तीन जीवनसंदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन जीवनसंदेश

अंगावर साधा कोट, साधेच कपडे आणि रेल्वे मास्कोच्या दिशेने निघते. एका स्टेशनवर गाडी थांबते...

तीन जीवनसंदेश

जगप्रसिद्ध रशियन लेखक आणि तत्त्वज्ञ लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म ९ सप्टेंबर १८२८ या दिवशी एका श्रीमंत घराण्यात झाला. त्यांची जगभर गाजलेली साहित्यकृती म्हणजे ‘वॉर अँड पीस.’ मास्कोतील साहित्यप्रेमींना वाटते, की लिओ टॉलस्टॉय यांचा आपण मोठा सन्मान करावा.

साहित्यप्रेमी त्यांच्या गावी जातात आणि निमंत्रण देतात. मॉस्कोला येण्यासाठी रेल्वेच्या तृतीय श्रेणीच्या डब्यात टॉलस्टॉय बसतात. अंगावर साधा कोट, साधेच कपडे आणि रेल्वे मास्कोच्या दिशेने निघते. एका स्टेशनवर गाडी थांबते.

पाणी पिण्यासाठी टॉलस्टॉय खाली उतरतात आणि तेवढ्यात एक श्रीमंत घराण्यातील भरजरी पोशाखातील एका स्त्रीची नजर टॉलस्टॉय यांच्याकडे जाते आणि ती म्हणते, ‘‘ओ कुली, जरा इकडे या.’’ टॉलस्टॉय क्षणभर विचार करतात, तिच्याजवळ जातात. ती स्त्री म्हणते, ‘‘एवढी माझी बॅग फर्स्ट क्लासच्या डब्यात नेऊन ठेव.’’

ते बॅग उचलतात आणि डब्यामध्ये नेऊन ठेवतात. ती स्त्री आपली पर्स काढते आणि त्याच्यातील एक नाणे त्यांच्या हातावर टेकवते. टॉलस्टॉय सहज म्हणतात, ‘‘बॅगमध्ये ओझं नसताना तुम्हाला कुलीची गरज लागावी, याचा अर्थ तुम्ही कोणत्यातरी महत्त्वाच्या कामासाठी निघालेला आहात.’’

त्यावर ती स्त्री म्हणते, ‘‘तुला कुलीला सांगून काय उपयोग आहे? माझे आवडते साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचा मॉस्कोमध्ये सत्कार आहे आणि त्या कार्यक्रमाला मी निघालेली आहे.’’ तिने दिलेले नाणे कोटाच्या खिशात ठेवतात आणि थर्ड क्लासच्या डब्यामध्ये जाऊन बसतात.

रेल्वे सुरू होते. मॉस्को स्टेशनवर थांबते. ती स्त्री डब्यातून खाली उतरत असताना, सहज पाठीमागे पाहते आणि तिच्या लक्षात येते थोड्या वेळापूर्वी ज्या माणसाला आपण कुली म्हणून संबोधले, त्या माणसाच्या गळ्यात लोक हार कशासाठी घालताहेत? तिची उत्सुकता जागी होते. ती पाठीमागे जाते. गर्दीतील एका व्यक्तीला विचारते, ‘‘हे कोण आहेत?’’ व्यक्ती म्हणते, ‘‘अहो असं काय करता.

तुम्ही यांना ओळखलं नाही का? हे लिओ टॉलस्टॉय.’’ तिच्या अंगावर शहारे येतात. ती वाट काढीत समोर जाते आणि टॉलस्टॉय यांच्यासमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते, ‘‘मला माफ करा, मघाशी मी तुम्हाला कुली म्हणून संबोधलं.’’ यावर ते तिला म्हणतात, ‘‘कुणाला तरी कुली म्हणून संबोधल्यानं कोणाचा तरी अपमान झाला, असे तुम्हाला वाटत असेल, तर तो अपमान झाला त्या कुलीचा, माझा नाही.’’

यावर काय बोलावे तिच्या लक्षात येत नाही. ती त्यांना म्हणते, ‘‘हमाली म्हणून जे नाणं मी तुम्हाला दिलेले आहे, ते मला परत द्या.’’ यावर टॉलस्टॉय तिला म्हणतात, ‘‘ते नाणं मी कष्टानं मिळवलेलं आहे आणि त्याच्यावर माझा पूर्ण अधिकार आहे.’’ आता काय बोलावे, तिच्या लक्षात येत नाही. तिचे शब्द थबकतात, एकदम ती त्यांच्या पायावर डोके टेकवते. लिओ तिला उठवतात आणि म्हणतात, ‘‘असं कुणाच्याही पायावर डोकं टेकवत जाऊ नकोस. कारण दुसऱ्याच्या पायावर डोकं टेकवायला डोकं असावं लागतंच असं नाही.’’

टॅग्स :Life