
सुरवातीला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अल्लू अर्जुन आणि रकुलप्रित सिंगला पसंती देण्यात आली होती.
पुणे : २०१८ मध्ये आलेला गीता गोविंदम (Geetha Govindam) हा तेलुगू चित्रपट कुणी पाहिला नाही, अशी तरुण मंडळी क्वचितच सापडतील. एक साधी प्रेमकथा अत्यंत साध्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. कितीही वेळा पाहिला तरी मन भरणार नाही, आणि एकही सीन बोअर करणार नाही असा हा रोमँटिक चित्रपट आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सुरवातीपासून शेवटपर्यंत फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम.
विजय गोविंद (विजय देवरकोंडा) हा गीता (रश्मिका मंदाना) नावाच्या एका सुंदर अशा मुलीच्या प्रेमात पडतो. एक मुलगा-मुलगी सुरवातीला भेटतात, मग त्यांच्यात दुरावा येतो आणि शेवटी पुन्हा ते एकत्र येतात, असा साधारणत: लव्हस्टोरीचा पॅटर्न असतो, पण गीता गोविंदचा पॅटर्नच जरा हटके आहे.
हेही वाचा : Love Matters : 'प्यार का केमिकल लोच्या, प्रेमामागची सायकॉलॉजी, ते काय असतंय रे भौ?
साधाभोळा, सरळ स्वभाव असलेल्या विजयला त्याच्यासारखीच साधी आणि सुसंकृत बायको मिळावी, अशी इच्छा असते. शहरातून गावाकडे जात असताना ट्रॅव्हल्समध्ये त्याला गीता दिसते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. ही गोष्ट विजय रात्रीच्या सुमारास रस्त्यामध्ये भेटलेल्या एका अनोळख्या मुलीला सांगत असतो आणि तिथून पुढे चित्रपटाला सुरवात होते.
विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), नित्या मेनन, राहुल रामाकृष्ण, सुब्बा राजू आणि नागेंद्र बाबू हे प्रमुख कलाकार असलेला हा एक रोमँटिक ड्रामा आहे. परसूराम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून अल्लू अरविंद यांनी याची निर्मिती केली आहे. गोपी सुंदर यांच म्युझिक आणि सिद श्रीरामचा आवाज तुमच्या हृदयाला हात घालतो. या चित्रपटातली सर्वच गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत.
५ कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने तब्बल १४० कोटी रुपये अशी छप्परफाड कमाई केली. आणि तेलुगू बॉक्स ऑफिसवरची ऑल टाइम ब्लॉकबस्टर मूव्ही ठरली. आयएमडीने गीता गोविंदमला ७.७ एवढे रेटिंग दिले आहेत.
- १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भारतात रिलीज करण्याअगोदर एक दिवस म्हणजे १४ ऑगस्टला हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करण्यात आला होता.
- रश्मिकाने या अगोदर किरीक पार्टी (कन्नड), चालो (तेलुगू) या हिट चित्रपटात, तर विजयने अर्जुन रेड्डी या चित्रपटात काम केलं होतं.
- ज्यावेळी गीता-गोविंदम छोट्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला, तेव्हा २०.८ अशी त्यावर्षीची सर्वात जास्त टीआरपी मिळाली होती.
हेही वाचा - Valentine Week Special: '13-7' ला पाठ फिरवली तरी ती मनात आहेच की ओ...
- परसूराम यांचा हा तिसरा चित्रपट ठरला. या अगोदर त्यांनी श्रीवस्तू सुब्रमस्तू आणि सोलो या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे.
- गोविंदच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कावेरी यांच्या नावाचा उल्लेख कुठेही करण्यात आला नव्हता. ही मोठी चूक चित्रपट निर्मात्यांकडून झाली होती.
- गीता गोविंदम ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर रश्मिकाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. त्यापैकी काही चित्रपटांना रश्मिकाने होकार कळवला. तर काही चित्रपट करण्यास तिने नापसंती दर्शवली.
- याच दरम्यान रश्मिकाचं लग्न ठरलं होतं, साखरपुडाही झाला होता, पण काही कारणास्तव तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
- येन्टी येन्टी या गाण्याला उत्तर भारतातील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. साउथ इंडियन चित्रपटातील एखाद्या गाण्याला उत्तर भारतात एवढी पसंती मिळण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी धनुषच्या कोलावरी डीला देशभरात तुफान लोकप्रियता मिळाली होती.
- सुरवातीला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अल्लू अर्जुन आणि रकुलप्रित सिंगला पसंती देण्यात आली होती. पण अल्लूने या चित्रपटात न्यू कमरची गरज असल्याचे म्हटले होते. आणि या चित्रपटात फ्रेश जोडीला स्थान मिळालं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर विजय आणि रश्मिकाची लीड रोलसाठी वर्णी लागली.
- चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दीड महिने अगोदर म्हणजे जून महिन्यात या चित्रपटाच्या म्युझिकचं लाँचिंग करण्यात आलं तेही अल्लू अर्जुनच्या हस्ते.
Valentine Special: 'फिल माय लव्ह', आर्याची जादू आजही कायम!
- २०१८ साली प्रदर्शित झालेला गीता गोविंदम हा चित्रपट एक गेम चेंजर म्हणूनही ओळखला जातो. कारण या दरम्यान रिलीज होणाऱ्या देशभरातील सर्वच चित्रपटाचं बजेट हे गीता गोविंदमच्या तुलनेत खूप जास्त होतं. फक्त ५ कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने वर्ल्ड वाईड १४० कोटींचा बिझनेस केला होता.
(व्हिडिओ सौजन्य : YouTube)
- 'तेरे चेहरे से नजर नहीं हटती' असंच काहीसं रश्मिकाबाबत म्हणावं वाटतं. रश्मिकाचा चित्रपटातील वावर डोळ्याची पापणी खाली पडू देत नाही. जेव्हा रश्मिका हसते, रागावते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला प्रेमात पडण्यापासून रोखू शकत नाहीत. त्यामुळे तिला नॅशनल क्रश म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. गीता गोविंदमसाठी रश्मिकाला फिल्मफेअरही मिळाला आहे.
- व्हॅलेंटाइन स्पेशल आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)