
नेतृत्वगुणांची जोपासना
- डाॅ. जयश्री फडणवीस
निसर्गामध्ये नेता आणि त्याचे नेतृत्व याचे दर्शन आपल्याला सातत्याने होत असते. प्राण्यांमधे डोकावले तर आपल्या कळपाचे समर्थपणे नेतृत्व करणारी हत्तीण, तर आपल्या कानाने दिशादर्शन करून पुढे नेणारी काळविटांची नेता हीदेखील मादीच असते.
ती पुढे जायचे असल्यास आपले कान पुढील दिशेने वळवते. उजवीकडे, डावीकडे कान वळवत ती जाते. त्यानुसार तिचा कळपही जातो, हे वाचनात आले. आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या माळेचेही नेतृत्व त्यांचा नेता करत असतो.
आपणही जन्मापासून नेतृत्व अनुभवलेले आहे. कोणत्या ना कोणत्या नेत्याने आजवरचे आपले व्यक्तिमत्व घडवलेले आहे. सुरवात झाली ती आईच्या रूपाने. मग कुटुंबातील इतर माणसे, आपले गुरूजन, आपल्या व्यवसायात नोकरीत भेटणारे नेते; तसेच सामाजिक आयुष्यावर प्रभाव पाडणारे राजकीय नेते. उत्तम नेता इतरांमधील गुण ओळखून त्यांना त्यांच्या सर्वोच्च क्षमतेकडे घेऊन जातो.
अनेकांना नेतृत्व करण्याची; तसेच प्रेरणादायी नेता बनण्याची मनापासून इच्छा असते; पण त्याकरीता प्रत्येक नेत्याला आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नेतृत्वासाठी आवश्यक गुण आणि कौशल्यांचा विकास केला पाहिजे.
आत्मविश्वास : आपण ठरवलेली ध्येये आणि उद्दिष्टे; तसेच हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेण्याचा आत्मविश्वास नेत्यामध्ये असायला हवा. तो जर डळमळला, तर त्याची टीमही डळमळते. नेत्यावरचा विश्वास उडतो. व्यावसायिक नेत्याने आपल्या टीमला हा विश्वास निर्माण करून द्यावा लागतो, की जर कंपनीची ध्येये साध्य झाली, तरच त्यांची वैयक्तिक ध्येये साध्य होतील.
उत्तम संवादकौशल्य : संपूर्ण टीमला एकजीव बांधून ठेवण्याकरीता सतत विधायक संवाद करणे. रोजच्या संवादातून आपल्या ध्येयाकडे कोणत्या पद्धतीने जायचे, त्यात आपण कुठवर पोचलो आहोत हे सांगणे. कोणतीही अडचण आल्यास ‘मी पाठीशी आहे’ असे सांगून प्रोत्साहित करणे.
सहानुभूती : उत्तम नेता हा आपल्या टीममधील प्रत्येकाचे गुण, दोष; तसेच त्यांचा भावनिक बुद्ध्यांक ओळखून असतो. आपल्या टीममधील प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव करून देणे; तसेच त्यांच्या अडी-अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मार्गदर्शन करतो.
ध्येये आणि कामांची वाटणी :
आपल्या टीमची ध्येये आणि उद्दिष्टांची आखणी करणे. प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेनुसार, कुवतीनुसार कामांची वाटणी करणे. कामांची क्रमवारी लावून देणे. ती पार पाडण्याची जबाबदारी घेणे.
प्रामाणिकपणा : येथे नेत्याकडून प्रत्येक कामातील पारदर्शकता अपेक्षित आहे. एखाद्या कामाचे श्रेय स्वतःला मिळावे याकरीता ते लपवून ठेवून स्वतःच करत राहणे अपेक्षित नाही. कामे करताना काही चुकले, तर ती चूक प्रांजळपणे कबूलही करता आली पाहिजे. निश्चितच मनाचा मोठेपणा असायला हवा.
निर्णयक्षमता : कोणत्याही कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता नेत्यामध्ये अपेक्षित आहे. असे निर्णय घेताना आपल्या टीमचे; तसेच कंपनीचे कमीत कमी नुकसान होईल, याची काळजी नेत्याने घ्यायला हवी.
सर्जनशील, नावीन्यपूर्ण : आपली टीम; तसेच कंपन्यांच्या प्रगतीसाठी एखादे काम मिळवणे अथवा आपले प्रॉडक्ट नावीन्यपूर्ण असावे याकरिता नेता जर सर्जनशील असेल, तर अधिक फायद्याचे ठरेल.
आधी केले मग सांगितले : कोणत्याही कामाचा अनुभव आधी स्वतः घेऊन मग तो इतरांना सांगणे. एक चांगले उदाहरण समाजासमोर मांडणे गरजेचे आहे. लोकांनी स्वेच्छेने अनुकरण करावे असे नेतृत्व करा.
भावनिक बुद्धिमत्ता : कोणतेही महत्त्वाचे निर्णय भावनेच्या भरात घेता कामा नयेत. त्या निर्णयांना तत्त्व, शास्त्र; तसेच बुद्धीप्रामाण्यवादाची बैठक असणे आवश्यक आहे.
कृतज्ञता : आपली टीम, कंपनी; तसेच संस्था या सर्वांकडून मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाकरीता आणि त्यातून मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या फायद्यांकरीता एक कृतज्ञ भावना नेत्याच्या मनात कायम असायला हवी.नेत्यातील तीन उत्तम गुण नम्रता, स्पष्टता आणि धैर्य.