जागतिक बांबू दिन: बांबूपासून तयार होणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तू आपल्याला माहिती आहे?

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 18 September 2020

आज बदलेल्या परिस्थितीत व प्रदूषणयुक्त वातावरणात बांबू, बांबूशेती, बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तू, पदार्थ आणि रसायन समाजातील सर्व घटक व्यापार-व्यवसायासाठी फायदेशीर आहेत. बांबूपासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. १८ सप्टेंबर हा 'राष्ट्रीय बांबू दिवस' म्हणून ओळखला जातो, त्यानिमित्ताने त्यावर टाकलेला दृष्टिक्षेप...

पुणे : बांबू आणि बुरूड समाजाचं एक वेगळं नात आहे. बुरुड कामात बांबूचा मोठा वापर केला जातो. सध्याच्या फॅशनच्या दुनियेत स्पर्धेत टिकाव धरू शकेल, अशी दर्जेदार उत्पादने बांबूपासून तयार होऊ लागली आहेत. बांबूला 'हिरवे सोनं' म्हणूनही ओळखले जाते. धार्मिक शास्त्रानुसार बांबू हा माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लागणारा एक महत्वपूर्ण घटक आहे. आज बदलेल्या परिस्थितीत व प्रदूषणयुक्त वातावरणात बांबू, बांबूशेती, बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तू, पदार्थ आणि रसायन समाजातील सर्व घटक व्यापार-व्यवसायासाठी फायदेशीर आहेत. बांबूपासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. १८ सप्टेंबर हा 'राष्ट्रीय बांबू दिवस' म्हणून ओळखला जातो, त्यानिमित्ताने त्यावर टाकलेला दृष्टिक्षेप...

अलीकडच्या काळात प्लॅस्टिक बंदीमुळे बांबू वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. त्यात बांबूपासून टोपली, करंडी, सुपे, कणग्या, पंखे, चटया, दुरडी आणि परडी या घटकांचा समावेश आहे. बांबूपासून अनेक वेगवेगळ्या वस्तू ही बनवल्या जातात. तसेच त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा आहे. या वस्तूंकडे अनेकांचे आकर्षण वाढत चालले आहे. बांबू सारखी वनस्पती आज पर्यावरण संतुलनाबरोबरच अर्थार्जनाचे साधन निर्माण करत आहेत. विशेष म्हणजे बांबू बहुगुणी असल्यामुळे फ़र्निचर, कापड, इथेनॉल, औषध, शोभेच्या व गृह सजावटीच्या वस्तू निर्मितीला खूप मोठा वाव आहे. 

No photo description available.

महाराष्ट्रात मिळतात बांबूचे पाच प्रकार... 
 
महाराष्ट्रात कागदी बांबू, मेशी बांबू, ढोपरी बांबू, मोअर बांबू आणि कणक बांबू हे बांबूचे पाच प्रकार प्रामुख्याने आढळतात. 

अशी रूढ झाली म्हण... 

बांबूपासून अनेक वस्तू तयार करून एक म्हण रूढ झाली आहे. 'पंखाशिवाय गरुड नाही आणि बांबू शिवाय बुरूड नाही' अशी एक खास ओळख निर्माण झालेली आहे.  

बांबू लागवड, उत्पादन आणि पीक... 

जगातील एकूण बांबू लागवडीच्या क्षेत्रापैकी १९ टक्के बांबूची लागवड भारतात केली जाते. साधारणतः बांबूच्या एकूण १५०० जाती आहेत. त्यातील १००-१५० जातींच्या बांबूचे पीक घेतले जाते. 

२००६-०७ या वर्षात बांबू मिशन झाले सुरु... 

बांबूचे अधिक महत्व ओळखून तत्कालीन केंद्र सरकारने २००६-०७ पासून बांबू मिशन सुरु केले. परंतु वन कायद्यामुळे अनेक अडचणी आल्यामुळे हे मिशन फार पुढे सरकू शकले नाही. आता मोदी सरकारने या मिशनकडे जास्त लक्ष दिलेले आहे. 

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र... 

चंद्रपूरमध्ये बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र निर्माण झाल्यामुळे अनेक व्यक्ती आज या व्यवसायाकडे वळत आहेत. तसेच सध्या काही विद्यापीठामध्ये बांबू प्रशिक्षण सुरु आहे.

