
नातीगोती : कुटुंबात मोकळेपणा हवा
- ऐश्वर्या खरे
कुटुंबव्यवस्था अनेक गोष्टींवर अवलंबून असते; पण त्यापैकी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पष्ट संवाद आणि तुमच्या कुटुंबीयांचं संगोपन. कुटुंबातील सदस्य एकमेकांबद्दलच्या भावना एकमेकांकडे मोकळेपणानं व्यक्त करीत असतील, तरच ते कुटुंब चांगल्या पद्धतीने राहू शकतं. तुमचं घरी संगोपन कसं होतं, त्यावरही ही गोष्ट अवलंबून असते. तुम्हाला आणि तुमच्या भावंडांना कुटुंबाकडून आदर्श, मूल्यं आणि संगोपन दिलं जातं, ते महत्त्वाचं असतं.
खरं सांगायचं तर मी माझ्या कुटुंबातील आवडत्या अशा एखाद्याच व्यक्तीची निवड करू शकत नाही. माझं सर्वांवरच खूप प्रेम आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं मला नेहमीच भक्कम पाठिंबा दिला असून, ते माझे बालपणापासून मित्रच राहिले आहेत. माझी आई माझी सर्वोत्तम मैत्रीण आहे. कोणत्याही प्रसंगात ती मला मदत करते. मी तिला माझी प्रत्येक गोष्ट सांगते. वडील हे माझे मोठे आधारस्तंभ आहेत. बहिणी म्हणजे मला मिळालेलं वरदानच आहे.

त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या बहिणी मला मिळाल्याच नसत्या. मी त्यांच्याबरोबरच मुंबईत आले. मी त्यांच्यात सर्वांत मोठी असल्याने मला त्यांची पूर्ण जबाबदारी स्वीकारताना थोडी धाकधूक वाटत होती; पण आम्ही तिघींनी मिळून सर्व काही सुरळीत पार पाडलं. त्या दोघी खूपच जबाबदार आणि समजूतदार असून, जीवनातील निर्णय घेण्यास सक्षम आहेत.
अनेकदा मी निराश होत असे आणि आई-वडिलांची आठवण येत असे, तेव्हा या दोघी माझ्यामागे भक्कमपणे उभ्या राहत. माझी एक आठवण अशी, की मला ‘झी रिश्ते’ पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळाला होता, तेव्हा त्या पुरस्कारासह माझं भव्य पोस्टर माझ्या वडिलांनी आमच्या भोपाळच्या घराबाहेर लावलं होतं. मला मिळालेल्या सर्वांत गोड सरप्राईझपैकी ते एक होतं. आम्ही सर्वजण एकमेकांशी अत्यंत मोकळेपणानं वागतो.
एकमेकांपासून दूर राहूनही आमच्यात परस्परांबद्दल अतीव प्रेम आहे. आम्ही अनेक सणांना एकत्र येण्याचा प्रयत्न करतो; पण कधी-कधी चित्रीकरणामुळे मला त्यांची भेट घेता येत नाही. अलीकडे माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र फिरायला गेलो होतो. तिथे आम्ही खूप मजा केली. सध्या मी ‘झी टीव्ही’ वरील ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारत आहे.
मी कुटुंबापासून दूर राहू लागले, तेव्हा कुटुंब किती महत्त्वाचं असतं, त्याची मला जाणीव झाली. मुंबईतील सुरवातीचे दिवस माझ्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी खूप अवघड गेले. कारण, तोपर्यंत आम्ही पालकांपासून वेगळे राहिलेलोच नव्हतो. आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्या नसण्याची थोडीफार सवय झाली आहे. दुसरं असं की, माझ्या पालकांनी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित आणि आरामदायक ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना शक्य होतं, तेव्हा ते इथे येऊन राहतात किंवा मी कधी तिकडे जाते.
नाती दृढ राहण्यासाठी...
माझ्या मते दुसऱ्यांशी संवाद हीच सर्वांत प्रमुख आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कुटुंबीयांशी तुम्ही संवाद साधाल, तितकं तुमचं नातं दृढ होत जाईल.
दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरा तुम्हाला काही सांगत असतो, तेव्हा त्याच्या बोलण्यात अडथळा न आणता किंवा त्याला गृहीत न करता त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. सहानुभूती दाखवा आणि त्यांच्या भावना समजून घ्या.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)