Loksabha 2019 : 'केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावल्याचे कळलंच नाही'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मे 2019

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा रोड शो मोतीनगर भागातून जात असताना लाल रंगाचा टी-शर्ट घातलेल्या सुरेशने अचानक गाडीवर चढून केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावली होती.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात का लगावली हे कळलेच नाही. परंतु, या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे, असे सुरेश याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितेल.

नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी शनिवारी (ता. 4) रोड शो आयोजित केला होता. रोड शो मोतीनगर भागातून जात असताना लाल रंगाचा टी-शर्ट घातलेल्या सुरेशने अचानक गाडीवर चढून केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावली. अचानक झालेल्या या हल्ल्याने केजरीवाल कोसळत असताना नेत्यांनी त्यांना सावरले. त्यानंतर "आप'च्या कार्यकर्त्यांनी सुरेशला पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले होते.

सुरेश म्हणाला, 'केजरीवाल यांना त्या दिवशी का मारले हे कळलेच नाही. पण, जेव्हा मी कारागृहात होतो, तेव्हा मला प्रत्येक क्षणी आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत होता. नेमका त्यावेळी डोक्यात नेमका काय विचार सुरू होता, हे समजले नाही. पण, आम आदमी नेत्यांच्या वागणुकीवर आपण नाराज होतो, त्यामधूनच ही घटना घडली असावी. मी, कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलो गेलो नाही. कोणीही मला हे करण्यास सांगितले नव्हतं. पोलिसांनी माझ्याशी कोणतेही असभ्य वर्तन केले नाही. फक्त तुम्ही चुकीचे केले एवढेच सांगितले.'

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना 2015 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका व्यक्तीने श्रीमुखात लगावली होती. त्याचवर्षी एका रिक्षाचालकाने रोड शोदरम्यान मारले होते. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात, एका व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या आवारात केजरीवाल यांच्या दिशेने मिरची पावडर टाकली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont Know Why I Did It Says suresh Who Slapped Arvind Kejriwal