WTC 2023: लंकेच्या पराभवासाठी भारतीयांचे देव पाण्यात! कोण जाणार फायनल मध्ये उत्सुकता शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC qualification scenario New Zealand vs Sri Lanka 1st test draw India in the WTC final india vs Australia cricket news in marathi kgm00

WTC 2023: लंकेच्या पराभवासाठी भारतीयांचे देव पाण्यात! कोण जाणार फायनल मध्ये उत्सुकता शिगेला

New Zealand vs Sri Lanka 1st Test : श्रीलंका- न्यूझीलंड यांच्यामधील पहिली कसोटी रंगतदार अवस्थेत येऊन थांबली. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने ११५ धावांची खेळी साकारल्यामुळे श्रीलंकेला दुसऱ्या डावात ३०२ धावा उभारता आल्या. त्यामुळे यजमान न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८५ धावांचे आव्हान उभे ठाकले.

न्यूझीलंडने रविवारअखेर १ बाद २८ धावा केल्या. त्यांनाअखेरच्या दिवशी विजयासाठी आणखी २५७ धावांची गरज आहे. श्रीलंकेला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी किवींचे ९ विकेट टिपण्याची आवश्यकता आहे.

जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने भारत- ऑस्ट्रेलिया व श्रीलंका-न्यूझीलंड या दोन महत्त्वाच्या मालिका सुरू आहेत. आज दोन्ही कसोटी लढतींचा अखेरचा दिवस असणार आहे. श्रीलंका - न्यूझीलंड यांच्यामध्ये आणखी एक सामना होणे बाकी आहे, पण आज भारतीय संघ जिंकला तर ऑस्ट्रेलिया भारत यांच्यामध्ये जागतिक स्पर्धेची अंतिम लढत होईल. मात्र भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील लढत ड्रॉ राहिली आणि श्रीलंकेने पहिल्या कसोटीसह दुसरी कसोटीही जिंकली, तर ऑस्ट्रेलियासमोर अंतिम फेरीत श्रीलंकेचे आव्हान असेल.

श्रीलंकेने ३ बाद ८३ या धावसंख्येवरून चौथ्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केली. मॅथ्यूजने सुरुवातीला दिनेश चंडीमलच्या (४२ धावा) साथीने १०५ धावांची आणि त्यानंतर धनंजया डिसिल्व्हाच्या (नाबाद ४७ धावा) साथीने ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. मॅथ्यूजने कसोटीतील १४ वे शतक दिमाखात झळकावले. त्याने २३५ चेंडूंचा सामना करताना ११ चौकारांसह ११५ धावांची दमदार खेळी केली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३०२ धावा उभारल्या. वॅगनर दुसऱ्या कसोटीमधून बाहेर न्यूझीलंडचा गोलंदाज नील वॅगनर दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका- पहिला डाव सर्व बाद ३५५ धावा आणि दुसरा डाव सर्व बाद ३०२ धावा (अँजेलो मॅथ्यूज ११५, धनंजया डिसिल्व्हा नाबाद ४७, ब्लेअर टिकनर ४ / १००) वि. न्यूझीलंड - पहिला डाव सर्व बाद ३७३ धावा आणि दुसरा डाव १ बाद २८ धावा.