स्त्री जाणिवांचा आरसा : स्त्रीकोश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Womens day special

आपला देश विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येक दहा कोसांवर भाषा बदलते म्हणतात. नुसतीच भाषा नाही तर चालीरीती, रूढी, परंपरा, प्रथा ही बदलतात.

Womens Day Special : स्त्री जाणिवांचा आरसा : स्त्रीकोश

- मधुमती वऱ्हाडपांडे

आठ मार्च. जागतिक महिला दिन. या निमित्ताने एकूणच स्त्रियांच्या मनातल्या खदखदीचं काहीसं ढोबळ मानाने विश्लेषण करायचं म्हटलं तर डॉ. स्वाती दामोदरे व डॉ. पृथ्वीराज तौर यांनी संयुक्तपणे अनुवादित केलेल्या कवितांचा ‘स्त्रीकोश’ हा संग्रह विशेष उल्लेखनीय ठरतो. या विस्तृत पुस्तकात एकूण बत्तीस निरनिराळ्या भाषेतील कवयित्रींनी रचलेल्या कवितांचा समावेश आहे. आपला देश विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येक दहा कोसांवर भाषा बदलते म्हणतात. नुसतीच भाषा नाही तर चालीरीती, रूढी, परंपरा, प्रथा ही बदलतात. खाद्यसंस्कृती, वेषभूषाही बदलते. या सगळ्यात पुरुषप्रधान संस्कृतीला अपेक्षित असलेली स्त्रीची प्रतिमा बाकी एकच असते. हीच ठसठसणारी वेदना या सर्व स्त्रियांच्या लिखाणातून आपल्या समोर येते. मुख्य म्हणजे या सर्व अनुवादांमधे मूळ साहित्यकृतीच्या गाभ्याला कुठेही धक्का लागत नाही. त्यामुळेच या व्यथा मनाला स्पर्श करून जातात.

आज एकविसाव्या शतकातली स्त्री परंपरेच्या जाचक बंधनातून बऱ्याच अंशी मुक्त झालीय असा आभास होत असतानाच या संग्रहातील प्रत्येक कविता स्त्रीच्या मनातली अव्यक्त खदखद, तिची मूक वेदना, त्याचे पदर आपल्यासमोर उलगडत जाते. वाचताना आपण खरंच अंतर्मुख होत जातो. प्रांत, भाषा, समाज, रूढी, चालीरीती या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा स्त्रीच्या व्यथेचा चेहरा मात्र बदलत नाही हे कटू सत्य ‘स्त्रीकोश’ मधल्या या कवितांमधून ठळकपणे आपल्या समोर येत राहते. विविध प्रांतातल्या, राज्यातल्या या कवयित्री अगदी मोकळेपणाने लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या, गर्भपात, कौटुंबिक हिंसा, वेश्याव्यवसाय, युद्ध आणि त्यातून झालेले अत्याचार इत्यादी अनेक बाबींवर व्यक्त झाल्या आहेत. एवढेच नाही तर कवयित्रींनी यात निसर्ग, प्रेम, राजकारण, सीमाप्रश्न वगैरे बाबींवरही समर्पक भाष्य केलेलं आपल्याला दिसतं.

पुराणातल्या दाखले देण्याजोग्या मोजक्या स्त्रियांची उदाहरणे घेतली तर सीता, सावित्री नेहमीच अग्रस्थानी असतात. सीता हे प्रतीक वापरून, तिच्या लाखो, करोडो बहिणींवरच्या अन्यायाचं काय? हा प्रश्न उपस्थित करणारी कवयित्री संयुक्ता दासगुप्ता यांची कविता ‘सीतेच्या बहिणी’ आपल्याला सुन्न करते.

सीतेला खूप बहिणी आहेत

अनेक नावं आहेत त्यांची

रीता, मीता, अर्पिता, सुनिता, रिनीता..

लोलिता, बोनिता, अनिता, सुमिता, सुचिता..

हज्जारो बहिणी आहेत सीतेला

पोपटासारख्या बोलणाऱ्या

रोबोट प्रमाणे चालणाऱ्या

सीतेच्या बहिणी बघत राहतात काहीच न बोलता

सीतेच्या बहिणी बहिऱ्या आहेत आणि मुक्याही...

