झूम : आधुनिक अन् किफायतशीर ‘हायरायडर’

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने (टीकेएम) गेल्या वर्षी ‘अर्बन क्रूझर हायरायडर’ ही सी-सेगमेंट एसयूव्ही कार लाँच केली.
hyryder car
hyryder carsakal
Summary

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने (टीकेएम) गेल्या वर्षी ‘अर्बन क्रूझर हायरायडर’ ही सी-सेगमेंट एसयूव्ही कार लाँच केली.

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने (टीकेएम) गेल्या वर्षी ‘अर्बन क्रूझर हायरायडर’ ही सी-सेगमेंट एसयूव्ही कार लाँच केली. यात माईल्ड हायब्रीड आणि प्युअर हायब्रीड अशा दोन प्रकारच्या इंजिनचा समावेश आहे. यापैकी माईल्ड हायब्रीड ‘ऑल व्हील ड्राईव्ह’ (निओ ड्राईव्ह व्ही) व्हेरिएंटच्या राईडचा अनुभव घेतला. इलेक्ट्रिक कारबाबत अद्यापही संभ्रम असणाऱ्यांसाठी ‘हायरायडर’ ती चांगला पर्याय ठरू शकते.

टोयोटाच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील ‘अर्बन क्रूझर’ कारला अद्ययावत करून हायरायडर ही कार बाजारात दाखल करण्यात आली आहे. या कारमध्ये ई, एस, जी, व्ही असे चार व्हेरिएंट; तसेच ऑटोमेटिक-मॅन्युअल ट्रान्समिशन आणि टू व्हील ड्राईव्ह (२ डब्ल्यूडी), ऑल व्हील ड्राईव्हचे (एडब्ल्यूडी) पर्याय दिले आहेत. त्यातही प्युअर हायब्रीड आणि निओ ड्राईव्ह (माईल्ड हायब्रीड) असे पर्याय येतात. या कारची एक्स शोरूम किंमत १०.४८ ते १९.४९ लाख रुपयांदरम्यान आहे. यापैकी व्ही व्हेरिएंटमधील निओड्राईव्ह (ऑल व्हील ड्राईव्ह) मॅन्युअल ५ स्पीड हायरायडरची राईड केली. या व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत १७.१९ लाख रुपये इतकी आहे.

हायरायडर निओ ड्राईव्हमध्ये १४६२ सीसी क्षमतेचे, ४ सिलिंडर, के-सीरिज १.५ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले असून जे ६००० आरपीएमला १०२ बीएच पॉवर, ४४०० आरपीएमला १३६.८ एनएम टॉर्क निर्माण करते. यामध्ये मॅन्युअल तसेच ६ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. राईड क्वालिटीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कार महामार्गावर राईड करताना रस्त्यावर चांगली पकड बनवते; परंतु थोडी अस्थिरता जाणवते ज्याला ‘बॉडी रोलिंग’ म्हणता येईल. मध्येच एखादा खड्डा वा रस्ता खडबडीत असेल तेव्हा ही समस्या येते. ही बाब सोडल्यास इंजिनमधून मिळणारी ताकद राईडचा आनंद देते.

ओव्हरटेकिंग करताना किंवा चढावर इंजिनमधून पूर्ण ताकद मिळत असल्याने तात्काळ वेग पकडते. रिफाईन्ड इंंजिन असल्याने केबिनमध्ये पूर्ण स्पीडमध्ये तितका आवाज येत नाही. स्टेअरिंग अपेक्षेप्रमाणे हाताळणीला अतिशय सुलभ आहे. विशेषत: महामार्गावर वळणावर पूर्ण वेगात असल्यावर स्टेअरिंग हार्ड होऊन गाडीवर नियंत्रण मिळविण्याची खात्री देते. त्यातून रस्त्यावरील पकडही मजबूत राहते. माईल्ड हायब्रीड तंत्रामुळे ही कार वेगमर्यादेत चालवल्यास कंपनीने प्रमाणित केलेल्या (१९.४ किलोमीटर/लिटर) एआरआय मायलेजपेक्षाही अधिक मायलेज देऊ शकते.

टोयोटा ब्रँडने भारतीय बाजारात क्वालिस, इनोव्हा, फॉर्च्युनर या कारद्वारे चांगली विश्वासार्हता जपली आहे. ‘हायरायडर’देखील या विश्वासार्हतेला जागते. या कारची सुरक्षित रचना, तिचा आकार, आसनव्यवस्था, त्यातून मिळणारा आरामदायीपणा ग्राहकांना नक्कीच सुखावू शकतो. ज्यांना इलेक्ट्रिक कारबद्दल संभ्रम आहे, त्या वारंवार चार्ज करायचे ‘टेन्शन’ येते, अशांसाठी प्रगत माईल्ड तसेच प्युअर हायब्रीड तंत्रज्ञानाची हायरायडर किफायतशीर आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकते.

प्युअर हायब्रिड कार शहरी भागात ठराविक वेगमर्यादेत धावत असल्याने त्या इलेक्ट्रिक मोटरवर धावतात; परंतु माईल्ड हायब्रिड कार शहरी भागात इंधनावर धावते. तसेच ठराविक आरपीएमवर इलेक्ट्रिकवर धावतात. शिवाय रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिममुळे इलेक्ट्रिक मोटरसाठी ऊर्जा पुरवणारी बॅटरी चार्ज होते.

कोणकोणते फीचर्स?

६ एअर बॅग, पाठीमागे थ्री पॉईंट सीटबेल्ट, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, किलेस सेंट्रल लॉकिंग, ऑटोमोटिक क्लायमेट कंट्रोल, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग ॲडजस्टमेंट, किलेस स्टार्ट/स्टॉप, ३६० डिग्री कॅमेरा, रिअर पार्किंग सेन्सर, पॅनॉरमिक सनरूफ, ऑटोमेटिक हेडलँप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँड्रॉईड ऑटो/ॲपल कार प्ले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com