एकल महिलांच्या जीवनाला उभारी! कोरोना काळात विधवा झालेल्यांचे पुनर्वसन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women

कोरोना काळात महाराष्ट्रात सुमारे ७० हजार महिला विधवा झाल्या होत्या. यामध्ये, ग्रामीण भागातील, विशेष शिक्षण व कौशल्ये नसलेल्या एकल महिलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर होता.

Womens Day Special : एकल महिलांच्या जीवनाला उभारी! कोरोना काळात विधवा झालेल्यांचे पुनर्वसन

पुणे - कोरोना काळात महाराष्ट्रात सुमारे ७० हजार महिला विधवा झाल्या होत्या. यामध्ये, ग्रामीण भागातील, विशेष शिक्षण व कौशल्ये नसलेल्या एकल महिलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर होता. याची धग लक्षात घेऊन गेली दोन वर्षे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने अथक काम केले आणि आजअखेर सुमारे सहा हजार एकल महिलांच्या पुनर्वसानाला हातभार लावण्यात, त्यांना सर्वतोपरी उभारी देण्यात समितीला यश आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर समितीने आपल्या कामास प्रारंभ केला. एकल महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. रोजगारासाठी मदत, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, भावनिक आधार अशा विविध पातळ्यांवर समितीने काम केले. पुनर्विवाहासारख्या प्रश्नाबाबत मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले. तसेच, या महिलांच्या प्रश्नांबाबत राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय व्हावे, म्हणून नेत्यांसोबत बैठकाही घेतल्या.

दोन वर्षांच्या टप्प्यानंतर समितीला सुमारे ५८०५ महिलांपर्यंत पोचून त्यांच्या पुनर्वसनाला हातभार लावण्यात यश आले आहे. यंदाच्या महिला दिनानिमित्त या कामाबाबतचा अहवाल समितीने प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कामाच्या आढाव्यासह समितीने नोंदवलेली निरीक्षणे व सुचवलेल्या उपाययोजनांचाही समावेश आहे.

वीस विधवांचे पुनर्विवाह

कोरोना एकल महिलांमध्ये वीस हजार महिलांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आणि त्यातही २० ते ३५ वयोगटातील महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, या महिलांच्या पुनर्विवाहात अनेक अडचणी येत असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे समितीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आणि त्या प्रयत्नांनी सुमारे वीस महिलांचे पुनर्विवाह झाले.

कोरोना विधवांबाबत समितीने नोंदवलेली निरीक्षणे

- असंघटित क्षेत्रातील व तरुण विधवांची संख्या अधिक

- अनेक महिला कर्जाच्या विळख्यात

- अनेक कुटुंबांमध्ये नातेवाइकांकडून दुर्लक्ष

- बहुतांश विधवा कमी शिक्षणामुळे शासकीय योजनांपासून वंचित

- पुनर्विवाहात अनेक अडचणी

- या विधवांना मालमत्तेचा अधिकार मिळण्यात अडचण

एकल महिलांच्या पुनर्वसनामध्ये रोजगाराच्या आघाडीवर समाधानकारक काम अद्याप व्हायचे आहे. येत्या काळात त्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल, या संस्थांनी-उद्योगांनी त्यासाठी मदत करावी, असे आमचे आवाहन आहे. तसेच, एकल महिलांच्या समस्यांची व्याप्ती बरीच मोठी असल्याचे लक्षात आल्याने आता सर्वच एकल महिलांसाठी काम करत आहोत.

- हेरंब कुलकर्णी, समितीचे राज्य निमंत्रक

समितीचे काम

  • २६ - जिल्हे

  • ८३ - तालुके

  • ६५ - सोबत काम करणाऱ्या एकूण संस्था

  • ६,००० - संपर्कातील महिला

  • ३ कोटी - मिळवून दिलेली रोख आर्थिक मदत

  • २६४७ - संजय गांधी पेन्शन मिळवून दिलेली संख्या

  • ४६८३ - बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिलेल्या महिलांची संख्या

  • ६४२ - रेशन कार्ड मिळवून दिलेल्या महिलांची संख्या

  • २३५ - एकूण वाटलेले शिलाई मशीन

  • १४० - एकूण शेळीवाटप