Image may contain: indoor

बांबूपासून तयार केल्या जातात या विविध वस्तू... 
 

बांबूपासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी ही मिळत आहे. फ्लॉवर पॉट, पेन स्टॅंड, ज्वेलरी बॉक्‍स, बर्ड हाऊस, विंड चाईम, डायनिंग सेट, आरामखुर्च्या, सोफा सेट, डायनिंग टेबल, बेड, चटई, पडदे, फ्लोरिंग पार्टिशन्स, फ्रूट बास्केट, टोप्या, आकाशदिवे, झुले, टॉवेल होल्डर, फाउंटन्स, फ्लोअर लॅम्प, झुंबर, वॉल लॅम्प, बॅंगल्स, हेअर क्‍लिप, ट्रे, कॅंडल डीनर स्टॅंड, बांबूची विविध स्ट्रक्‍चर्स, राख्या, फुलदाणी, फ्लॉवर पॉट, पेपर स्टॅन्ड, फाईल ट्रे, होडी, आकाश कंदील, फुलांचा गुच्छ, रुखवत सेट, बंगला, जहाज, बैलगाडी, ज्वेलरी हार, ज्वेलरी बॉक्‍स, बांबूचे बेड, छत्रीचे दांडे, बासरी, सायकल, तोरण, झुंबर, बैलगाडी, बँगल्स, वॉलपीस, लेटर बॉक्स, फोटोफ्रेम, आकाशी दिवा, कानवेल, फुलांचा बुके, पेन बॉक्स, झोपडी, किल्ले, चावीचे किचन, तुळस, पंखा, हळदी कुंकू करंडा, अंगुठी, टोपी आदी. 

Image may contain: drink

बांबूची भाजीसुद्धा बनते... 
   
बांबू हे नाव ऐकले तरी तुमच्या डोळ्यांसमोर बांबूपासून तयार केलेल्या वस्तू म्हणेजच सूप, टोपली, दुरडी, परडी, परसराम, कोंबडीचे खुराडे येत असतील.  पण बांबूपासून भाजी बनवतात हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. बांबूपासून पातळ-सुखी भाजी, भजी-वडे, बिर्याणी सारखे रुचकर पदार्थ बनवता येतात. 

Image may contain: food

बांबूविषयी अधिक बोलताना सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष दशरथ वडतिले म्हणाले, राष्ट्रीय बांबू मिशन व महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या माध्यमातून बांबूशेती आणि बांबू उद्योगाला चालना व गती दिली आहे. व्यावसायिकांनी पारंपरिक व्यवसायाची मानसिकता बदलून आर्थिक प्रगतीसाठी आणि स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन योजनांचा तसेच आधुनिकतेचा विचार करणे ही काळाची गरज आहे. 

अकलूजचे बांबू व्यावसायिक किरण सुर्यवंशी म्हणाले, अलीकडच्या काळात प्लास्टिकच्या बंदीमुळे बांबू वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.  याचा फायदा व्यावसायिकांना होत आहे. कलाकुसरीच्या अनेक वस्तू तयार करण्यात हातखंडा असलेले व्यावसायिक लग्न समारंभात भेट देण्यासाठी अनेक वस्तू तयार करतात. बांबूच्या व्यवसायातून अनेक कारागीर निर्माण होऊ लागले आहेत. कुटुंबाचे जीवनमान उंचावत आहे. बांबू हा आमच्या आयुष्यातील एक सोनेरी सूर्य आहे. बांबूची शेती ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.  

मिरज येथील व्यावसायिक आणि प्रशिक्षका मनिषा वडतिले म्हणाल्या, मी लहानपणापासून बांबूपासून सूप, बुट्टी, दुरडी या वस्तू बनवत आहे. ते करतच बांबूचे प्रशिक्षण घेतले. त्या मार्फतच अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार शिकत गेले. त्यामुळे आता अनेकांना या वस्तू तयार करायचे शिकवत आहे. बुरुड समाजाची कला इतरांनासुद्धा शिकता यावी यासाठी प्रयत्न करत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many handicrafts are being made from bamboo