वूर्केरी रमण महिला क्रिकेटचे प्रशिक्षक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या बहुचर्चित प्रशिक्षकपदासाठी माजी सलामीवीर वूर्केरी रमण यांची नियुक्ती बीसीसीआयने जाहीर केली. आयपीएलमध्ये बंगळूर संघाचे प्रशिक्षकपद सोडण्यास नकार दिल्यामुळे गॅरी कर्स्टन यांचे नाव या शर्यतीत मागे पडले.

मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या बहुचर्चित प्रशिक्षकपदासाठी माजी सलामीवीर वूर्केरी रमण यांची नियुक्ती बीसीसीआयने जाहीर केली. आयपीएलमध्ये बंगळूर संघाचे प्रशिक्षकपद सोडण्यास नकार दिल्यामुळे गॅरी कर्स्टन यांचे नाव या शर्यतीत मागे पडले.

आक्रमक फलंदाजी करणारे माजी सलामीचे फलंदाज, ५३ वर्षीय रमण सध्या बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फलंदाजीचे सल्लागार आहेत. रमण ११ कसोटी आणि २७ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. सध्याच्या घडीला ते देशातील सर्वांत प्रशिक्षित प्रशिक्षक आहेत. त्यांनी रणजी क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडू आणि बंगालला प्रशिक्षण दिले आहे. तसेच, काही काळ त्यांनी १९ वर्षांखालील संघाचीही जबाबदारी स्वीकारली होती. १९९२-९३ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शतक करणारे रामन पहिले भारतीय खेळाडू होते.

कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या निवड समितीने गॅरी कर्स्टन, रामन आणि वेंकटेश प्रसाद यांची नावे बीसीसीआयकडे पाठवली. बीसीसीआयने रमण यांना पसंती दिली. 

निवड समितीने तीन नावे आमच्याकडे दिल्यावर कर्स्टन यांना आमची पसंती होती; परंतु आयपीएलमधील बंगळूर संघाचे प्रशिक्षकपद सोडण्यास ते तयार नव्हते, त्यामुळे त्यांचा विचार आम्ही केला नाही आणि रमण यांना पसंती दिली, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण २८ जणांनी अर्ज केले होते. त्यामध्ये वेंकटेश प्रसाद, मनोज प्रभाकर, ट्रेंट जॉन्स्टन, दिमित्री मस्कारेन्हास, ब्रॅड हॉग आणि कल्पना वेंकटचर यांचा समावेश होता. शॉर्ट लिस्टनुसार आज तीन जणांच्या मुलाखती झाल्या. कर्स्टन यांची मुलाखत स्काइप आणि फोनवरून झाली. कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्रसिंह धोनीच्या संघाने विश्‍वविजेतेपद मिळवलेले असल्यामुळे त्यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आले होते. 

कर्स्टन हे २००८ ते २०११ या काळात भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. भारतीय संघाच्या नेहमीच असलेल्या भरगच्च कार्यक्रमामुळे कुटुंबासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण देत त्यांनी मुदतवाढ घेतली नव्हती. त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत ते दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक होते.

पोवार शर्यतीतून अगोदरच बाहेर
महिला प्रशिक्षकपदाची सर्वांत जास्त चर्चा झालेले रमेश पोवार यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. निवड समितीने त्यांच्याशी चर्चाही केली; परंतु शॉर्ट लिस्टमध्ये त्यांचा समावेश केला नाही. या निवड समितीसह बीसीसीआयचीही पोवार यांची फेरनिवड करण्याची इच्छा नसल्याचे समजते. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्याबरोबर प्रशासकीय समितीच्या डायन एडल्जी मात्र पोवार यांच्या फेरनियुक्तीसाठी इच्छुक होत्या.

Web Title: WV Raman named Indian women cricket team new head coach