छत्रीबद्दलच्या काही रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का... 

_Umbrella
_Umbrella

दरवर्षी जून महिन्यांपासून पावसाची रिमझिम सुरु होते. पावसाळा आला की, आपल्या घरातील छत्रीचा शोध सुरू होतो. अडगळीत पडलेली छत्री सापडली तर ठीक, नाही तर पुन्हा नवी छत्री विकत घ्यायची तयारी आपल्याला ठेवावी लागते. सध्या पावसाचा हंगाम सुरु आहे. छत्री ही लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणीही सहज वापरू शकते.  बाजारात छत्र्यांची नवनवीन व्हरायटी पाहायला मिळते. छत्र्यांची गरज प्रत्येकालाच भासते.  छत्री ही जगाच्या प्रत्येक कोप-यात वापरली जाते.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रवास करणे म्हणजे एक महाकठीण काम आहे, आणि त्यात पाऊस म्हणजे काही विचारायला नको. पावसापासून स्वत:चा बचाव करायचा म्हणजे छत्रीचा वापर करणे क्रमप्राप्तच आहे. रोज कामानिमित्त, शाळा आणि महाविदयालयास जाण्यासाठी काहीजण छत्रीचा वापर करतात तर काहीजण रेनकोटचा वापर करतात.

सर्वसामान्यपणे दरदिवशी पुष्कळ लोक छत्री सोबत बाळगतात. कारण पाऊस केव्हा पडेल याचा नेम नसतो. छत्रीचा कितीही काळ बदलला तरी छत्रीसोबतचं नातं कधीच बदलत नाही... बरोबर ना. छत्री वेगवेगळ्या स्वरुपात, वेगवेगळ्या आकारात, रंगात आणि डिझाइनमध्ये आपली सेवा करत असते. छत्री ही राजापासून रंकापर्यंत आनि आजोबापासून ते नातवांपर्यंत सर्वांच्या डोक्यावर छत्र धरीत असते. 

पावसाळा सुरू झाला की संरक्षण करणाऱ्या छत्रीला आपण लगेच शोधून ठेवतो. किंवा बाजारातून विकत आणतो. पेन, रुमाल यांसारखी छत्रीही एक विसरण्याची वस्तू, पण तरीही पावसाळ्यात आपण ती खरेदी करतोच. छत्री हा प्रकार आपल्याला देशोदेशी पाहायला मिळतो. पूर्वीपासूनच छत्री एक आसरा मानला गेला आहे. छत्रीचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.

रोजच्या वापरातील छत्री आणि सिनेसृष्टीतील शोभेच्या छत्री हे वेगवेगळ्या असतात. काहीजणांना पावसात मनमोकळंपणाने भिजायला आवडतं तर काहींना पावसात बाहेर जायलाच नको वाटतं. काहींना तर चक्क पावसाळाच आवडत नाही. प्रत्येकांची आवडनिवड वेगवेगळी असते. एकेकाळी चैनीची व प्रतिष्ठेची वस्तू समजली जाणारी छत्री आज मात्र सर्वत्र सहजगत्या उपलब्ध आहे आणि हरवलेल्या वस्तूंच्या यादीत नेहमीच सर्वात पहिल्या क्रमांकावर छत्री असतेच.

जगात कोठेही, ऊन व पावसापासून संरक्षण मिळण्याकरता ती खूपच उपयोगी साधन आहे. फक्त पावसाळाच नाही तर अनेक कारणांसाठी वापरल्या जाणा-या छत्रीबद्दल आज आपण काही रंजक गोष्टी पाहणार आहोत. 

अशी होती भारतातील पहिली छत्री...
भारतात सुरवातीला केळीच्या पानांपासून छत्री बनवली जात होती. केळीच्या पानांमुळे पाऊस ओसरून जातो. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी याचा वापर केला जात होता. आजही आपण पाहिलं तर कोकणमध्ये काही भागात केळीची पानं डोक्यावर ठेवून पावसांपासून स्वत:च संरक्षण केलं जातं. म्हणजेच भारतातील पहिली छत्री ही केळीच्या पानांपासून बनवण्यात आली आणि आता अनेक प्रकारच्या छत्री आपल्याला पाहावयास मिळतात.

