झूम : आगीच्या घटनांवर खबरदारीचा उपाय

इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक सध्या मोठ्या संख्येने बाजारात दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडत आहेत.
Electric Scooter Fire
Electric Scooter FireSakal

इलेक्ट्रिक स्कूटर, (Electric Scooter) बाईक (Bike) सध्या मोठ्या संख्येने बाजारात दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरला आग (Fire) लागण्याच्या घटना घडत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या आगीलाही ठराविक कारणे आहेत. त्याबाबत खबरदारी घेतल्यास अशा आगीच्या घटना टाळता येऊ शकतात. याबद्दल सविस्तर...

इलेक्ट्रिक वाहनांना, त्यातही कारपेक्षा दुचाकींना आगी लागण्याच्या घटना व्हिडिओतून व्हायरल होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांकडे लोक मोठ्या आशेने पाहत असताना, अशा घटना किंवा व्हिडिओ या वाहनांच्या भविष्यातील वाटचालीवर नकारात्मक परिणाम करू शकतात. या आग नेमक्या कशा लागतात, त्यालाही विविध कारणे आहेत.

बॅटरी या इलेक्ट्रिक वाहनांच्या मुख्य घटक आहेत. परंतु बहुतांश आगी बॅटरीतील दोषांमुळेच लागत असल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे. सध्याच्या वाहनांमध्ये लिथियम बॅटरीचा वापर केला जातो. या बॅटरीमध्ये ‘एलएफपी’ आणि ‘एनएमसी’ हे प्रकार असतात. या दोन्हीही लिथियम आयन बॅटरी आहेत. परंतु त्यातील घटक वेगवेगळे असतात. ‘एलएफपी’ म्हणजे लिथियम आयन फॉस्फेट, तर ‘एनएमसी’ म्हणजे निकल मँगेनिझ कोबाल्ट. ‘एनएमसी’च्या तुलनेत ‘एलएफपी’ला सुरक्षित मानले जाते. ‘बीएमएस’ अर्थात बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिममध्ये काही बिघाड झाल्यास ‘एनएमसी’ बॅटरीमध्ये तापमान नियंत्रित होत नाही. याउलट ‘एलएफपी’ बॅटरीमध्ये होते. त्यामुळे आग लागून वाहन पेट घेण्याची शक्यता असते.

बॅटरीमधील आगीचे कारण

पूर्ण चार्ज झालेली बॅटरी वापरानंतर पूर्ण डिस्चार्ज होते तेव्हा, बॅटरीमधील लहान-लहान घटक (मॉलिक्युल्स) ठराविक प्लेट्समध्ये बदलतात. त्यादरम्यान घर्षण होऊन बॅटरीचे तापमान वाढत जाते. त्यातही बाहेरील वातावरणही उष्ण असल्यास हे तापमान उच्च पातळीवर जाते. प्रत्येक वाहनात ‘बीएमएस’ असते. ही यंत्रणा बॅटरीमधून साठवून ठेवलेल्या विजेचे नियोजन तसेच तापमानाचे नियंत्रण करते. परंतु या यंत्रणेत बिघाड उद्‍भवल्यावर तापमान वाढ अनियंत्रित होते आणि बॅटरी अधिक गरम होऊन पेट घेते.

‘बीएमएस’प्रमाणेच बॅटरीला आग लागण्याची अन्य कारणेही आहेत. बॅटरीमध्ये विविध सेल्सचा वापर केला जातो. परंतु हे सेल्स कमी दर्जाचे असतात. सध्या सर्व प्रकारचे सेल्स चीनमधून आयात केले जात आहेत. चीनमध्ये किमतीनुसार दर्जात्मक सेल्स मिळतात. काही कंपन्या इलेक्ट्रिक वाहनाच्या किमती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून स्वस्तातील सेल्सचा वापर करतात आणि अशा बॅटरी सेल्सवर भरवसा ठेवणे धोक्याचे असते. त्यातही कधीकधी दर्जात्मक सेल्समध्ये निर्मितीवेळी त्रुटी राहिल्याने आगी लागण्याच्या घटना घडतात. इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याची शक्यता इंधनावर धावणाऱ्या वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. तंत्रज्ञान अधिक प्रगत होत जाईल, तसतशी इलेक्ट्रिक वाहने अधिक सुरक्षित होतील. परंतु तंत्रज्ञान प्रगत होईपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.

काय खबरदारी घ्यावी?

1) आग विझविण्यासाठी बहुतांश वेळा पाण्याचा वापर होते; परंतु इलेक्ट्रिक वाहनाला लागलेली आग विझविण्यासाठी पाण्याचा वापर टाळावा. कारण बॅटरीमध्ये असलेले लिथियम आणि हायड्रोजन एकमेकांच्या संपर्कात येऊन ज्वलनशील गॅस तयार होतो आणि आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. अशावेळी एखादी चादर किंवा माती आगीवर टाकून ती विझवावी.

2) ज्या दुचाकीत डिटॅचेबल म्हणजेच काढता येणारी बॅटरी असेल, त्या वाहनधारकाने बॅटरी प्लगमधून काढताना किंवा लावताना मुख्य बटन बंद ठेवावे. बॅटरीचे कनेक्टर वारंवार काढणे आणि पुन्हा लावल्यामुळे घर्षण होऊन ते सैल होतात. अशावेळी स्पार्क होण्याची शक्यता असते आणि वाहन पेट घेते. हे टाळण्यासाठी कनेक्टरची वेळोवेळी देखभाल करावी.

3) वाहनातून काढलेली बॅटरी घरात किंवा एखाद्या ठिकाणी ठेवताना तिच्यावर थेट सूर्य किरणे पडतील, अशा ठिकाणी ठेऊ नये. तसेच प्रवास करून आल्यानंतर अनेक जण बॅटरी लगेच चार्जिंगला लावतात. परंतु हा प्रकार टाळावा. प्रवासामुळे ही बॅटरी आधीच तापलेली असते. त्यामुळे ती थोडावेळ थंड होऊन द्यावी. त्यानंतरच ती चार्जिंगला लावावी.

4) अतिवापराने बॅटरीच्या आकारात बदल होतात. त्यामुळे बॅटरीची नियमित देखभाल ठेवावी. एखादेवेळी बॅटरीवर फुगवटा आल्यास किंवा अन्य बदल झाल्यास, दुर्गंधी येत असल्यास बॅटरी बदलणे गरजेचे आहे. फास्ट चार्जिंग हे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने सोयीचे असले तरी बॅटरीचे आयुर्मान त्यामुळे कमी होते. त्यामुळे अपवादात्मक स्थितीत फास्ट चार्जरचा वापर करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com