‘पालन’गोष्टी : वड्याचं तेल वांग्यावर

‘तुला एवढीही अक्कल नाही का? आपली वस्तू जागेवर ठेवायचं कळत नाही?’’ बाबा खूप मोठ्याने ओरडून बोलत होते. रवी घाबरून पाहत होता.
Parents
ParentsSakal
Summary

‘तुला एवढीही अक्कल नाही का? आपली वस्तू जागेवर ठेवायचं कळत नाही?’’ बाबा खूप मोठ्याने ओरडून बोलत होते. रवी घाबरून पाहत होता.

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

प्रसंग १

‘तुला एवढीही अक्कल नाही का? आपली वस्तू जागेवर ठेवायचं कळत नाही?’’ बाबा खूप मोठ्याने ओरडून बोलत होते. रवी घाबरून पाहत होता. चूक फारशी मोठी नव्हती. टॉवेल खुर्चीवर ठेवला म्हणून इतकं बोलायचं? रवी आणि आई मनात बोलले, ‘‘आज काहीतरी बिघडलेलं दिसतंय.’

प्रसंग २

वर्गात आज सर फार चिडलेले होते. मुलांवर सतत ओरडत होते. ‘आज यांना झालंय काय? आज असं काय करताहेत?’ मुलं कुजबुजत होती.

गेलाय ना तुम्ही पण अशा प्रसंगातून? बाहेर कुठेतरी काही घडतं आणि त्याचा राग, चीड डोक्यात घेऊन आपण घरी येतो. घरी आलो, की अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड व्हायला लागते. आणि घरतील वातावरण पार बदलून जातं. मुलं आणि घरातील इतर व्यक्ती तणावाखाली येतात आणि आपल्याविषयी एक नकारात्मक भावना त्यांच्या मनात निर्माण व्हायला लागते.

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही घरातील किंवा बाहेरील एखाद्या प्रसंगाचा राग, चीड, निराशा घेऊन गेला असाल तर तुमच्या वागण्यातील फरक इतरांना लगेच जाणवतो. ‘आज काय बिनसलंय? असं का वागताहेत?’ असं आपसूकच वाटून जातं. अशा प्रसंगांना आपण सतत सामोरे जात असतो. आपले ताण-तणाव, निराशा, हताशा आपल्या वागण्यात डोकावत राहते. तेव्हा त्याचा आपल्या वागण्यावर परिणाम होत राहतो.

आपल्या अशा वागण्याने आपली नकारात्मक प्रतिमा तयार व्हायला लागते. मुलं, कुटुंबातील व्यक्ती, बाहेरील व्यक्ती, सहकारी अशा अनेक व्यक्ती तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ठाऊक नसतं नेमकं काय झालंय. आपणही काही बोलत नाही. फक्त वड्याचं तेल वांग्यावर काढत राहतो. हे अगदीच सहज घडून जातं. आपली मनस्थिती बदलली, की आपण नेहमीप्रमाणे वागायलाही लागतो; परंतु आपली तयार झालेली प्रतिमा सहजासहजी पुसली जात नाही. तेव्हा आपणाला यावर थोडं काम करावं लागेल.

आपण कोणत्या गोष्टींनी डिस्टर्ब होतो? कोणत्या गोष्टीमुळे आपला मूड खराब होतो? याचा शोध घेणं आणि अशा गोष्टी टाळता येतील तेवढ्या टाळणं. हे आपण करू शकतो. शांत राहून स्वत:ला थोडा वेळ देणं, संगीत ऐकणं, काहीतरी वाचन करणं, एखादा सिनेमा बघणं किंवा जवळच्या मित्र मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा मारणं. असे पर्याय करून पाहता येतील. कामाच्या ठिकाणीही अशा गप्पा आपल्याला आपला मूड ठीक करायला मदत करतात.

आपण इतरांना काय देतो त्यावर आपली नाती तगलेली असतात. आपण आपलेपणा, प्रेम दिलं तर आपली नाती अधिक घट्ट होतात; पण चिडचिड, राग दिला तर? याचं उत्तर आता आपणच शोधायला हवं. तेव्हा वड्याचं तेल वांग्यावर काढताना याचा विचार जरूर करायला हवा. आपली मुलं पण असंच वागत असतील, तर त्यांच्यासाठी आपणच पहिले समुपदेशक झालं पाहिजे. त्यांच्याशी यावर बोललं पाहिजे. अशाने ताणाचे काळे ढग हटतील आणि आकाश निरभ्र होईल. वातावरण आणि नात्यांचंही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com