‘पालन’गोष्टी : छंदांचं आकाश नि अवकाश... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Parenting

‘उठ आधी! अभ्यास कर. चित्रं काढून कुणाचं पोट भरत नाही,’ बाबा ओरडले आणि कबीर गोंधळून गेला. त्याचा अभ्यास करून झाला होता.

‘पालन’गोष्टी : छंदांचं आकाश नि अवकाश...

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

प्रसंग १

‘उठ आधी! अभ्यास कर. चित्रं काढून कुणाचं पोट भरत नाही,’ बाबा ओरडले आणि कबीर गोंधळून गेला. त्याचा अभ्यास करून झाला होता. मग सारखं सारखं काय अभ्यास कर अभ्यास कर....आणि नुसता अभ्यास करून तरी पोट भरतं का?

प्रसंग २

‘तिला तिच्या बाबांची आठवण आली, की ती चिखलाच्या वस्तू बनवायला घेते. तिला आठवणींचा विसर पडतो आणि तिला बरं वाटायला लागतं,’ जोयाची आई सांगत होती. तिचे बाबा एका वर्षापूर्वी अपघातात गेले.

पहिला प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनातला अत्यंत सामान्य आणि नित्य अनुभवायला येणारा प्रसंग. मुलांना चित्रं काढायला आवडतात. ज्यांना चित्रं काढता येत नाहीत त्यांना चित्रं पाहायला तरी निश्चितच आवडतात. अशावेळी आपण पालक म्हणून त्यांच्यामागे पुस्तक घेऊन ‘अभ्यास कर, अभ्यास कर’ असा धोशा लावत असतो. ‘चित्रं काढण्यानं, गाणी गायल्यानं, नाचून, विनोद करून, कथा-कादंबरी वाचून, सायकल-मोटारसायकलवर भटकून पोट भरत नाही,’ हा फेमस डायलॉग आपण मुलांवर सतत फेकत असतो. याचा अर्थ जगणं म्हणजे केवळ पोट भरण्याची व्यवस्था लावणे असाच आणि असाच असतो, हेच आपण मुलांवर बिंबवत राहतो. पालक म्हणून आपली काळजी रास्त असते. मात्र, कोणताही छंद न जोपासता आपण जगत राहिलो तर ते जगणं खरंच जगणं ठरू शकतं, हा प्रश्न आपण स्वत:ला जरूर विचारला पाहिजे.

छंद का आवश्यक असतात? पैसा आला की सगळंच साध्य होतं का? छंद आपल्या जगण्यातील मोकळ्या जागा भरायला मदत करतात. स्वत:ला स्वत:ची ओळख करून देतात. आपल्याला आनंद आणि त्याच्यापुढे जाऊन समाधान कशात लाभतं, याचं उत्तर छंदच देतात. जगण्यापुरता पैसा झाला, की पुरेसा असतो. मात्र, त्याच्या हव्यासापायी आपण जगण्याच्या आनंदाला का मुकतो? विचारलाय का हा प्रश्न कधी स्वत:ला?

आता दुसरा प्रसंग आपणाला काय सांगतो? इथं केवळ आनंद नाही, तर जीवनात आलेल्या सर्वांत कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळही छंदांनीच पुरवलेलं दिसतं. मग असे छंद हे केवळ छंदच कसे असतील? त्यांत निश्चितच एवढी ताकद आहे, की ते तुम्हाला एक व्यक्ती म्हणून भावनांचं आणि ताणतणावांचं समायोजन करायला शिकवतात. जीवनात आनंद असेल, तर जीवन आनंदी आणि समाधानी राहील. आणि तो आनंद आपल्याला छंद देतात.

आपल्या मुलांसोबत आपणही आपले छंद जोपासायला हवेत. आपल्या हातून सुटून गेलेले काही क्षण पुन्हा चिमटीत पकडून आपल्या जीवनात आनंद पेरायला हवा. परंतु इथं मुलांना ‘असंच कर तसंच कर असं न म्हणता’ त्यांच्या मर्जीनं फुलण्याची संधी दिली पाहिजे. छंदांचं आकाश देताना अवकाशही दिला पाहिजे. अवकाशाचा अर्थ वेळ, जागा आणि सामर्थ्य असाही होतो. असा अवकाश मिळाला, की मग आपण मिळून विहार करू शकतो. चौकटबंद आयुष्यात छंदाची खिडकी उघडून तर बघा. तुमच्या आकाशाचा तुकडा तुमची वाट पाहतोय. त्यासाठी गरज आहे छंद ओळखण्याची आणि त्यासाठी अवकाश देण्याची.