सावित्री या व्यक्तिरेखेचा प्रतिकात्मक उपयोग करून लिहिलेली चंद्रिका पाडगावकर यांची कविताही आपल्याला अंतर्मुख करते. रोज दारू पिऊन घरी येणारा नवरा आज कोणत्या अवस्थेत घरी परतेल आणि आल्यावर काय अन कसा गोंधळ घालेल याच्या कल्पनेनेच घाबरून गेलेली सावित्री तान्हुल्याला कडेवर घेऊन दारात त्याची वाट पाहत उभी आहे. मनात शेकडो प्रश्न घेऊन. आजही स्त्री कडून तिने सती सावित्री सारखंच असावी अशी अपेक्षा केली जाते. मात्र, ती सावित्री असली तरी तो सत्यवान आहे का? हा प्रश्न बाकी कायम अनुत्तरितच राहतो. म्हणूनच कवितेचा शेवट आपल्यालाही प्रश्नांच्या जंजाळात गुंतवून जातो.

सावित्रीची प्रत्येक रात्र

उशी भिजवून जाते

तरीही नीटनेटके सजवून ठेवते

सत्यवानाचे अंथरूण पांघरून

अशा सत्यवानाचा जीव

पुन्हा यमराजाला परत मागायचा का?

सावित्रीच्या मनात प्रश्नाचे मोहोळ

वाढत जाते पळ प्रतिपळ...

स्त्री ही जात्याच कोमल, प्रेमळ असते. सगळ्याच नात्यांवर जिवापाड माया करत असते. तिने कायम सोशिकच राहावं हीच अपेक्षा तिच्याकडून केली जाते. पण हे कुठपर्यंत चालणार? कधीतरी तिचीही सहनशक्ती तोकडी पडते. मग ती कुठल्या शस्त्राने प्रतिकार करते ते नेमकं दर्शविणारी, कवयित्री वर्रे राणी यांची ‘प्रेम’ ही एक तेलगू कविता. स्त्रीच्या जीवनात आलेला प्रत्येक पुरुष, मग तो भाऊ, मुलगा, पती, पिता कुणीही असला तरी तिच्यावर अधिकार गाजवतो, तिला गृहीत धरत राहतो. ती तरीही त्या सगळ्या नात्यांवर स्वभावतःच विनाशर्त प्रेम करत राहते, असा या कवितेचा आशय.

अशाच अर्थाची स्त्रीच्या मुस्कटदाबीला वाचा फोडणारी आणखी एक तेलगू कविता ‘सायलेन्सर’. यात शीला सुभद्रा देवी म्हणतात, परंपरेच्या गोंडस बुरख्याचा सोईस्कर आधार घेत, स्त्रीची कोमलता, सुंदरता, सोशिकता यालाच अवाजवी महत्त्व देत, ती त्यातच अधिकाधिक गुरफटून दबलेली कशी राहील याचाच विचार श्रेष्ठत्वाच्या, स्वामित्वाच्या भावनेतून पुरुषसत्ताक पद्धतीत केल्या गेला. जेव्हा यातच आपलं आत्मभान हरवून गेलेल्या स्त्रीला स्वत्वाची जाणीव झाली तेव्हा तिची बंड पुकारण्याची शक्ती कशी जागृत होते हे ही कविता दाखवून देते.

बोलण्याची मुभा स्त्रीला कधीच नव्हती हेही एक असंच खुपणारं सत्य! नाना प्रकारचं देवत्व स्त्रीला जाणीवपूर्वक अर्पण करून आपल्या फायद्यासाठी तिला वापरणाऱ्या समाजाला, व्यवस्थेला आद्याशा दास या उडिया कवयित्री आपल्या ‘एक प्रार्थना’ या कवितेत म्हणतात-

पाषाणासारखं मौन

कधीही न बोलण्याचं प्राक्तन आमच्यासाठी घेऊन

किती सहजपणे वाट्याला आले ना माझ्या

आणि माझ्यासारख्या कित्येकांच्याही...

खण नारळ आणि वंशाच्या दिव्याचं प्रतीक म्हणून

दिल्या जाणाऱ्या निरंजनाच्या बदल्यात

आम्हाला हे मौन मंजूरच असल्याचा निर्वाळा देत!

