पाल आणि झुरळांची भीती वाटते? करा घरगुती उपाय

टीम ईसकाळ
Saturday, 26 September 2020

जीवजंतूचा वावर आरोग्याच्या दृष्टीने घातक असतो. यांच्यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते. विशेषत: पाल बरेचदा घराच्या भिंतीवर आढळून येते. आणि झुरळ कीचनमध्ये धुडगुस घालत असतात. काही घरगुती उपाय केल्यास पालीला अटकाव करता येऊ शकतो.

नागपूर : घरामध्ये कितीही स्वच्छता केली तरी देखील अनेक निरनिराळ्या प्रकारच्या जीवजंतू, किटक आणि किड्यांचा घरामध्ये प्रादुर्भाव होतो. यामध्ये पाल आणि झुरळ अग्रक्रमाने आढळतात. या जीवजंतूचा वावर आरोग्याच्या दृष्टीने घातक असतो. यांच्यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते. विशेषत: पाल बरेचदा घराच्या भिंतीवर आढळून येते. आणि झुरळ कीचनमध्ये धुडगुस घालत असतात. काही घरगुती उपाय केल्यास पालीला अटकाव करता येऊ शकतो.

काळी मिरी
जेवणात वापरल्या जाणाऱ्या काळ्या मिरीची पूड करुन ती एका बाटलीत भरा. त्यामध्ये पाणी आणि साबण मिसळून पाल असलेल्या सर्व कोपऱ्यांमध्ये ते पाणी स्प्रे करा. यामुळे पाली दूर होतात.

कांद्याचा रस
कांद्याची पेस्ट करावी. ती पेस्ट गाळून त्याचे पाणी एका स्प्रेच्या बाटलीत भरुन ज्या ठिकाणी पाली येतात. त्याठिकाणी स्प्रे करावे.

अंड्याची टरफले
पालींना घालवण्यासाठी पाली असलेल्या ठिकाणी अंड्याची टरफले लटकवावी.

लसूण
कांदा आणि लसणाचा रस एकत्र करुन त्याचा स्प्रे मारल्यानेही पाली दूर पळतात.

कॉफी पावडर
कॉफी पावडर सुद्धा पाली घालवण्यासाठी अतिशय उत्तम उपाय आहे. त्यासाठी कॉफी पावडर आणि पाण्याचे मिश्रण एकत्र करुन घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये लावून ठेवावे.

घरात झुरळ होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, खाद्यपदार्थांवर झुरळ जाण्याची भीती सर्वांनाच असते. त्यामुळे कॉलरा, अतिसार असे अनेक आजार उद्भवू शकतात. हे रोग टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील झुरळे बाहेर घालवणे गरजेचे आहे, जाणून घेऊया झुरळ घालवण्यासाठी काही घरगुती उपाय

पुदीन्याचे तेल
झुरळे घालवण्यासाठी पुदीन्याचे तेल एक रामबाण उपाय आहे. याकरता पुदीना तेल हे नैसर्गिक कीटकनाशक आहे, यासाठी पुदीना तेल आणि पाण्याचे मिश्रण असलेला एक स्प्रे बनवू शकता.
बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशक फवारण्यांच्या तुलनेत हा स्प्रे आपल्या आरोग्यास हानिकारक नाही आणि तो मुले आणि जनावरांसाठी सुरक्षित आहे. आपण या स्प्रेचा वापर कारमधील झुरळांना मारण्यासाठी देखील करु शकता.

बेकिंग पावडर
एका भांड्यात समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिसळा. त्यानंतर त्यात पाणी घाला. आता हे मिश्रण झुरळ असलेल्या ठिकाणी शिंपडा. साखरेचा गोडपणा झुरळांना आकर्षित करेल आणि बेकिंग पावडर झुरळांना घराबाहेर पळवून लावू शकते.

लसूण, कांदा आणि मिरपूड
झुरळ लसूण, कांदा आणि मिरपूडच्या वासापासून दूर पळतात. या मिश्रणामध्ये मिरपूड झुरळ नष्ट करण्यास मदत करते. हा नैसर्गिक उपाय आपल्या घरातील झुरळ दूर करु शकतो.

बोरिक पावडर
बोरिक पावडर घरातील काही जागांवर टाकल्यास झुरळं घरातून पळ काढतात. पण, ही पावडर टाकताना काळजी घेणे गरजेचे आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont worry about sail and cockroch