Loksabha 2019 : चौकीदार चोरच नाही भित्राही : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 एप्रिल 2019

चौकीदार केवळ चोरच नाही तर बोलायलाही घाबरतात. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून चर्चा करण्याऐवजी त्यांनी तेथून पळ काढला.

हैलाकंदी (आसाम) : चौकीदार केवळ चोरच नाही तर भित्राही असून, ते महत्त्वाच्या प्रश्‍नांवर विरोधकांशी थेट बोलण्याचे टाळतात अशी टीका आज (मंगळवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मोदींच्या योजना केवळ श्रीमंत उद्योगपतींसाठी फायदेशीर ठरतात. अनिल अंबानी, मेहुल चोक्‍सी आणि नीरव मोदी यांसारख्या उद्योगपतींना गेल्या पाच वर्षांत बराच फायदा झाल्याचे राहुल म्हणाले.
 
येथील प्रचारसभेत बोलताना राहुल म्हणाले, की चौकीदार केवळ चोरच नाही तर बोलायलाही घाबरतात. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून चर्चा करण्याऐवजी त्यांनी तेथून पळ काढला. मोदींनी केवळ आश्‍वासनाचा पाऊस पाडला, प्रत्यक्षात सामान्यांच्या हाती काहीच पडले नाही. दोन कोटींची रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांना हमीभाव, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये अशा प्रकारच्या घोषणांनी जनतेला फसवले, असे राहुल म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी हे सभास्थानी दोन तासापेक्षा अधिक उशिरा पोचले. सिलचर विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने सभेच्या ठिकाणी येणार होते, मात्र पावसामुळे ते रस्त्याने आले.

Web Title: Chowkidar is not only a thief but also a coward says Rahul Gandhi