
भेट ऋद्धी-सिद्धीची!
‘लवकर निजे लवकर उठे, त्यासी ऋद्धी-सिद्धी भेटे’ ही उक्ती प्रसिद्ध आहे. आयुर्वेदातल्या दिनचर्येची सुरुवात होते सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठण्यापासून. ‘रात्रेः उपान्त्यो मुहूर्तो ब्राह्मः।’ म्हणजे अहोरात्रीचा शेवटचा मुहूर्त हा ब्राह्ममुहूर्त होय.
आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र वगैरे प्राचीन भारतीय शास्त्रात मुहूर्त हे कालगणनेचे एक मान सांगितले आहे. २४ तासांचे १५ भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे एक मुहूर्त. म्हणजेच १ तास ३६ मिनिटे. त्यामुळे रात्रीचा शेवटचा मुहूर्त असताना म्हणजे साधारणपणे सूर्योदयापूर्वी दीड तास असताना उठणे म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठणे.
सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपसूक सर्व प्राणिमात्र जागे होतात, शक्तीचे उत्थापन होते, कामाला प्रेरणा मिळते व हलके हलके दिवस जसजसा वर येतो तसतशी स्फूर्ती वाढते आणि सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळी आपणही विसावा घ्यावा अशी भावना उत्पन्न होतो. आणि म्हणून हे चक्र सांभाळण्यासाठी सकाळच्या प्रहरी उठणे हे निसर्गाला धरून आणि आरोग्यासाठी पूरक असते.
साहजिकच पहाटे लवकर उठायचे असल्यास माणसाला आवश्यक असणारी ६-७ तासांची झोप पूर्ण होण्यासाठी रात्री लवकर १०-११ वाजता झोपणे आवश्यक आहे. तेव्हा लवकर उठणाऱ्याला लवकर झोपावे लागतेच वा ते आपसूक घडतेच.
रात्रीची वेळ पित्ताची वेळ असल्याने तेव्हा शरीरात वाढणारे पित्त व उष्णता कमी करण्यासाठीही लवकर झोपून लवकर उठण्याचा उपयोग होतो, यामुळे माणसाची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयोग होतो आणि एकूणच मनःस्वास्थ्य मिळून यश व उत्कर्ष होतो.
पूर्वी दिव्याची चिमणी व कंदिलांच्या युगात अभ्यास करण्यासाठी पहाटेच्या प्रकाशाचा लाभ घेण्याचाच पर्याय असे, त्या काळी रात्री उशिरा जागून अभ्यास करण्याचा प्रश्र्न येत नसे. रात्री एकूणच अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोर-चिलटे सोडून इतर सर्व लहानथोर रात्री लवकर झोपून जात असत.
सध्या आधुनिक काळात मात्र रात्री जागरण करण्यासाठी दिवे जाळावे लागत असल्याने विजेची मागणी वाढते, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास होतो. सूर्य उगवण्याच्या वेळेस वा सूर्य उगवल्यानंतर झोपून राहणे हे सर्व दिवे चालू ठेवून, मीटर चालू ठेवून झोपण्यासारखे आहे. बऱ्याचदा असे दिसते की ‘जागरण करू नका’ असे सांगितले की समोरची व्यक्ती ‘पण मी सकाळी उशिरा उठतो, माझी झोप पूर्ण होते’ असे सांगते.
पण झोपेच्या बाबतीत पुरेशा तासांइतकेच महत्त्व योग्य वेळी झोप घेण्यालाही असते हे लक्षात घ्यावे लागते. रात्रीच्या जागरणांनी अंगात रुक्षता वाढते, वात वाढतो, तसेच पित्तही वाढते. उशिरा उठल्याने अंग जड होते, उत्साह वाटत नाही, शौचाला साफ होत नाही. अशा दृष्टीने विचार केला असताही ‘लवकर निजे लवकर उठे’ या गोष्टीचे महत्त्व लक्षात येऊ शकते.
रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात अधिक प्रमाणात होतात, रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांकडून कमी काम केले जाते, त्यांचे कामावर लक्ष कमी असण्याचा संभव अधिक असतो. याउलट सूर्योदयापूर्वी म्हणजे उषःकाली उठल्यास सूर्यकिरणांमधल्या विशिष्ट प्रकारच्या शक्ती मनुष्याला मिळू शकतात. पहाटे एकूणच वातावरण शांत असते, आदल्या दिवसाचे गोंधळ घालणारे विचारतरंगही शांत झालेले असतात.
म्हणून नवीन संकल्पना, प्रेरणा उत्पन्न होण्यासाठी या शांत वातावरणाचा फायदा होऊ शकतो. सकाळी उठून केलेला अभ्यास नीट स्मरणात राहतो, ध्यान अधिक चांगले होते, कला सोपेपणाने आत्मसात होते असे दिसते. आमचे वडील, वेदशास्त्रसंपन्न श्री. वासुदेवशास्त्री रोज पहाटे साडेतीन वाजता उठत असत, नंतर दोन अडीच मैल फिरायला जात असत.
येतांना कधी दंतमंजनासाठी दातून, कधी होम-हवनासाठी लागणाऱ्या गोवऱ्या बनविण्यासाठी शेण, कधी चार फुले गोळा करून आणत असत. साहजिकच ते रोज रात्री दहा वाजता झोपून जात. त्यांची दिनचर्या पाहून मनात विचार येत असे की बाबांना रोज सकाळी ऋद्धी, सिद्धी भेटत असणार. घराचा व वडिलांचा नियम व शिस्त म्हणून पहाटे उठणे हे आमच्या अंगवळणी पडलेले होतेच.
परमेश्र्वर चर्मचक्षूंना दिसत नाही तसेच ऋद्धी सिद्धी या देवता असल्याने त्याही डोळ्यांना दिसत नाहीत. परंतु या देवता सृजनाच्या रूपाने प्रकट होतात. कर्म करत राहिले की आपले हात व त्यात असलेले आपले कौशल्य आपल्याला दिसते पण परमेश्र्वराचे ऋद्धी सिद्धींच्या माध्यमातून मदतीला आलेले हात दिसत नसले तरी कार्य पूर्ण झाल्यावर त्या यशात परमेश्र्वराच्या हाताचे अस्तित्व नक्कीच दिसू शकते.
निसर्गचक्राला अनुसरून मनुष्य चालला तरच यश मिळेल यात काही शंका नाही. परस्वाधीनता म्हणजे दुःख व स्वतःच्या आत्मप्रेरणेने सर्व घडणे म्हणजे सुख व स्वतंत्रता. झोप ही परमेश्र्वराची देणगी असल्यामुळे झोपेसाठी कुठल्याही बाह्य साधनांची आवश्यकता नसते. काही व्यक्तींना झोप येण्यासाठी पुस्तक वाचणे, टीव्ही पाहणे, संगीत ऐकणे यांची गरज भासते.
काहींना तर झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप येत नाही. खरे तर झोप प्रत्येकाच्या स्वाधीन असावी व नैसर्गिक झोप मिळण्याचे भाग्य प्रत्येकास लाभावे. त्यासाठी ‘लवकर निजे लवकर उठे’ हा नियम पाळणे आवश्यक आहे. असा सर्व बाजूंनी विचार केला असता रात्र झोपण्यासाठी असते हे लक्षात घेऊन सर्वांनी ‘लवकर निजे लवकर उठे’ हा नियम पाळल्यास मानवजातीचे कल्याण होऊ शकेल, कारण त्यांच्या पाठीमागे उभ्या असतात ऋद्धी, सिद्धी !!