कुस्तीगीर नवीनला रिपेचेजसद्वारे संधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

प्राथमिक फेरीतच पराजित झालेल्या नवीन कुमारला रिपेचेजद्वारे असलेली पदकाची आशा सोडल्यास जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको रोमन प्रकारातील भारताची कामगिरी मागील पानावरूनच पुढे सुरू राहिली. या प्रकारातील दहापैकी नऊ कुस्तीगीर पदकाविनाच परतणार हे स्पष्ट झाले आहे. 

मुंबई : प्राथमिक फेरीतच पराजित झालेल्या नवीन कुमारला रिपेचेजद्वारे असलेली पदकाची आशा सोडल्यास जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको रोमन प्रकारातील भारताची कामगिरी मागील पानावरूनच पुढे सुरू राहिली. या प्रकारातील दहापैकी नऊ कुस्तीगीर पदकाविनाच परतणार हे स्पष्ट झाले आहे. 

नूर-सुलतान (कझाकस्तान) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात जागतिक पदकापेक्षा ऑलिंपिक पात्रतेची आशा जास्त होती, पण भारतीय त्यापासून दूरच राहिले. नवीन सलामीच्या क्‍यूबाच्या ऑस्कर पिंटो हिंडस्‌ याच्याविरुद्ध एकही गुण जिंकू शकला नाही, पण ऑस्करने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने ही लढत जिंकली तर नवीनला रिपेचेजद्वारे ब्रॉंझ जिंकण्याची, तसेच ऑलिंपिक पात्रता मिळवण्याची संधी असेल. 

ग्रीको रोमन प्रकारात आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी गुरप्रीत सिंगचीच म्हणता येईल. त्याने 77 किलो गटात ऑस्ट्रियाच्या मिशेल वॅगनर याला 6-0 असे हरवून चांगली सुरुवात केली, पण तो जागतिक क्रमवारीत दुसऱ्या असलेल्या व्हिक्‍टर नेमेस (सर्बिया) याच्याविरुद्ध पराजित झाला. नेमेसच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाने गुरप्रीतच्या आशा संपल्या. 

मनीषने 60 किलो गटात सुरुवातीच्या 0-3 पिछाडीनंतर फिनलंडच्या लॉरी जोहानेस माएहोनेने याला 11-3 हरवले. पण त्यापुढील फेरीत मोल्दोवाच्या व्हिक्‍टर सिओबानू याने त्याला एकही गुण जिंकू दिला नाही. व्हिक्‍टर उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाला आणि मनीषच्या रिपेचेजसच्या आशा संपल्या. 

विनेश फोगटसमोर खडतर आव्हान 
भारताची सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या विनेश फोगटची वाटचाल खडतर असणार आहे. तिला प्राथमिक ऑलिंपिक ब्रॉंझ विजेती सोफिया मॅटिसन तसेच दोन वेळची जागतिक विजेती मायु मुकैदा हिचे आव्हान असेल. या दोन लढती जिंकल्यास गतउपविजेती सारा हिल्देरब्रांद तिच्या मार्गात असेल. सीमा बिसला हिला दुसरे मानांकन असले, तरी ड्रॉ कठीणच आहे. या स्पर्धेचे रेसलिंगटीव्ही डॉट इनवर थेट प्रक्षेपण होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wrestler Naveen has a chance to won medal