गोव्यात गोवा सुरक्षा मंचाचे आव्हान, सुभाष वेलिंगकर यांचा मुत्सद्दीपणा

welingkar
welingkar

पणजी : गोवा सुरक्षा मंचाने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आपले उमेदवार कॉंग्रेसला कोणत्याही परीस्थितीत पाठींबा देणार नाहीत. सद्यस्थितीत पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनाच पाठीबा देतील असे जाहीर करत भाजपसमोर पेच निर्माण केला आहे.

गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलींगकर यानी ही माहिती दिली आहे. मंचाच्या कार्यकारीणीची पर्वरी येथे बैठक झाली. त्या बैठकीनंतर माहिती देताना वेलिंगकर यांनी मंचाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.  त्यांच्या म्हणण्यानुसार, खाणी सुरु करण्याचा विषय, कर्नाटकाबरोबरचा म्हादई जलवाटप वाद असे विविध विषय केंद्रीय पातळीवर मांडून सोडवण्यात भाजपच्या खासदारांना अपयश आले आहे. त्यामुळे जनतेने आता पोटतिडकीने लोकांसाठी काम करण्यास इच्छूक अशा मंचाच्या उमेदवारांना संधी द्यावी. मंच लवकर आपले उमेदवार जाहीर करेल असे त्यांनी सांगितले.

वेलिंगकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांतचालक आहे. आज गोव्यातील भाजप नेत्यांना त्यांनीच भाजपमध्ये आणले होते किंबहूना त्यांना सत्तेपर्यंत पोचवण्यात वेलिंगकर यांच्या रणनीतीचा महत्वाचा वाटा आहे. तसे वेलिंगकर यांनी जाहीरपणेही सांगितले आहे. 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीआघी कॉंग्रेसने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना गोव्यात अनुदान दिले होते. ते रद्द करावे यासाठी वेलिंगकर यांनी माजी मुख्यमंत्री स्व. शशिकला काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषा सुरक्षा मंच स्थापन केला होता. त्यात संघ परीवारातील संघटना, संस्थांचे कार्यकर्ते होते. त्यांनी कॉंग्रेसविरोधी भूुमिका घेतली आणि गोव्यात 2012 च्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते.

भाजपने हे अनुदान रद्द केले नाही म्हणून 2017 च्या निवडणुकीआधी मंचाने सत्ताधारी भाजपविरोधी भूमिका घेतली. वेलिंगकर यांना प्रांत संघचालक पदावरून दूर करण्यात आले. त्यामुळे त्यांनी भारत माता की जय ही संघाला समांतर संघटना आणि गोवा सुरक्षा मंच हा राजकीय पक्ष स्थापन केला. दरम्यानच्या काळात  शशिकला काकोडकर यांचे निधन झाले आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे नेतृत्वही वेलिंगकर यांच्याकडे आले.

संघ परीवारातील संस्था, संघटनांचे कार्यकर्त्यांत वेलिंगकर यांना आजही मानाचे स्थान असल्याने त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांनीच स्थानिक भाजपविरोधी भूमिका घेताना केंद्रीत मोदी यांना पाठींबा देण्याचे जाहीर करत आपण मूळ विचारापासून ढळलो नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजपला गोवा सुरक्षा मंच हा पर्याय निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आता लपून राहिलेला नाही.

भाजपमध्ये सध्या असलेले नेते माविन गुदिन्हो (कॉंग्रेस), विश्वजित राणे (कॉंग्रेस), पांडुरंग मडकईकर (कॉंग्रेस) हे अन्य पक्षातून आल्यामुळे गोव्यातील भाजप हा मुळचा भाजप राहिलेला नसून तो कॉंग्रेसयुक्त भाजप असल्याची टीका वेलिंगकर यांनी केली आहे. या बाहेरून आणलेल्या नेत्यांमुळे भाजपमध्ये गेले दीड वर्षे मोठी अस्वस्थता कार्यकर्ता ते नेता पातळीवर आहे. त्यांनाही पर्याय देण्याचा प्रयत्न वेलिंंगकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याच्या एकाच घोषणेतून त्यांनी बरेच काही साध्य केल्याचे सध्यातरी दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com