अशी लग्नपत्रिका पाहिली का कधी?

किरण चव्हाण
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

शाही विवाह सोहळे करायच्या नादात परिस्थिती नसतानाही निव्वळ दिखाव्याच्या हव्यासापोटी बराच आर्थिक तोटा काहींना सहन करावा लागतो. म्हणूनच या सर्व थाटामाटाला व वायफळ खर्चांना भेदणारा रोहित लटके व अनुराधा काळे यांचा 20 जानेवारी 2020 रोजी आगळावेगळा विवाह माढ्यात होणार आहे.
 

माढा : विवाह सोहळा व लग्नपत्रिकेबाबत अनेकजण खूपच ट्रॅडिशनल आहेत. मात्र केवड (ता. माढा) येथील रोहित लटके या माढ्यातील इन्स्पायर फाउंडेशनच्या पर्यावरण दूताने लग्नामध्ये विवाह समारंभ, विवाह सोहळे, रॉयल वेडिंग्ज, शाही विवाहबंधन वगैरे प्रत्यक्ष अथवा टीव्हीवर पाहात आलेल्या झगमगीत विवाह सोहळ्यांचे अनुकरण न करता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी, छत्रपती शिवाजी महाराजांचे झाडांबद्दलचे आज्ञापत्र, स्वच्छ भारत अभियान व मुलांच्या बाबतीत पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित भवितव्य देणे यांसारखे संदेश लिहिलेली लग्नपत्रिका तयार केली आहे. प्रत्यक्ष विवाह सोहळ्यात पर्यावरण संवर्धन जागरूकतेबाबतचा माहितीपट प्रोजेक्‍टरवर दाखवण्यात येणार असल्याने या विवाहाची लग्नपत्रिका, विवाह सोहळा पर्यावरणाभोवती फिरणारा ठरणार आहे.

Image may contain: 5 people, people smiling

हेही वाचा : बेफिकीर प्रशासनाचा नमुना सत्तर फूट रोड!

 

शाही विवाह सोहळे करायच्या नादात परिस्थिती नसतानाही निव्वळ दिखाव्याच्या हव्यासापोटी बराच आर्थिक तोटा काहींना सहन करावा लागतो. म्हणूनच या सर्व थाटामाटाला व वायफळ खर्चांना भेदणारा रोहित लटके व अनुराधा काळे यांचा 20 जानेवारी 2020 रोजी आगळावेगळा विवाह माढ्यात होणार आहे.
लग्नपत्रिका म्हटलं की त्यावर नेतेमंडळींचे फोटो आले, पत्रिकेच्या आत पानं भरून कार्यवाहकांची नावे, पै-पाहुण्यांची नावे, नुसतीच लुडबूड म्हणून बालचमूंची भरमसाट नावे पाहायला मिळतात. परंतु, नवरदेव रोहित लटके यांनी त्यांच्या लग्नपत्रिकेवर समाजाला संबोधित करणारे विविध समाजोपयोगी संदेश उद्‌बोधकपणे रेखाटले आहेत. पत्रिकेच्या मुखपृष्ठावरच वंदनीय राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सुबक प्रतिमांसह जिजाऊवंदना आहे व टीम इन्स्पायर फाउंडेशनचे ब्रीदवाक्‍य Lets plant tree in the mind अर्थात "मनामनांत झाड लावूया' याचा समावेश आहे. आतील आमंत्रण पृष्ठावर सर्व समाजसुधारकांच्या प्रतिमा आहेत. मुख्य आमंत्रण पृष्ठावरच वधू-वराची नावे ही स्वच्छ भारत अभियानाचे सूचक चिन्ह म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा गांधींच्या चष्म्याच्या वर्तुळात लिहून सोबत "एक कदम स्वच्छता की ओर' हा संदेश दिला आहे. नेत्रदान श्रेष्ठदान, रक्तदान श्रेष्ठदान हे संदेश, पाण्याचे महत्त्व सांगणारे जलचिन्ह, "जल है तो कल है' हे घोषवाक्‍य, सर्व शिक्षा अभियान मोहिमेचे "सारे शिकूया पुढे जाऊया' हे घोषवाक्‍य सचित्र देऊन खाली लिखावटीच्या पाट्या दर्शविल्या आहेत.

हेही वाचा : तर सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या "इतकी' होणार

लग्नपत्रिकेच्या चौथ्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे 348 वर्षांपूर्वीचे महाराजांच्या अस्सल सही-शिक्‍क्‍यासह व त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरासह प्रस्तुत केलेले शके 1593 अर्थात साल 1671 मधील राजदंडयुक्त आज्ञापत्र प्रसिद्ध केले आहे. महाराजांनी त्यांच्या समुद्री आरमार प्रमुखांना पाठवलेल्या या आज्ञापत्रात महाराजांनी वृक्षांच्या/झाडांच्या व पर्यावरणाच्या आत्यंतिक महत्त्वाला अधोरेखित केले आहे. शिवाय, लग्नादिवशी मंगल कार्यालयातच आलेल्या लोकांना व वऱ्हाडी मंडळींना पर्यावरण व वृक्षसंवर्धनावर तयार केलेली चित्रफीत प्रोजेक्‍टरद्वारे दाखवून इन्स्पायर फाउंडेशनतर्फे वऱ्हाडी मंडळींचे प्रबोधन करण्यात येणार आहे. सध्या ही लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची "खिचडी'

हळदी दिवशीच लावणार पत्नीचे एक झाड
माढ्यातील इन्स्पायर फाउंडेशनच्या पर्यावरण प्रबोधनाच्या कृतीयुक्त उपक्रमातून मला लग्नपत्रिका व विवाहावेळी प्रबोधनाचा माहितीपट दाखविण्याची प्रेरणा मिळाली. घरात नऊ सदस्य असून प्रत्येकाचे एक झाड अंगणात लावले आहे. हळदी दिवशीच पत्नीचे म्हणून एक झाड लावणार आहे.
- रोहित लटके (केवड, ता. माढा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ever seen such a marriage card