
Health News : सोशल मीडियाने बिघडविले झोपेचे गणित
नागपूर : मानवी स्वभावातील महत्त्वाकांक्षेने ‘झेप’ घेतली आणि ‘झो’ उडवली. सोशल नेटवर्किंगने चिमुकल्या पासून तर साठीतील ज्येष्ठांचीही झोप उडाली. मोबाईल गेम, व्हॉट्स ॲप आणि फेसबुकच्या व्यसनात तरुणाई अडकली. आठ तासांची झोप चार तासांवर आली. परिणामी अल्प झोपेमुळे दिवसाचे गणित बिघडले.
यामुळे शरीरातील मास्टर हार्मोन असलेले मिलॅटोनियम कमी होत जाते आणि झोपेचे आजार बळावत जातात. अपुऱ्या झोपेमुळे तब्बल ८८ प्रकारचे आजार होतात, अशी माहिती स्लिप मेडिसिन विषयात जॉन्स हॉपकिन्स मेडिकल युनिव्हर्सिटीतून पदवी पूर्ण करणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे श्वसनरोग विभागप्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.
झोप न झाल्याने होणारे आजार
झोपेत श्वास थांबणे
झोपेत फीट येणे
काही काळासाठी स्मृतिभ्रंश
विसरभोळेपणा
दिवसा थकल्यासारखे वाटणे
झोपेत लघवी होणे
झोपेतून उठताना थकवा जाणवणे
वयोगटानुसार झोप
चिमुकल्या बाळासाठी १६ ते १८ तास
२ ते १० वर्षे - १० ते १२ तास
१० ते २० वर्षे - ८ ते १० तास
२० वर्षापुढे - ८ तास
झोपेचा स्टॅण्डर्ड टाइम
रात्री साडेसातला जेवण करा.
तासभर शतपावली करा.
रात्री १० वाजता उशीवर डोके ठेवा.
चांगल्या झोपेचे गणित
झोपेत व्यक्तीचा मेंदू चार प्रकारच्या स्थितींमधून प्रवास करतो. डोळ्यांची हालचाल न होता घेतली जाणारी झोप ही ७० मिनिटांची असते. याला ‘नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप’ म्हणतात. डोळ्यांच्या हालचालींसोबत होणारी झोप २० मिनिटांची असते. अशाप्रकारे झोपेचे एक चक्र सुमारे ९० मिनिटांचे असते. अशी चार चक्र असतात. या चक्रांची दिशा योग्य असली तर झोपेनंतर मनुष्य शांत असतो. चिडचिड होत नाही. झोपेतील चक्रात वारंवार बदल आले की, बायोलॉजिकल क्लॉक बिघडते आणि झोपेचे आजार जडण्याची जोखीम वाढते.
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍप्नियामुळे झोपेच्या दरम्यान घशाचे स्नायू सैल होतात. यात रुग्ण वेगाने घोरतो. या आजारात श्वसनमार्गाच्या वरच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. झोपेत श्वासोच्छवासात दीर्घकाळ व्यत्यय आल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. ऑक्सिजनची पातळी ७८ पेक्षा कमी झाली की, तत्काळ मृत्यू (सडन डेथ) होतो.
-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख, श्वसनरोग विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर.