हॅलो एमजी...देशातील पहिली इंटरनेट कार

चंद्रकांत दडस 
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

या कारचा वेटिंग पिरेड सध्या सर्वाधिक आहे. टाटा हॅरिअर व जीप कम्पास यांना ती थेट स्पर्धा करताना पहायला मिळत आहे.

एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर्स इंडियाने आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही एमजी हेक्‍टर नुकतीच भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. या कारची देशात मोठी चर्चा आणि उत्सुकता होती आणि अजूनही आहे. एमजी हेक्‍टर आय स्मार्ट तंत्रज्ञानासह देशातील पहिली इंटरनेट कार ठरली आहे. एमजीने भारतीय बाजारात आपल्या एसयूव्हीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. ही कार नेमकी चालवण्यास कशी आहे, प्रतिस्पर्ध्यांसमोर टीकाव धरू शकते का? याबाबत जाणून घेऊ... 

डिझाइन 
एमजी हेक्‍टरला जेव्हा सादर करण्यात आले त्यावेळी ती कशी कामगिरी करेल, भारतीय रस्त्यांवर ती कशी धावेल; या प्रश्‍नांसह या एसयूव्हीच्या लुकबाबत उलटसुलट प्रतिक्रिया मिळत होत्या. मात्र, हेक्‍टर दिसायला अतिशय सुंदर एसयूव्ही असून, पाहताक्षणी ती प्रेमात पाडते. भला मोठा आकार, ड्युअल हेडलॅम्प सेटअप, मोठे फ्रंट गिल, आकर्षक टेल लाईट असल्यामुळे कारचे डिझाइन अतिशय उत्तम आहे. समोरील ग्रील, एलईडी डीआरएल व एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्प यांच्याजवळ अधिक प्रमाणात क्रोमचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कारला क्‍लासीक लुक आणि डिझाइन आकर्षक होते. ते अधिक भडक दिसत नाही. समोरील बंपरच्या खालील भागात हवा आत येण्यासाठी एअर इनटेक देण्यात आला असून, तो सिल्वर एक्‍सेंटने जोडण्यात आला आहे.

एमजी हेक्‍टरच्या दोन्ही बाजू शार्प शोल्डर लाइन व क्रीज यामुळे चांगल्या दिसतात. यामध्ये आयाताकार व्हील आर्क्‍स लावण्यात आले आहेत, जे या एसयूव्हीच्या बॉक्‍ससारख्या डिझाईनला आणखी देखणे करतात. यासह दरवाजाच्या खालील भागातही क्रोमचा प्रयोग करण्यात आला असून, त्यावर मॉरिस गॅरेज असे लिहिण्यात आले आहे, जे ब्रॅण्डचे नाव दर्शवतो. एमजी हेक्‍टरच्या टॉप स्पेक व्हेरीएंटमध्ये डुअल टोन 17 इंचाचे अलॉय व्हील लावण्यात आले आहेत. मात्र, यामुळे या चांगल्या एसयूव्हीच्या डिझाईनला मार बसतो. एमजी हेक्‍टरच्या मागील बाजूस एलईडी टेल लाईट मध्यभागी देण्यात आली आहे. यामध्ये पातळ क्रोम स्ट्रीप व एमजी बॅजिंग देण्यात आले आहे. दोन्ही बाजूला असणाऱ्या लाईटमध्ये डायनामिक टर्न इंडिकेटर लावण्यात आला आहे, जो एसयूव्हीला प्रीमियम फील देतो. तसेच मागील बाजूस मोठे सिल्व्हर डिफ्यूजर लावण्यात आले असून, यात रिफ्लेक्‍टर आणि रिअर फॉग लॅम्पही देण्यात आला आहे. 

अंतर्गत रचना 
एमजी हेक्‍टरच्या केबिनबाबत बोलायचे झाले तर इंटिरिअरला पूर्णपणे काळा रंग देण्यात आला असून, कोणतेही फिजिकल बटण यात देण्यात आलेले नाही. केबिनमधील सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तिचा 10.4 इंचचा व्हर्टिकल टचस्क्रीन डिस्प्ले. हा डिस्प्ले या सेगमेंटमध्ये सर्वात मोठा आहे. ही 10.4 इंचाची स्क्रीन ऑडिओ सिस्टीम, क्‍लायमेट कंट्रोल, इन्फोटेनमेंट कंट्रोल, नेव्हिगेशन व फ्लॅगशीप आय स्मार्ट कनेक्‍टिव्हिटीसह अनेक बाबींना कंट्रोल करते. हे आय स्मार्ट तंत्रज्ञान 50 पेक्षा अधिक कनेक्‍टेड फिचर्स उपलब्ध करून देते.

