PHOTOS : थ्रीडी कलाकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा...

सलोनी जाधव
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

थ्रीडी हा कलाप्रकार पाश्‍चिमात्य देशात खूप लोकप्रिय आहे. त्याची एक वेगळीच गंमत असते. आपल्याकडेही हा कलाप्रकार रुजावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करावे लागणार आहे. 
 

लहानपणापासूनच चित्रकलेची आवड. त्यामुळे पुढे जाऊन या क्षेत्रातच करिअरचा निर्णय घेतला. शाळेत चित्रकलेत भरपूर बक्षिसेही मिळवली. ॲनिमेशन करत पेंटिंग शिकले. पेन्सिल शेिडंग, कलर पेंटिंग शेडिंग, ॲक्रॅलिक कलर, ऑईल पेंटिंग शिकले; पण सर्वात आवडीचं आहे ते थ्रीडी पेंटिंग. 

एखाद्या वस्तूच्या प्रतिकृतीचा थ्री डायमेन्शनल आविष्कार म्हणजे थ्रीडी पेंटिंग. आपण थिएटरमध्ये थ्रीडी सिनेमा पहायला जातो तेव्हा आपल्याला एक चष्मा दिला जातो. तो घातल्याशिवाय आपल्याला थ्रीडी आविष्काराचा अनुभव घेता येत नाही. पण, जेव्हा आपण तो घालतो तेव्हा ती वस्तू किंवा व्यक्ती तेथेच असल्याचा आभास निर्माण होतो. हाच प्रकार थ्रीडी पेंटिंगमध्येही महत्त्‍वाचा ठरतो.

थ्रीडी पेंटिंग म्हणजे...

थ्रीडी पेंटिंग केल्यानंतर प्रत्यक्ष ते बघितले तर थ्रीडीचा आभास होत नाही. मात्र, आपण ती मोबाईल कॅमेऱ्यातून बघतो तेव्हा ती वस्तू प्रत्यक्ष उभी असल्याचा भास होतो. 

थ्रीडी आर्ट एक सेल्फी पॉईंट....

सध्या जगभरात थ्रीडी पेंटिंगला खूप मोठी मागणी आहे. त्यामुळे या क्षेत्रात माहिर असणाऱ्या कलाकारांनाही मोठी मागणी आहे. पाश्‍चिमात्य देशात सार्वजनिक ठिकाणी या कला प्रकाराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या थ्रीडी आर्ट एक सेल्फी पॉईंट झाला असून लोकांना आपले फोटो काढायला खूप आवडते. ही थीम घेऊन आम्ही थ्रीडी कलाकृतींचे प्रदर्शन केले. त्यासाठी थ्रीडी कलाकृती साकारल्या होत्या.

रसिकांचा या कलाकृतीला मोठा प्रतिसाद

एक शार्क मासा जमिनीतून बाहेर आल्याचा भास होत आहे, अशी मोठी रांगोळी काढली होती. रसिकांचा या कलाकृतीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्या ठिकाणी फोटोसेशनही रंगले. अशाच उपक्रमातून थ्रीडी हा कलाप्रकार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायला हवा, असे माझे स्पष्ट मत आहे.

पाश्चिमात्य देशात लोकप्रिय कला

थ्रीडी हा कलाप्रकार पाश्‍चिमात्य देशात खूप लोकप्रिय आहे. त्याची एक वेगळीच गंमत असते. आपल्याकडेही हा कलाप्रकार रुजावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करावे लागणार आहे. 
 सलोनी जाधव, थ्रीडी चित्रकार, कोल्हापूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fun With 3D Artwork By Saloni Jadhav