आरसीबीला अजून संधी आहे.