‘पालन’गोष्टी : पालकत्वाचा आरसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

parenthood

‘आपण आपल्या मुलांसाठी खरंच चंगले पालक आहोत का? आपण पालक म्हणून अजून जबाबदार असायला पाहिजे.’ रेहान बायकोला सांगत होता.

‘पालन’गोष्टी : पालकत्वाचा आरसा

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

प्रसंग १

‘आपण आपल्या मुलांसाठी खरंच चंगले पालक आहोत का? आपण पालक म्हणून अजून जबाबदार असायला पाहिजे.’ रेहान बायकोला सांगत होता.

‘खरंय! आपल्याला आपलं वागणं सारखं तपासून बघायला पाहिजे.’

प्रसंग २

‘अहो, तुम्ही मुलांना थोडा वेळ देत जा. रोहितचे बाबा जास्तीत जास्त वेळ देतात त्याला. तुम्ही थोडा वेळ काढा.’ सारंगची आई कळकळीने सांगत होती.

‘बघू. जमेल तसा वेळ काढतो,’ सारंगचे वडील रुक्षपणे म्हणाले.

साहित्यात ‘mirror and window’ अशी एक संकल्पना आहे. आपण जसे आहोत तसेच साहित्यात दिसायला हवं. म्हणजेच साहित्य आपला आरसा असतं. आपलं प्रतिबिंब पाहता पाहता इतरांचं काय काय सुरू आहे हेही आपण पाहायला हवं. म्हणजेच इतरांचं साहित्य, जगभरातलं साहित्य वाचत राहायला हवं. ती साहित्यातील खिडकी. ज्यातून आपण डोकावून बघू शकतो. नवीन जगाची ओळख करून घेऊ शकतो.

पालकत्वातही ही संकल्पना वापरली गेली पाहिजे. आपण पालक म्हणून कसे आहोत हे स्वत: पडताळून पाहणं म्हणजेच आरशात आपलं प्रतिबिंब पाहणं आणि इतर पालक काय काय करतात, त्यातलं आपण काय काय करून पाहू शकतो, कोणतं लागू पडेल, आपल्या आणि आपल्या मुलांसाठी काय काय योग्य आणि उपयुक्त आहे, हे सर्व जाणून घेणं म्हणजे खिडकीचा वापर करणं. (डोकावून पाहणं म्हणजे दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसणं नव्हे.)

प्रसंग १ हे पालकत्वाच्या आरशात आपलं प्रतिबिंब पाहण्याचं उदाहरण आहे. आपण कसे पालक आहोत? कडक? शिस्तबद्ध? हुकूमशहा? प्रेमळ? आपण आपलं प्रतिबिंब पाहायला हवं. आपल्या चुका, आपल्यातील चांगल्या गोष्टी यांची ओळख व्हायला त्यामुळे मदतच होते. याचा अर्थ सतत त्याच त्या विचारात वावरणं नव्हे. पण स्वत:ला स्वत:ची पालक म्हणून ओळख असायला हवी.

प्रसंग २ हे पालकत्वातील खिडकीचं उदाहरण आहे. आपण आणि इतर पालक यांचं निरीक्षण. लक्षात घेऊ या, की इथं तुलना, तू भारी की मी भारी अशी स्पर्धा तर अजिबात नाही. उलट आपल्या उणीवा दूर करण्यासाठी असं निरीक्षण खूप उपयुक्त ठरतं. आपण पालक म्हणून असे बदल स्वीकारत पुढं जायला हवं.

बरेचदा आपण पालक म्हणून स्वत:च्या धारणा, भूमिकांशी चिकटून बसलेले असतो. त्यात बदल करण्याची आपली मानसिकता नसते. थोडासा बदल खूप परिणामकारक ठरू शकतो. परंतु आपली मानसिकता तशी नसते. आपण बदल स्वीकारायला तयार नसतो. आपली चूक मान्य करण्याची आपली तयारी नसते. तेव्हा मग आपल्यातली बदलांची शक्यता धूसर होऊ लागते आणि आपण एक कठोर पालक म्हणून ओळखले जाऊ लागतो.

आरसा आणि खिडकी ही संकल्पना साहित्यात जितकी चपखल बसते तशीच ती प्रत्येक नात्यालाही लागू पडते. खासकरून पालकत्वाला. जिथं बदलांना खूप संधी असते आणि होणारे बदल आनंददायीच असतात. वापरून बघू या मग ही संकल्पना. फक्त तुलना, स्पर्धा यांना फाटा देत देत आपण पुढं जायला हवं, हे वेगळं सांगायची गरजच नाही!

टॅग्स :lifestyle