नातीगोती : एकमेकांवर विश्‍वास हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relations

मला वाटते की, कुटुंबव्यवस्था ही विश्वास, प्रेम, स्नेह आणि आपण आपल्या माणसांसाठी किती वेळ काढतो या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.

नातीगोती : एकमेकांवर विश्‍वास हवा

- चारुल मलिक

मला वाटते की, कुटुंबव्यवस्था ही विश्वास, प्रेम, स्नेह आणि आपण आपल्या माणसांसाठी किती वेळ काढतो या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. आपण इतरांना जेवढे प्रेम देऊ, त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला समोरून प्रेम मिळते.

माझी बहीण पारुल ही माझ्या हृदयाजवळची आहे. ती सर्वच बाबतीत एकदम उत्तम आहे. पारुल वेगवेगळी नाती खूप छानपणे जोपासते. एक आई, मुलगी, बहीण, पत्नी या सगळ्या नात्यांना ती परफेक्ट आहे. लहानपणापासून ती खूप दानशूर स्वभावाची आहे आणि तिला अजिबात कोणाबद्दलही मत्सर, ईर्षा किंवा द्वेष वाटत नाही. ती खूप मोठ्या मनाची आहे आणि मी खूप भाग्यवान आहे की, मी पारुलची बहीण आहे. तिच्याबद्दल एक आठवण अशी सांगता येईल की, आम्ही अकरावीत असताना मला आर्ट्‌समध्ये फाईन आर्ट्‌स असा विषय होता. त्यात माझ्या पेंटिंगचे असाईनमेंट पारुल रात्रभर जागून पूर्ण करायची, माझ्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे.

आमचं कुटुंब हे चारचौघांसारखं प्रेमळ आहे. आम्ही एकमेकांपासून दूर असल्यामुळे एकमेकांची फारच आठवण येते. कोणत्या तरी क्षणी कधी-कधी असा वाटतं की, कुटुंब एकत्र हवं होतं; पण मला एक गोष्ट फार आनंद देते, की ‘अँड टीव्ही’वरील ‘भाभी जी घर पर है!’ आणि ‘हप्पू की उलटन पलटन’ या दोन्ही मालिकांतील कलाकार व इतर सर्वजण माझ्या कुटुंबीयांप्रमाणेच आहेत.  या मालिकेत मी ‘रुसा’ची भूमिका साकारत आहे.

‘भाभीजी घर पर है’ कुटुंबामध्ये मी दोन वर्षांपूर्वी आले; परंतु मला असे वाटते की, माझे येथे वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत. गेली आठ वर्षे ही लोकप्रिय मालिका सुरू आहे, यासारखी आनंदाची गोष्ट आणखी काय असू शकते? आमच्या या कुटुंबाचे दोन हजार भाग नुकतेच पूर्ण झाले, त्या निमित्ताने आम्ही सोहळाही साजरा केला.

आमचं ठरलेलं आहे की, कुटुंबातील सर्वजण एकत्र आल्यावर प्रत्येक क्षण आनंदाने आणि उत्साहाने जगायचा. आम्ही वर्षातून एकदा भेटतो आणि खूप मज्जा करतो. जेवढ्या एकत्र गोष्टी करता येतील, त्या आम्ही सगळ्या करतो. आईला जाऊन सात वर्षं झाली, तेव्हा आता समजतं आहे, की कुटुंबानं एकत्र राहणं किती गरजेचं आहे.

मला आजही आठवतं, की आई आम्हाला बोलवायची, की ‘घरी या!’; पण आम्ही सतत कामामध्ये व्यग्र असल्यामुळे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष झाले. तिला ब्रेन ट्युमर झाल्याचे कळलं, तेव्हा आम्ही जॉब सोडून आईकडे एकत्र आलो, तिची जमेल तेवढी सेवा केली, तिचं ऑपरेशन झालं, तेव्हा तिची काळजी घेतली. आज तिची खूप आठवण येते. मी तर असं म्हणीन, की, सर्वांनी एकत्र राहावं. नातेसंबंध चांगले राहण्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नसते, फक्त नात्यांमध्ये प्रेम आणि पारदर्शकता असेल, तर सगळी नाती चांगली राहतात. 

नाती दृढ होण्यासाठी....

१) कुटुंबात सर्वांशी नम्रपणे राहावे.

२) नेहमी कुटुंबावर अपरंपार प्रेम करावे. 

३) नात्यांमध्ये बोलण्यात व वागण्यात संयमितपणा आणि आदर असावा. 

४) एकमेकांसाठी नेहमीच वेळ द्यावा व गरजेनुसार उपलब्ध असावे.

५) आपल्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य द्यावे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

टॅग्स :Relationslifestyletrust