कुस्तीतील "द्रोणाचार्य' भागवत यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे - कुस्ती खेळातील पहिले द्रोणाचार्य भालचंद्र ऊर्फ "भाल' भागवत (वय 85) यांचे गुरुवारी अमेरिका येथे निधन झाले. त्यांच्या पाश्‍चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. 

पुणे - कुस्ती खेळातील पहिले द्रोणाचार्य भालचंद्र ऊर्फ "भाल' भागवत (वय 85) यांचे गुरुवारी अमेरिका येथे निधन झाले. त्यांच्या पाश्‍चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. 

पुण्यात जन्मलेल्या भालचंद्र भागवत यांचे शिक्षणही पुण्यातच झाले. घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाल्यामुळे त्यांनी या खेळात झटपट प्रावीण्य मिळविले होते. शालेयस्तरापासून त्यांनी कुस्तीची मैदाने गाजवायला सुरवात केली होती. 1948 ते 1955 या कालावधीत शालेय आणि आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्यांची जणू मक्तेदारीच होती. भागवत यांच्याबरोबर त्यांचे अन्य भाऊदेखील कुस्ती खेळातच पारंगत होते. आंतरमहाविद्यालयीन कालावधीत सलग अकरा वर्षे त्यांनी बॅंटमवेट गटातील विजेतेपद राखले होते. पुढे 192 मध्ये त्यांची हेलसिंकी ऑलिंपिकसाठी भारतीय संघात निवड झाली; पण दुर्दैवाने त्यांना त्या वेळी सहभागी होता आले नाही. त्यांची जागा तेव्हा खाशाबा जाधव यांनी घेतली होती. 

खेळाडू म्हणून सहभागी होण्याची संधी हुकल्यानंतरही ते खचले नाहीत. कुस्तीशी असलेली त्यांची नाळ जोडलेलीच राहिली. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक आणि पंच या दोन्ही आघाड्यांवर आपली ठसठशीत मोहोर उमटवली होती. पुण्यात गरवारे महाविद्यालयात 1959 ते 1962 शारीरिक शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर 1962 ते 1991 ते पतियाळात राष्ट्रीय क्रीडा संस्थेत कुस्तीचे मुख्य प्रशिक्षक होते. याच कालावधीत त्यांनी टोकियो (1964), मेक्‍सिको (1968), म्युनिक (1972) आणि दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत त्यांनी पंच म्हणूनही काम पाहिले. 

राष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक म्हणूनच आपले आयुष्य त्यांनी वेचले. इराणचे अमीर हमेदी यांना ते गुरुस्थानी मानत होते. त्यांनीच सर्वप्रथम त्यांना "भाल' म्हणून हाक मारली आणि पुढे कुस्ती विश्‍वात ते भाल भागवत म्हणूनच परिचित झाले. राष्ट्रीय क्रीडा संस्थेत तब्बल 12 वर्षे मुख्य कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी घडवलेल्या मल्लांनी सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉंझ अशी एकूण 160 पदके मिळविली. भारत सरकारने 1985 मध्ये क्रीडा मार्गदर्शकाला "द्रोणाचार्य' पुरस्कार देण्यास सुरवात केली. या पहिल्याच पुरस्काराचे भागवत मानकरी ठरले होते. 

Web Title: wrestler Bhagwat passes away