यात व्हॉईस रिकगनिशन, जियो फेंसिंग, लाईव्ह व्हेईकल ट्रॅकिंग, व्हेईकल स्टेटस तसेच अन्य वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ही सिस्टीम व्हॉईस ऍक्‍टिव्हेटेड इनेबल्ड तंत्रज्ञानाने चालवली जाते. ज्यामध्ये हॅलो एमजी म्हटल्यानंतर आपल्याला हवी ती सुविधा ऑटोमॅटिक सुरू होते. यात सुविधा अनेक असून, यात खिडकी खोलण्यासह बंद करणे, सनरूफ व बूटपासून ते क्‍लायमेट कंट्रोल ऍडजस्ट करणे, नेव्हिगेशन सेटिंग, कॉल घेणे आणि बंद करणे अशा अनेक सुविधा यात आहेत. हे आय स्मार्ट तंत्रज्ञान एका सिमसह येते, जे सतत इंटरनेटला जोडलेले असते. कारच्या मुख्य कॉकपिट भागामध्ये मोठे लेदर असलेले स्टेअरिंग व्हिल देण्यात आले आहे. कारचे स्टेअरिंग पकडण्यास चांगले असून, यावर अनेक कंट्रोल बटण देण्यात आले असून, याच्या आधारे अनेक बाबी आपल्याला हाताच्या बोटावर करता येतात. 

अन्य वैशिष्ट्ये 
एम्बिएंट लाईट (आठ रंग), लेदर अपहोल्स्ट्री (टॉप स्पेक व्हॅरीएंट), पॅनारोमिक सनरूफ, पॉवर ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, ऑटो एसी रिअर व्हेंट, पॉवर ऍडजेस्टेबल व फोल्डेबल ओआरव्हीएम, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप, प्रीमियम इन्फिनिटी साऊंड सिस्टीम, फास्ट चार्जिग, बूट स्पेस : 587 लीटर. 

इंजिन 
हेक्‍टरमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. तिचे डिझेल इंजिन 2.0 लीटर असून ते 3750 आरपीएममध्ये 170 बीएचपी व 1750-2500 आरपीएमला 350 एनएमचा टॉर्क तयार करते. दोन्ही इंजिनमध्ये सहा स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्‍स लावण्यात आले आहेत. एमजीने हेक्‍टर एसयूव्हीच्या टॉप स्पेक पेट्रोल व्हेरीएंटमध्ये हायब्रिड तंत्रज्ञानाचा प्रयोग केला आहे. यामुळे 12 टक्‍के अधिक मायलेज आणि कार्बन डायऑक्‍साईडचे उत्सर्जनही कमी होते. 

चालवण्याचा अनुभव 
एमजी हेक्‍टरचे डिझेल व्हॅरिएंट पेट्रोल व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक सोपे आणि आनंद देणारे असल्याचे जाणवते. ते जबरदस्त लो ऍन्ड टॉर्क निर्माण करते. मात्र, इंजिनचा थोडा आवाज केबिनमध्ये ऐकायला येतो. मात्र, त्यामुळे खूप काही फरक पडत नाही. गाडी वेगवान असतानाही गाडीचे स्टेअरिंग अतिशय भक्‍कम वाटते. गाडीचे सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्‍स अतिशय स्मूथ आणि उत्तम आहेत. एमजी हेक्‍टरचे सस्पेंशन व ब्रेकिंग प्रणाली अतिशय उत्तम आहे. ती खडकाळ रस्त्यावरही अतिशय दमदारपणे पळत राहते. यात थोडासाही त्रास जाणवत नाही. ब्रेक मारताना तो चार चाकांना लागतो, त्यामुळे गाडी क्षणात थांबली जाते. एकूणच एमजी हेक्‍टर चालवण्यास अतिशय सोपी आणि आरामदायी एसयूव्ही आहे. 

किंमत : एमजी हेक्‍टरची किंमत अतिशय कमी ठेवण्यात आली असून, ती 12.18 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप स्पेक डिझेल आवृत्तीची किंमत 16.88 लाख रुपये आहे. ही किंमत अनेक प्रतिस्पर्ध्यांना टक्‍कर देत असून, टाटा हॅरिअर व जीप कम्पास यांना ती थेट स्पर्धा करताना पहायला मिळत आहे.

WebTitle : mg hector indias first Internet based car is now in the country


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mg hector indias first Internet based car is now in the country