नातीगोती : कुटुंब तणावमुक्त असायला हवे rohitash gaur writes relations Family should be stress free | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family

नातीगोती : कुटुंब तणावमुक्त असायला हवे

- रोहिताश गौर

माझे असे ठाम मत आहे की, कुटुंबव्यवस्था विश्वासावर अवलंबून असते. माझ्या मते घरातील मोठ्या व कर्त्या व्यक्तीं व घरातील इतर सदस्य यांच्यात विश्वास असणे फार महत्त्वाचे असते. मोठ्यांनी लहानांचे म्हणे ऐकावे व त्यावर विचार करून काय चांगले अन् काय वाईट, याबद्दल सर्वांनी एकत्र बसून एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यावा.

कुटुंबातील सर्वांत जवळची व्यक्ती म्हणजे माझी पत्नी. तिचे विचार खूप चांगले व स्पष्ट असतात. तिने माझ्या कठीण काळात खूप साथ दिली आहे. ती सरकारी कार्यालयात कार्यरत असल्याने तिने मी अभिनय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

आमच्या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सर्वजण खूप खुल्या विचारांचे आहोत. निरुपयोगी विचारांना आम्ही धारा देत नाही. त्यामुळे आमच्या मुलीदेखील खूप खूश असतात व त्या केव्हाही काही गोष्ट सांगायला संकोचत नाहीत. आम्ही काळानुसार होणारे बदल व गोष्टी स्वीकारतो आणि आमच्या जीवनात अमलात आणतो.

मी सध्या ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत मनमोहन तिवारी यांची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणामुळे कुटुंबाला वेळ देण्यात मर्यादा येतात. मात्र, ज्यावेळी आम्ही एकत्र असतो, त्यावेळी खूप मज्जा करतो, गाणी ऐकतो, गातोदेखील. मुलांच्या अभ्यासाविषयी चर्चा करतो. मुलांचे विनोद ऐकतो. शक्य झाल्यास फिरण्याचाही आनंद घेतो.

मला एक प्रसंग आवर्जून सांगायला आवडेल. मला जेव्हा पुरस्कार मिळाला होता, तेव्हा मी माझ्या कुटुंबाला मंचावर घेऊन गेलो होतो, तो प्रसंग आजही माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. त्यावेळी माझ्या पत्नीने सर्वांना अगदी आवर्जून पुरस्कार मिळाल्याबद्दल सांगितले. तेव्हा मला असे जाणवले, की अशा आनंदाच्या क्षणी माझी पत्नी, माझी मुले माझ्यासोबत होती आणि याचे मला अप्रूप आहे.

नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी एकमेकांवर दृढ विश्वास ठेवा आणि विचारांनी मोकळे राहा.

नाती दृढ होण्यासाठी....

  • एकमेकांच्या भावना व विचार ऐकून व समजून घ्या.

  • आपल्या कुटुंबातील वातावरण तणावमुक्त राहील, यासाठी प्रयत्न करा.

  • कुटुंबातील सदस्यांवर दृढ विश्वास ठेवा

  • जी परिस्थिती असते, तिच्याशी जुळवून घ्या.

  • एखादा चांगला किंवा वाईट प्रसंग उद्‍भवल्यास, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करा आणि त्यानुसार नियोजन करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

टॅग्स :Relationslifestylefamily