‘पालन’गोष्टी : भय इथले संपत नाही... faruk kajhi writes parents family | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parents

‘पालन’गोष्टी : भय इथले संपत नाही...

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

‘अरे वेडाच आहेस. असं एकटं राहायला घाबरतात का? तू माझा स्ट्राँग बॉय आहेस ना?’

आईने समजूत घातली. परंतु अवी एकटा थांबायला तयार नव्हता. त्याला भीती वाटत होती. आई-बाबा आपल्याला एकट्याला सोडून निघून जातील याची.

मनुष्य नेहमीच कोणत्या न कोणत्या गोष्टींना घाबरत आला आहे. अगदी मोठे लोकही घाबरतात; पण मुलांच्या मनात भीती वेगवेगळी रूपं घेऊन वावरत असते. मुलांना सर्वाधिक भीती कशाची वाटते, असं आपण विचारतो, तेव्हा बहुतांश लोक ‘अंधाराची’ असं उत्तर देतात; पण अंधारापेक्षाही मुलांना सर्वाधिक भीती कशाची वाटत असेल तर ती असते ‘एकटं पडण्याची.’ आपले आई-बाबा आपल्यापासून दूर जातील आणि आपण एकटे पडू ही भीती भयंकर असते आणि मुलं त्यामुळे जास्त घाबरलेली असतात. त्यामुळे ‘तुला कुठंतरी सोडून येऊ’ असं मुलांना सांगताच ती आपलं सगळं ऐकायला तयार होतात. यामागे कारण असतं ते आपल्या आई-बाबांपासून दूर जाण्याची भीती.

‘सगळी मुलं माझी चेष्टा करतात. मला हसतात. मी नाही जाणार शाळेत.’ विजय रडून रडून सांगत होता. त्याच्या वर्गातील मुलं त्याला सतत चिडवत होती. त्याला काहीही बोलून परेशान करत होती.

हा प्रसंग बहुतांश मुलांच्या बाबतीत घडतो. काही मुलं बोलून दाखवतात, तर काही घरच्यांच्या भीतीमुळे बोलत नाहीत. आपला स्वीकार होणं ही मानवी गरज आहे. तो ज्या गटात वावरत असतो त्या गटात त्याचा स्वीकार होणे गरजेचे असते. तसं नाही झालं तर भीती मनाचा ताबा घेते आणि मुलांवर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

खरंतर आपल्या मुलांच्या मनात काही भीती आहे का, हे पालक म्हणून आपणाला माहीत असलं पाहिजे. कधी नापास होण्याची भीती, कधी चूक झाल्यावर शिक्षा होण्याची भीती, आपण काही करू शकत नाही ही न्यूनगंडात्मक भीती. हे आणि असे कित्येक भीतीचे प्रकार आपणाला माहीत असतील. तेव्हा आपल्या मुलांच्या मनात नेमकी कोणती भीती घर करून बसलीये हे पालक म्हणून आपण समजून घ्यायला हवं. आणि आपल्या मुलांशी बोलून आपण त्यांना वाटणाऱ्या भीतीची यादी करायला हवी. त्यामुळे आपल्या मुलांच्या मनातून ती भीती दूर करणं आपणाला जमू शकेल. मुलांशी संवाद साधत रहायला हवं. अशा सु-संवादामुळे मुलांच्या मनाच्या तळाशी दडून बसलेली भीतीही जाणून घेणं सहज शक्य होतं.

मूल घाबरत आहे म्हणजे ते घाबरट आहे असं लगेच ठरवून मोकळं होतो. लक्षात असू द्या, भीती सगळ्यांनाच वाटते. परंतु मुलांच्या मनात नेमकी कोणत्या स्वरूपाची भीती दडलेली आहे हे जाणून घेण्यासाठी आणि दडलेली भीती मनातून काढण्यासाठी आपल्याला आणखी ‘मूल’केंद्री व्हावं लागेल. मूलकेंद्री म्हणजे चिंतातूर पालक नव्हे. तर आपल्या मुलांना अधिकाधिक जाणणारा आणि समजून घेणारा पालक. त्यामुळे मुलांच्याविषयी आपल्या मनात असलेली अनाठायी भीतीही दूर होण्यास मदतच मिळेल.

टॅग्स :lifestylefamilyParents