विराटची बॅट काय करू शकते, हे पाहिले का?

गुरुवार, 31 जानेवारी 2019

विराटची फलंदाजी आणि त्याची शतके ही भारतीय संघासाठी सर्वांत बलशाली का आहे, हे आज न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पाहून दिसले.

हॅमिल्टन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली अन् तिथेच भारतीय संघाचा फलंदाजीचा कणा निखळला की काय अशी स्थिती निर्माण झाली. नेमके हेच चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले. पण, विराटची बॅट घेऊन मैदानात उतरलेल्या युझवेंद्र चहलने सर्वाधिक (18 धावा) केल्या.

विराटची फलंदाजी आणि त्याची शतके ही भारतीय संघासाठी सर्वांत बलशाली का आहे, हे आज न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पाहून दिसले. विराटने एकहाती अनेक सामने जिंकून दिले आहेत. तसेच त्याची शतके ही भारतासाठी कायमच विजय मिळवून देणारी ठरली आहे. आगामी विश्वकरंडकापूर्वी विराटला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला. भारताने पहिले तीन सामने जिंकून मालिका जिंकल्यामुळे विराटऐवजी रोहितकडे कर्णधारपद देण्यात आले. पण, भाऱतीय फलंदाजी विराटच्या अनुपस्थितीत आणि ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीपुढे पूर्णपणे ढेपाळली.

सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तर, शुभमन गिल या युवा खेळाडूलाही चमक दाखविता आली नाही. कागदावर वाघ असलेले भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे नांगी टाकली. अखेर फिरकी गोलंदाजीच्या गोलंदाजीच्या जाळ्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडकविणारा युझवेंद्र चहल विराटची बॅट घेऊन फलंदाजीस उतरला आणि त्याने चक्क कमालच केली. एरव्ही कधी फलंदाजीची संधी मिळत नसलेल्या चहलने विराटची बॅट घेऊन न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना केला आणि दोन चौकारासह संघाकडून सर्वाधिक 18 धावा केल्या. त्याच्या या धावांमुळे भारतीय संघावरील सर्वांत कमी धावसंख्येत बाद होण्याची नामुष्की दूर झाली. समालोचकांकडूनही विराटच्या बॅट घेऊन खेळायला आलेल्या चहलची जोरदार चर्चा करण्यात आली. भारताला या सामन्यात आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuzvendra Chahal uses Virat Kohali s bat