झूम : कार खरेदी; व्हाया ‘गुगल सर्च’ | Cars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cars
झूम : कार खरेदी; व्हाया ‘गुगल सर्च’

झूम : कार खरेदी; व्हाया ‘गुगल सर्च’

भारतात २०२१मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च ‘किआ’च्या ‘सेल्टॉस’ या एसयूव्ही श्रेणीतील कारला मिळाले आहेत. वर्षभरातील सरासरी काढल्यास सेल्टॉसला प्रतिमहिना ८ लाखाहून अधिक सर्च मिळाले. महिंद्राची ‘एक्सयूव्ही ७००’ ही कार देखील सर्चमध्ये आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, ही कार ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच बाजारात आली आणि तीन महिन्यांच्या कालावधीतच तिला ७७,९१,४६९ सर्च मिळाले. त्यानंतर टाटा हॅरियरने वर्षभरात ४७,८८,२५३ तर टोयोटा फॉर्च्युनरला ४६,१७,५४७ सर्च मिळाले. सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील टाटाच्या ‘पंच’ या कारलाही अल्पावधित ६.७ लाख सर्च मिळाले. एसयूव्ही श्रेणी व्यतिरिक्त त्यापेक्षा खालील श्रेणीकडे नजर टाकल्यास सेदान श्रेणीत मारुती सुझुकीच्या ‘डिझायर’ने सर्वाधिक (साडेचार लाख) सर्च मिळवले आहेत.

मारुती सुझुकी ‘डिझायर’

‘डिझायर’ ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. वर्षभराच्या आकडेवारीवरून या कारला प्रतिमहिना सरासरी ४.५ लाख सर्च मिळाले आहेत. सब कॉम्पॅक्ट सेदान प्रकारात स्टाईल आणि आराम या दोन्हींमध्ये ही कार ग्राहकांना समाधान देते. ही कार केवळ १.२ लिटर पेट्रोल इंजिनसह येते, ज्यामध्ये मॅन्युअल आणि एएमटी असे दोन गिअर ट्रान्स्मिशनचे पर्याय दिले आहेत.

टाटा अल्ट्रोझ

टाटा मोटर्सची अल्ट्रोझ ही हॅचबॅक श्रेणीतील लोकप्रिय कारपैकी एक आहे. २०२१मध्ये गुगलवर ‘डिझायर’नंतर ‘अल्ट्रोझ’ला (३.७० लाख) सर्वाधिक सर्च केले गेले. ‘अल्ट्रोझ’ ही टाटाची सर्वांत सुरक्षित कार आहे. तीला ग्लोबल एनसीएपीची पंचतारांकित (५ स्टार) सुरक्षा मिळाली आहे. ही कार १.२ लिटर टर्बो पेट्रोल, १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि १.५ डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

होंडा सिटी

होंडा सिटी ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सेदान कार आहे. गुगल सर्चच्या क्रमवारीत या कारने तिसरा क्रमांक पटकावला आहे. वर्षभरातील आकडेवारीवरून या कारला महिन्याला सरासरी ३.६ लाख सर्च मिळाले आहेत. होंडाने २०२०मध्ये या कारचे सातवे मॉडेल भारतीय बाजारात आणले. सिटी मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रान्स्मिशन पर्यायासह ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

टाटा टिआगो

टाटा मोटरची आणखी एक टिआगो ही कार देखील सर्वाधिक सर्च मिळालेल्या कारच्या यादीत आहे. हॅचबॅक श्रेणीतील ही कार चौथ्या क्रमांकावर असून तिला सरासरी ३.२ लाखांच्या आसपास सर्च मिळाले आहेत. टाटाच्या एन्ट्री लेव्हल उत्पादनात टीआगो ही सर्वाधिक विक्री होणारी कारही ठरली आहे. टिआगोला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ४-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

मारुती सुझुकी ‘अल्टो ८००’

मारुती सुझुकीची सर्वसामान्यांना परवडणारी अल्टो ८०० या कारला गुगलवर महिन्याला सरासरी ३ लाखाहून अधिक सर्च मिळाले आहेत. सर्वाधिक सर्चच्या क्रमवारीत ही कार पाचव्या क्रमांकावर येते. अल्टो ही दोन दशकांपासून भारतीय रस्त्यांवर धावते. ती सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. मारुती सुझुकीने या नवीन वर्षात अल्टोला नव्या रूपात आणण्याची तयारी केली आहे.

इलेक्ट्रिक वाहनेही लोकप्रिय

इलेक्ट्रिक वाहनांनाही गेल्या काही वर्षात चांगली लोकप्रियता मिळत आहे. पेट्रोल-डिझेल आणि सद्यःस्थितीत परवडणाऱ्या सीएनजीचे दरही वाढत असल्याने वाहनप्रेमी इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होत आहेत. गुगलद्वारे इलेक्ट्रिक वाहनांना अनेकांनी सर्च केले. गेल्या वर्षभरात टाटाच्या ‘नेक्सॉन ईव्ही’ या कारसाठी सर्वाधित ‘सर्च’ मिळाल्याचे गुगलने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top