
भारतात लठ्ठपणाचे प्रमाण ४० टक्के; शासनाला सूचविणार उपाय
औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे लठ्ठपणाच्या वाढत्या प्रमाणाला खतपाणी मिळाले. मुलांमध्ये वजन ग्रॅमने वाढण्याऐवजी अचानक अनेक किलोंची वाढ होऊन लठ्ठपणा वेगाने बळावत चालला आहे. या वयोगटाची लठ्ठपणाची तीव्रता वाढत चालली आहे, असे तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदविले असून बालकांच्या आरोग्यासाठी शासनाला उपाय सुचविणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
दरवर्षी ४ मार्च हा दिवस जागतिक स्थूलता दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशन, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. राजश्री रत्नपारखे, सचिव डॉ. संध्या कोंडपल्ले, डॉ. हेमंत फटाले, डॉ. प्रीती फटाले यांनी बालकांमधील वाढत्या स्थूलतेविषयी चिंता व्यक्त केली. डॉ. हेमंत फटाले म्हणाले, स्थूलता हा अनेक आजारांचा उगम आहे. त्यामुळे आजारांना सामोरे जाण्यापेक्षा स्थूलता रोखणे आवश्यक आहे.
२०२१ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतात लठ्ठपणाचे प्रमाण साधारणतः सर्व विभागांमध्ये ४० टक्के आहे. हे प्रमाण पुर्व विभागात ३३ टक्के व दक्षिण विभागात ४६ टक्के आहे. महिलांमध्ये ४२ टक्के व पुरुषांमध्ये ३९ टक्के आहे. चाळीस वर्षावरील वयोगटात ४५ टक्के तर ४० वर्षाखालील वयोगटात ३५ टक्के आहे. व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये ३६ टक्के तर बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तीत ४४ टक्के आढळून आले.
लठ्ठपणाची गुंतागुंत टाळण्यासाठी व माहिती जनसामान्यात पोहोचण्यासाठी ४ मार्च हा जागतिक स्थुलता दिन म्हणून साजरा केला जातो. मुलं, कुटुंब, शासकीय आरोग्य संस्था, सरकारी संस्थांनी विविध स्तरावर प्रतिबंधात्मक प्रभावी उपाय अमलात आणल्या तर लठ्ठपणांवर नियंत्रण ठेवू शकतो.
लठ्ठपणाचा दुष्परिणाम
आत्मविश्वास कमी होणे
नैराश्य, वंध्यत्व
मुलींमध्ये लवकर पाळी सुरू होणे
पाळी अनियमितता या दरम्यान रक्तस्राव कमी किंवा अधिक होणे आदी गुंतागुंत लठ्ठपणामुळे
या कारणांना ४० टक्के गुणसूत्रे व ६० टक्के वातावरणात जबाबदार.
या गोष्टी लठ्ठपणाला कारणीभूत
चुकीचा आहार म्हणजे अति उष्मांक आहार
अती चरबीयुक्त पोट कमी असलेला आहार.
व्यायामाचा अभाव. बैठी जीवनशैली
वाढलेले स्क्रीन टाईम. बिघडले झोपेचे वेळापत्रक
या हव्या उपाययोजना
मुलांनी मैदानी खेळ खेळण्याची गरज.
समतोल आहार आणि नियमित व्यायाम महत्वाचा