
सगळीच कुटुंबं नेहमीच छान असतात. कुटुंबं चौकोनी असू देत किंवा एकत्र असू देत, ती विश्वासावर आणि प्रेमावर अवलंबून असतात.
नातीगोती : ‘एकमेकांची सुख-दुःखं वाटून घ्यावीत’
- सपना सिकरवार
सगळीच कुटुंबं नेहमीच छान असतात. कुटुंबं चौकोनी असू देत किंवा एकत्र असू देत, ती विश्वासावर आणि प्रेमावर अवलंबून असतात. माझ्या एकत्र कुटुंबातील सर्व सदस्य खूप छान आहेत आणि आमचं एकमेकांवर खूप भरभरून प्रेम आहे.
माझ्या कुटुंबामध्ये सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत; पण त्यातल्या त्यात माझा चुलतभाऊ आणि बहीण माझे सर्वांत जवळचे जिवलग मित्र आहेत. दोघांचाही स्वभाव माझ्याशी खूप जुळतो. आम्ही भेटलो, की खूप गप्पा मारतो आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत असतो. आम्ही लहानपणी चक्क चपलांची, भाजीची दुकानं लावायचो हे आठवून आता आमची हसता हसता पुरेवाट होते. ते माझे बहीण-भाऊ आहे हीच एक चांगली हृदयप्रिय गोष्ट आहे.

आमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचं सर्व कुटुंब एकत्र राहत असून, आम्ही सर्वजण खुश आहोत. आम्ही एकमेकांच्या विश्वासानं व आनंदानं जीवन जगतो.
सध्या मी ‘ॲण्ड टीव्ही’वर ‘हप्पू की उलटन पलटन’ या मालिकेत बिमलेशची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणामुळे माझं वेळेचं गणित जुळवणं खूप अवघड जातं. मात्र, आम्ही एकत्र येतो, तेव्हा खूप धमाल करतो. माझ्या घरचे सगळे कुटुंबीय खूप दिलखुलास व हसतमुख स्वभावाचे आहेत. एकत्र मिळून जुन्या आठवणी काढतो, खूप मज्जा मस्ती करतो. मी माझ्या मावशीची नक्कल करून दाखवते, तर त्यांना खूप हसू येते. अशाप्रकारे आम्ही जीवन खूप हसून खेळून व्यतीत करतो. आम्ही संधीच शोधत असतो एकत्र येण्याची; मग केव्हा काही उत्सव असेल, लग्न असतील, वाढदिवस असो- आम्ही खूप धमाल करतो.
मी मुंबईला आले, तेव्हा खूप स्ट्रगल करावं लागलं. त्या मेहनतीच्या दरम्यान मला असं प्रकर्षानं जाणवलं, की कुटुंब किती महत्त्वाचं असतं. कधी जेवायला नाही मिळालं किंवा खूप एकटं वाटलं, अशा वेळेस आईची आठवण खूप येत होती. मी लहानपणापासून आईसोबतच राहिल्यामुळे तिची उणीव मला प्रकर्षानं जाणवत होती.
नातेसंबंध चांगले होण्यासाठी आम्ही सगळे मित्रांप्रमाणे राहतो, त्यामुळे आम्ही एकमेकांची सुख-दुःखं वाटून घेतो. आमच्या सर्वांची एक सवय आहे की, आम्ही व्यक्तिगत आयुष्यात कामाच्या गोष्टी आणत नाही. माझा जीवनसाथी आणि माझी आई खूप मनमोकळ्या स्वभावाचे असल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.
नाती दृढ होण्यासाठी....
जीवनामध्ये सुख असो किंवा दुःख, कुटुंबानं एकत्र राहावं.
कुठलीही अडचण असेल, तर आपल्या कुटुंबासोबत चर्चा केली तर त्याचं निराकरण होतं हे नक्की.
केव्हाही आयुष्यात मोठा निर्णय सर्व कुटुंब सदस्यांनी मिळून घ्यावा.
आपलं निरागस, निष्पाप, हसरं बालपण विसरू नये. कारण, त्यामुळे घरात खेळीमेळीचं वातावरण राहतं व आपण स्वतःला व दुसऱ्यांना खूश ठेवू शकतो.
कुटुंबामध्ये तुझं माझं न करता सर्वांचं असावं.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)