सुरवातीला छत्री प्रतिष्ठेचे व आदराचे प्रतीक मानले जायचे कारण...
सुरवातीच्या छत्र्यांचा पावसाशी संबंधच नव्हता. सुरवातीला छत्री फक्‍त, महत्त्वपूर्ण लोकांच्या प्रतिष्ठेचे व आदराचे प्रतीक दर्शवण्यासाठी होत्या. राजाची छत्री ही इतरांच्या छत्र्यांपेक्षा वेगळी असे. ही छत्री रत्‍नजडित व सुशोभित असे आणि ती धरण्यासाठी वेगळे नोकर असत.

काही ठिकाणी छत्री म्हणून केला जातो याचा वापर... 
आजही काही गावं-खेड्यांमध्ये छत्रीऐवजी पोत्याची खोळ करून डोक्यावर घातली जातात. आणि प्लास्टिकचे पोते डोक्यावरून घेऊन पायापर्यंत सोडली जातात. काहींना छत्री घेणे परवडत नसेल ती लोक पोतं आणि प्लास्टिकचा वापर करतात. आजही पावसाळ्यात शेतामध्ये काम करताना मुख्यत्वे छत्री म्हणून पोत्याचं उपयोग केला जातो.

पूर्वी येथे छत्रीचा जास्त उपयोग केला जायचा...
सुरुवातीला, छत्री ही पावसापासून बचाव करण्यासाठी वापरली जात नसून तर सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर केला जात होता. पूर्वी छत्रीचा उपयोग फक्त राजे-महाराजे करीत होते. आपण अनेक चित्रपट, मालिका, पुस्तकांत महाराजांसाठी छत्रीचा वापर केलेला पाहिला असेल. त्या काळात छत्रीला खूप महत्त्वाचे स्थान होते.  

याठिकाणीही छत्रीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो...
व्यक्तिगत सार्वत्रिक उपयोगाखेरीज समुद्रकिनारा, उपाहारगृहे इ. ठिकाणी उघड्या जागेत सावलीसाठी, सर्कशीत कसरतीची कामे करताना तोल संभाळण्यासाठी छत्रीचा वापर केला जातो. अगदी हॉटेलमध्ये आउटडोर बसण्यासाठी देखील वेगळ्या प्रकारच्या छत्र्या ठेवलेल्या असतात. बीचवर देखील अशा प्रकारच्या छत्र्या असतात, जेणेकरून समुद्रस्नानाचा आनंद घेऊन त्या छत्र्यांच्या सावलीत येऊन आरामात बसता येते. इतकंच काय, आज-काल हॉटेलमधील मॉकटेल, कॉकटेल ही पेयं आकर्षक दिसण्यासाठी देखील ग्लासवर एक छोटीशी छत्री ठेवलेली असते. 

अशीही आहे छत्रींची वर्गवारी...
पावसाचा हंगाम सुरु झाल्यामुळे सध्या मोठमोठे शॉप्स, मॉल्स, मार्केट, चौकाचौकातील लहान दुकाने आणि हातगाड्यांवर छत्री विक्रेते पाहावयास मिळतात. पावसाळ्यात लेडीज, जेंटस, किडस् अशी छत्रींची वर्गवारी केलेली असते. सध्या मिनीचा जमाना असल्याने छत्री टू फोल्डर, थ्री फोल्डर होत गेली आहे.

छत्रीचे छोटे-छोटे उपयोग होत गेले कमी...
बदलत्या फॅशनशैलीमुळे छत्रीचा आकारही कमी होत गेला. त्यामुळे वृध्दमंडळी पूर्वी चालताना स्वत:ला आधार म्हनून तसेच कुत्र्यांना दम दाखवायला छत्रीचा वापर करत असे. परंतु मिनी छत्रीमुळे असे अनेक छोटे-छोटे उपयोग कमी होत गेले.  

बाजारातील छत्रींचा बोलबाला...
सध्या बाजारात विविध रंगांच्या, कार्टूनच्या, प्रिंटेड, फोल्डिंग, आर्मी सिल्वर, रेम्बो छत्री, मल्टीकलर, आर्मी सिल्व्हर, फॅमिली पॅक व गार्डन छत्री, ट्रान्सपरेंट, पॉकेट छत्री, हॅट अम्ब्रेला, मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर व फ्लोरोसेंट रंगाच्या आणि आकारांच्या छत्र्या मिळतात. सध्या अनेक ठिकाणी छत्र्यांची बरीच मॉडेल्स उपलब्ध झाली आहेत. दुहेरी छत्री, पारदर्शक घुमटासह छत्री, इंद्रधनुष्य छत्री, छप्पर छत्री असे अनेक प्रकार आपल्याला पाहावयास मिळत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com