वर्षानुवर्षे हे सगळं निमूट सहन करणाऱ्या स्त्रिया सुद्धा ‘बाईच्या जातीला सोसावंच लागतं’ हे मूकपणे मान्य करत आपल्या पुढल्या पिढीकडेही तोच वारसा सोपवण्यात स्त्रीत्वाचं सार्थक समजत आल्या ही तर त्यातली खरी शोकांतिका म्हटली पाहिजे. ममता जी सागर यांच्या ‘माझ्या आईसारखीच’ या कवितेत आपल्याला हे ठळकपणे दिसून येतं.

माझ्या आई सारखी तर आहे मी थेट

तिच्याच डोळ्यातलं पाणी

माझ्याही डोळ्यात जमलेलं

याच अर्थाची निगाहत साहिबा यांची ‘लाडकी’ ही कविताही हेच अधोरेखित करते.

सत्तर कपडे शिवले

माझ्या आईने माझ्यासाठी

सगळे तिच्याच मापाचे..!

अशा वेगवेगळया आशयाच्या कविता वाचता वाचता ललिता सिद्धबसवैया यांची ‘अनुवाद’ ही कविता तिच्या वेगळेपणाने आपलं लक्ष वेधून घेते. या कानडी कवितेतून त्या एक फार विलक्षण अशी कल्पना मांडतात. त्यानुसार आपल्या सृजन क्षमतेतून, बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेतून स्त्री जणू ईश्वराचाच अनुवाद करत असते अशी ती उदात्त कल्पना!

हे ईश्वरा

आम्ही तुझा अनुवाद करतो

आम्हाला ठाऊक नाही लिपी

आमच्या तळहाताने

आमच्या बलिष्ठ बाहुंनी

आमच्या मांड्यांतून

छातीच्या दुधातून

या अगोदरही आमच्या गर्भातून

आम्ही करत आलो आहोत तुझा अनुवाद!

असा आत्मविश्वास जागा झालेली, स्वतःच्या क्षमतांची जाणीव असणारी आजची स्त्रीही आपल्याला भेटते पद्मा सचदेव यांच्या डोगरी भाषेतल्या कवितेमध्ये.

ऐक

आता तू परत जा निघून

मी शोधून काढीन माझी वाट

नाही मिळाली मला

तर करीन एक नवीन पायवाट तयार

मला येतात वाटा तयार करता

नि येतं अनवट वाटांवर चालता..

तसेच सरिता तिवारी यांची ‘बदल’ ही नेपाळी कविता सुद्धा समाजात स्त्रियांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीत होत असलेले सूक्ष्म बदल अतिशय समर्पक शब्दात व्यक्त करते.

इतकी लांब नव्हती

पूर्वी कधीही

आता कशी काय झाली?

एवढी लांब?

टोकदार?

धारदार?

अगदी सुरीसारखी?

तुमच्या आदेशानंतर मौन स्वीकारायची

बोलणही मध्येच थांबवायची

पण का गप्प बसत नाहीये अलीकडे ही?

काही अंदाज आहे का तुम्हाला?

‘स्त्रीकोश’मधल्या या सगळ्या कवयित्री या खेरीज आणखीही अनेक प्रश्नांवर आपले परखड मत व्यक्त करतात. उदाहरणार्थ सीमा प्रश्न, राजकारण, फाळणी वगैरे वगैरे. एकूणच स्त्री विविध विषयांवर आपलं मत मांडते आहे, व्यक्त होते आहे याबाबत समाधान वाटते. हर कीरत हीर यांची ‘आता रस्त्यावर आलेच पाहिजे’ ही कविता तर आजच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर असंख्य शोषित स्त्रियांच्या अंतरात्म्याचा आरसाच म्हटली पाहिजे.

आता सोडायला हवा लाजेचा पडदा

रस्त्यावर उतरून आले पाहिजे

तू एकटी नाहीस

तुझ्या सोबत आहेत

हजार मनगटे

फक्त एकदाच

हो एकदाच

स्वतःच्या हक्कासाठी

आसमंतात निनादू दे

मुक्त आवाजात

तुझी घोषणा!

- अकोला