‘पालन’गोष्टी : मुलांना देऊ योग्य दिशा faruk kajhi writes Give proper direction to children parenting education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parents

‘पालन’गोष्टी : मुलांना देऊ योग्य दिशा

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

‘काय उजेड पडलाय आपला? सगळ्या सोसायटीत मान खाली घालायची वेळ आणलीस,’ आई-बाबा बरसत होते आणि अंकुश ऐकून निमूट उभा होता. निकाल लागला होता. पुरता!

परीक्षा, शिक्षण आणि मार्क्सच्या गर्दीत आपण इतकं हरवून गेलोय, की आपण आपल्या मुलांवर अपेक्षा लादतच चाललो आहोत. इतक्या अपेक्षा, की मुलं त्याखाली दबून जात आहेत. घुसमटत आहेत. संवाद नाही, परिणामी मनातलं बोलायला कुणीही नाही आणि मुलं शेवटचा पर्याय निवडतात.

आपली मुलं आनंदी राहावीत, सुखात राहावीत ही अपेक्षा आई-वडील म्हणून अगदीच रास्त असते; पण या अपेक्षा आपल्या मुलांहून खरंच इतक्या मोठ्या असतात, की आपण आपल्या मुलांचाही विचार करत नाही. अशा वेळी पालक म्हणून आपण केवळ करिअर, पैसा, प्रतिष्ठा आणि समाजातील आपलं उच्च स्थान यांचाच जास्त विचार करत असतो. आणि अशावेळी आपण पालक म्हणून नापास झालेलो असतो.

‘यावेळी नाही मिळाले मार्क्स, तर एवढं नको मनावर घेऊ. आम्ही आहोत सोबत. आपण आणखी एक संधी घेऊ; पण तुला हे सर्व जमत असेल तर कर. उगीच ओझं नको घेऊ,’ आई-बाबा आरवला समजावत होते. आरव आतून खचला होता आणि आई-बाबा सोबत आहेत हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं.

प्रत्येक मूल वेगळं असतं, असं आपण नेहमीच वाचतो, ऐकतो; पण आपल्या मुलांच्या बाबतीत आपण हा नियम कधीच लागू करत नाही. आपण सर्व मुलांना एकाच तराजूत तोलत राहतो आणि शेवटी पश्चाताप करत राहतो. मागील एका लेखात आपण जबाबदारीची जाणीव आणि स्वातंत्र्य यावर बोललो होतो. तोच मुद्दा आपण इथं जोडून पाहू या. मुलांशी बोलून आपण त्यांना स्वातंत्र्य आणि जबाबदारी दोन्ही देऊ शकतो का? विचार जरूर करा. कारण आपल्या दृष्टीने मुलं खूप महत्त्वाची आहेत.

आपल्या मुलांशी आपलं नातं दृढ करताना काही गोष्टी आपणाला समजून घ्याव्या लागतील. त्यांचा थोडक्यात विचार इथं मांडतोय.

1) विश्वास : आपला मुलांवर आणि मुलांचा आपणावर विश्वास असायलाच हवा. आपण आपल्या घरात असं वातावरण ठेवतो का? मुलांना आपल्याविषयी खरंच विश्वास वाटतो का?

2) प्रेम : ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. आपल्या नात्याचं मूळ. हे नसेल तर प्रत्येक नातं पोकळ असतं.

3) संवाद : आपण एकमेकांशी सतत बोलत राहायला हवं. अडचणी, भीती बोलून दाखवायला हवी. संवाद ही आजची खूप मोठी गरज बनली आहे. मोबाईल आणि इतर समाजमाध्यमांच्या गर्दीत आपली जवळची माणसं दूर होत आहेत. आपलेपणा संपत चालला आहे. तो शोधावा लागेल.

4) स्पर्धा; पण नेमकी कशाची? : गुणांची स्पर्धा स्पर्धा असते का? आपल्या मुलांनी एक चांगला माणूस म्हणून आनंदाने आणि स्वाभिमानाने जीवन जगावं असं आपणाला खरंच वाटत नाही? पैसा हे सर्वस्व नाही, हे आपण मुलांना शिकवायला हवं. जगण्यासाठी पैसा लागतो; पण पैसा म्हणजे जीवन नाही.

5) समाधानी जीवन : काळ वेगवान झाला आणि आपण धावत सुटलो. धावता धावता अपणाला भौतिक सुख मिळू लागलं; पण समाधान? ते सापडलं? काही जण याला कालबाह्य म्हणतील; पण शेवटी समाधानच नसेल, तर जगण्यात काहीच अर्थ नाही.

6) मुलांसोबत असणं : आयुष्यात आपण मुलांच्या सोबत आहोत, हा विश्वास जर आपण मुलांना देऊ शकलो, तर मुलांना जीवन गमवावं लागणार नाही.