घरात एखादं लहान मुलं जन्मालं आलं की ते बाळ नेमकं कोणासारखं दिसतं यावर चर्चा सुरु होते. कोणी म्हणतं आईसारखं दिसतंय,तर कोणी म्हणतं वडिलांसारखं. पण सध्या सोशल मीडियावर अशा एका बाळाची चर्चा रंगली आहे, ज्याचा चेहरा हुबेहूब गणपती बाप्पाप्रमाणे दिसतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल, कारण या फोटोमध्ये दिसणारं बाळं अगदी गणपतीप्रमाणे दिसत असून त्याला सोंडदेखील आहे. काहींच्या म्हणण्यानुसार, ही बालगणेशाची मुर्ती आहे. तर काहींच्या मते, ही देवाची कृपा आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र, या फोटोमागील सत्य काही औरच आहे.
सोशल मीडियावर एका लहान बाळाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हे बाळ अत्यंत निरागसपणे डोळे मिटून शांतपणे झोपलं आहे. त्याचा चेहरा लोभसवाणा वाटत असला तरीदेखील त्याला सोंड आहे. त्यामुळे हे बाळ हुबेहूब गणपतीप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. परंतु, व्हायरल होत असलेला हा फोटो कोणत्याही बाळाचा नसून ती एक कलाकृती असल्याचं समोर आलं आहे.
ऑस्ट्रेलियामधील पॅट्रिशिया पिचिनिनि या कलाकाराने ही मुर्ती तयार केली आहे. २०१० मध्ये तयार करण्यात आलेल्या या मुर्तीचा फोटो ९ वर्षांनी म्हणजेच २९ नोव्हेंबर २०१९ मध्ये सोशल मीडियावर शेअर केला होता. सोबतच त्यांनी "न्यूबॉर्न, २०१० "असं कॅप्शन दिलं होतं. ही मुर्ती सिलिकॉन, फायबरग्लास आणि मानवी केस यांच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी विविध चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच पॅट्रिशिया पिचिनिनि या अनेक विविध आकाराच्या आणि संकल्पना घेऊन अशा भन्नाट मुर्ती किंवा कलाकृती तयार करत असल्याचं पाहायला मिळतं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.