
Lifestyle Blog : मुलाच्या घरात राहायला नको वाटते....!
Blog : “पहिले लॉकडाऊन लागले ना, तेव्हा मुलगा आणि सून दोघांचेही ऑफिस बंद झाले. नातीचेही डे-बोर्डिंग स्कूल बंद झाले. तिघे घरातच. शिवाय घरकामाची बाई नाही. सतत घरात राहायची आणि घरकाम करायची कधी सवय नाही, त्यामुळे त्यांचे सुरुवातीला काही दिवस तसे ठीक गेले; पण नंतर मुलगा आणि सुनेला वर्क फ्रॉम होम सुरू झाले. नातीला सांभाळायचा प्रश्न निर्माण झाला. मग मेडिकल कारण दाखवून आमच्या दोघांचा ई-पास करून घेतला आणि आम्ही प्रायव्हेट गाडी करून त्यांच्याकडे राहायला गेलो.
कडक लॉकडाऊन होते तोवर आम्ही चौघे मिळून कामे वाटून घेऊन करत होतो. ते दोघे त्यांच्या ऑफिसच्या कामाला बसले की आम्ही नातीला सांभाळायचो. तिचा अभ्यास घ्यायचो. तिची ऑनलाईन शाळा चालायची, ते बघायचो. सगळे तसे ठीकठाकच चालले होते. जसे जसे लॉकडाऊन शिथिल झाले, तसे तसे यांना तिथे करमेना. ई-पास बंद झाल्याबरोबर यांनी परत घरी जायचा धोशा लावला. नातीची शाळा सुरू झाली नव्हती, म्हणून मग मुलाने मला आग्रह केला आणि मी तिथेच राहिले. हे इकडे परत आले.
मला जाणवत होते की, सुनेला माझे तिथे असणे फारसे पसंत नाही; पण तिचा नाईलाजच होता म्हणून ती थोडी शांत होती. जशी नातीची डे-बोर्डिंग स्कूल सुरू झाली, तसे तिला माझे तिथे राहणे खटकायलाच लागले. मुलगा आणि नात मला राहा म्हणत होते. शेवटी हे इकडे एकटे आहेत याचे निमित्त पुढे करून मी निघून आले.
आपण नातीचे करू शकत असताना तिला डे-बोर्डिंगच्या शाळेत घालावे लागते, याचे एकीकडे वाईट वाटते; पण तिथे राहिल्यावर सुनेचे वागणे खटकते. सारखे ते पिझ्झा वगैरे बाहेरून मागवणे, पहिलीतल्या नातीला रोज दोन-दोन तास अभ्यासाला घेऊन बसणे, स्वतः तासन्तास मोबाईलवरून मैत्रिणींशी-बहिणींशी गप्पा मारत बसणे, घरातल्या कामाला हात न लावणे, सगळी कामे कामवाल्या बाईकडून करून घेणे, वारंवार ऑनलाईन खरेद्या करणे, हे सगळे मला अगदी बघवत नाही.
एकीकडे खोऱ्याने पैसा मिळवायचा आणि दुसरीकडे तसाच तो उधळायचा. माझ्या मध्यमवर्गीय, काटकसरीने संसार केलेल्या बुद्धीला हे वागणे पटत नाही. मात्र, बोलायची सोयच नाही. चार दिवस मुलाच्या घरात राहणे ठीक आहे. एरवी आपण आणि आपले घर बरे!” बऱ्याच दिवसांनंतर दवाखान्यात काहीतरी किरकोळ कारणासाठी आलेल्या देसाई वहिनी बोलत होत्या. “आम्ही एकत्र कुटुंबामध्ये संसार केला. चार खोल्यांच्या घरात दहा-बारा माणसे होती; पण कधी कुणाची अडचण वाटली नाही.
हल्ली घरात प्रत्येकाची स्वतंत्र खोली असते. पाहुण्यांची सुद्धा खोली असते; पण या मुलींना त्यांच्या गरजेपुरते फक्त सासू-सासरे हवेत. नंतर त्यांची अडचणच वाटते. आम्ही दोघे अजून हिंडून-फिरून ॲक्टिव्ह आहोत, म्हणून फारसे काही वाटत नाही. उद्या आणखी म्हातारे झाल्यावर किंवा दोघांपैकी एकटेच राहिल्यावर काय करणार? याची काळजी वाटते.” देसाई वहिनींसारखे बऱ्याच मध्यमवर्गीय, वयाची नुकतीच साठी ओलांडलेल्या वृद्धांना, मुलांच्या संसारात राहताना आणि त्यांच्या जीवनशैलीशी जुळवून घेताना अवघड जाते आहे. (Old Age People)
नव्या पिढीमध्ये नवरा-बायको दोघेही करिअर करणारे आहेत. त्यांच्या मुलांसाठी त्यांना डे-बोर्डिंग शाळांचा पर्याय जास्त सोपा वाटतो आहे. स्वयंपाक-पाणी, घरकाम यासाठी कामगार लावणे त्यांना परवडते आणि त्यातही गैर काही वाटत नाही. रितीरिवाज पाळणे त्यांना पटत नाही.
पण त्यांच्या पालकांचे आयुष्य यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारे गेलेले आहे. एक तर पैशाची एवढी सुबत्ता नव्हती. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचे भान राखावे लागत होते. काटकसरीने संसार करण्याशिवाय पर्याय नव्हता. पालकांनी केलेल्या कष्टाचे फळ म्हणून त्यांनी स्वतःच्या म्हातारपणासाठी स्वतःच पुंजी गोळा केली आहे.
मुलांवर त्यांचे ओझे पडू नये, याची खबरदारी घेतलेली आहे. मुलांनी फक्त आपली जाण ठेवावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. परंतु, भौतिक सुखे उपभोगण्याच्या आणि आपले आयुष्य आपल्या पद्धतीने मस्तीत जगण्याच्या नादात मुलांना पालकांच्या कष्टाची फारशी किंमत वाटत नाही आणि आतापर्यंत कोणतीच कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर न पडल्यामुळे पालकांच्या वृद्धापकाळात आपलीही काही जबाबदारी आहे, याची जाणीव राहत नाही. नव्या पिढीची ही मानसिकता फारशी प्रशंसनीय नक्कीच नाही आहे. परंतु, पालकांनी मुलांच्या संसारात त्यांना नको असताना राहण्यापेक्षा आपल्या वृद्धापकाळामध्ये आपल्या समवयस्कांमध्ये आपण अधिक आनंदाने राहू शकू, या पर्यायाचा सुद्धा योग्य वेळी योग्य पद्धतीने विचार करूनठेवावा लागणार आहे. (Lifestyle)
- डॉ. शुभदा दिवाण