नातीगोती : ‘एकमेकांचा आनंद जोपासा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relations

मला असे वाटते, की एकत्र कुटुंबपद्धती ही भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य भाग आहे. एकमेकांना सांभाळून घेणे, चुका झालेल्या असतील तर क्षमा करणे, एकमेकांचा आनंद जोपासणे.

नातीगोती : ‘एकमेकांचा आनंद जोपासा’

- शुभांगी अत्रे

मला असे वाटते, की एकत्र कुटुंबपद्धती ही भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य भाग आहे. एकमेकांना सांभाळून घेणे, चुका झालेल्या असतील तर क्षमा करणे, एकमेकांचा आनंद जोपासणे. त्यामुळे कुटुंबातील प्रेमबंध घट्ट होतात.

माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व असून ती माझी शक्ती आहे. मला आठवतं, माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत खूप अडचणी आल्या आणि कधी-कधी मला काही दिवस तिच्यापासून दूर राहावं लागलं; पण ती नेहमीच मला समजून घेत होती आणि आजही तिची समजूतदारपणाची परिपक्वता पाहून मला कृतज्ञता आणि अभिमान वाटतो. आम्ही दोघीही भरपूर वेळ एकत्र घालवतो आणि घरातील कामे करतो, खेळ खेळतो, झाडे लावतो आणि खूप गप्पागोष्टी करतो; कारण ती माझी खूप छान मैत्रीणही आहे.

सध्या मी ‘ॲण्ड टीव्ही’वर ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे चित्रीकरणात व्यग्र असते. तरीही ज्यावेळी वेळ भेटतो, तेव्हा कुटुंबीयांना वेळ देते. माझे कुटुंब सर्वोतोपरी छान असून, आम्ही सर्व जण घट्ट प्रेमाने बांधलेले असून खूप आनंदाने राहतो. मला माझ्या मुलीसोबत वेळ घालवायला खूप आवडते. तिच्यासोबत खेळ खेळणे, तिला अभ्यासात मदत करणे मला आवडते. मी तिच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचाही प्रयत्न करते.

माझी मुलगी खूप जबाबदार आहे म्हणून आम्ही तिला तिच्या दिनचर्येचे स्वतः व्यवस्थापन करू देतो आणि सुदैवाने ती आम्हाला तक्रार करण्याची संधी देत ​​नाही. मी तिला योगा आणि शास्त्रीय नृत्य शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तिची सुट्टी असते, तेव्हा ती माझ्यासोबत सेटवर येते आणि मला या गोष्टीचे खूप अप्रूप वाटते की तिला सगळे अगदी प्रेमाने सांभाळतात. मी जास्तीत जास्त माझ्या कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करते.

कोरोनाकाळात मला मालिकेच्या चित्रीकरणासाठी सुरतला जावे लागले. त्यावेळी मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत होती. आमचा सेट माझ्यासाठी कुटुंबासारखा असल्याने मला सुरक्षित वाटते. इतक्या वर्षांपासून आम्ही चित्रीकरणात एकत्र घालविल्यामुळे दिवसातील बरेच तास एकत्र घालवत असतो. लॉकडाऊननंतर चित्रीकरणासाठी परत एकत्र आलो, तेव्हा मला जाणवले या सेटवरच्या कुटुंब प्रेमाला मी मुकले होते. नातेसंबंध चांगले होण्यासाठी आपण खूप काही करतो; परंतु प्रत्यक्ष भेटायला वेळ नाही मिळाला तर निदान फोनवर चौकशी करतो. अडचणींमध्ये जमेल तेवढी मदत करतो. आनंदाच्या क्षणी काही भेटवस्तू देतो.

नाती दृढ होण्यासाठी...

  • रात्रीचे जेवण एकत्र बसून करावे, हा दिवसाचा एक सोपा भाग आहे, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य एकमेकांना त्यांचे पूर्ण लक्ष देऊ शकतात आणि महत्त्वाच्या किंवा मजेदार चर्चा करू शकतात.

  • संवाद मजबूत आणि लवचिक असतो, तेव्हा कौटुंबिक बंध दृढ होतात.

  • वर्षातून एकदा तरी कुटुंबासह सहलीला जा. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल.

  • घरामध्ये कोणी आजी-आजोबा असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांच्या सोबतही वेळ घालवा.

  • कुटुंबात वादविवाद असतील, तर ते आपसात सोडवून मनाने मोठे राहा आणि क्षमा करत चला.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

टॅग्स :Relationslifestyle