
‘आधी ते दप्तर उचल. ते बूट तसेच टाकलेत. ते उचल आधी. आणि हा कसला कचरा करून ठेवलाय. तो उचल पहिल्यांदा,’ आई सांगत होती आणि धीरज गोंधळून ऐकत होता.
‘पालन’गोष्टी : टाळू सूचनांचा गोंधळ
- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक
प्रसंग १
‘आधी ते दप्तर उचल. ते बूट तसेच टाकलेत. ते उचल आधी. आणि हा कसला कचरा करून ठेवलाय. तो उचल पहिल्यांदा,’ आई सांगत होती आणि धीरज गोंधळून ऐकत होता.
डोक्यात एकच प्रश्न होता....‘‘आधी नेमकं काय करू?’
प्रसंग २
‘सर, हे गणित नाही सुटलं. समजावून द्या.’ गौरव सरांसमोर उभा होता.
‘हे बघ, आधी इथं वजाबाकी कर. मग त्यात ही संख्या मिळव. आता जे उत्तर येईल त्याची दुप्पट कर, मग येईल तुझं उत्तर.’’ गौरव गोंधळला. कारण, सरांनी जे काही सांगितलं ते सर्व डोक्यावरून गेलं.
आठवलं काही? हसू आलं ना! आता स्वत:ला धीरज आणि गौरवच्या ठिकाणी ठेऊन बघा. आई आणि सरांनी नेमकं काय सांगितलं आणि तुम्हाला त्यातलं काय आणि किती समजलं?
आपण मुलांना सूचना देत असतो, तेव्हा आपली घाई हे एक कारण असतं, की मुलांना आपण काय बोललो हे कळतच नाही आणि कळालं तरी पहिल्यांदा नेमकं काय करावं ते समजत नाही. अशा वेळी आपण काम नाही झालं म्हणून प्रचंड राग राग करतो, चिढतो, आदळाआपट करतो. आपण मोठे असल्याने आपणाला कुणी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही.
आपली मुलं जेव्हा एखादी गोष्ट ऐकतात, तेव्हा ती करताना त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. लहान असतील तर वेळ जास्त लागतो आणि मोठ्या मुलांना तो थोडा कमी लागू शकतो; पण आपण घाईघाईत इतक्या सूचना देऊन मोकळे होतो, की मुलं गोंधळून जातात. खरंतर सूचना देताना आपण हा विचार कधीच करत नाही, की आपण शांतपणे दिलेल्या सूचना मुलांना लवकर कळतील. तसेच टप्प्याटप्प्याने दिलेल्या सूचना या मुलांना समजून घ्यायला सहज शक्य असतात. तेव्हा त्यांना नेमकं काय आणि कधी करायचं आहे हे पक्कं ठाऊक झालेलं असतं.
आपण ओरडून केलेली सूचना मुलं ऐकतीलच असं नाही. मग सुरू होतं रागावणं, गोंधळ. अशा वेळी पालक, शिक्षक किंवा मुलांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या सूचना प्रथमत: कमी केल्या पाहिजेत. मोजक्या, नेमक्या सूचना मुलांना समजतील अशा भाषेत सांगायला हव्यात. त्याही घाईघाईत एकापाठोपाठ नव्हे, तर शांतपणे एकेक सूचना.
आपण जेव्हा सूचना देतो तेव्हा ती ऐकून, समजून घेऊन कृती
करायला प्रत्येक व्यक्तीला (मुलांनाही) कमीअधिक वेळ लागतो. काही मुलांना पटकन कळतं आणि काहीना थोडं उशिरा. उशीर झाला, की आपण लगेच त्यांना ‘मंद’, ‘मठ्ठ’, ‘ढ’ असे शेरे मारून मोकळे होतो. पण हे करण्याआधी आपण कारणं शोधणं टाळतो. कारण आपण जे सांगतो ते मुलांनी समजून घेतलंच पाहिजे आणि तसंच केलं पाहिजे ही धारणा एकदम घट्ट झालेली असते.
गरज कशाची आहे? तर आपल्या सूचनांची भाषा आणि पद्धत बदलण्याची. मुलांना वेळ तर द्या. काहीना जास्तीचा वेळ लागला तर थोडं थांबा. त्यांचं झालं, की मग पुढे जा. अशाने आपल्या मुलांना समजून कृती करायला काही अडचणी तर येत नाहीयेत ना? हे तरी आपणाला कळेल. आणि योग्य निदान आणि उपायांकडे आपली वाटचाल सुरु होईल. नाहीतर मुलं पटकन बोलतील, ‘‘अरे बाबा, काहे कन्फ्युज करते हो!’’